सुश्री मंजुषा सुनीत मुळे
११ नोव्हेंबर – संपादकीय
आज ११ नोव्हेंबर — लेखक आणि संपादक म्हणून, आणि त्याचबरोबर लोकनेते, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही सुप्रसिद्ध असणारे अनंत काशिनाथ भालेराव यांचा आज जन्मदिन. (११/११/१९१९–२६/१०/१९९१ )
भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, आणि नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ या सर्व लढ्यांमध्ये सक्रीय असणाऱ्या श्री. भालेराव यांनी, त्यासाठी फक्त तुरुंगवासच नाही, तर सक्तमजुरीची शिक्षाही भोगलेली होती. पुढे त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. नंतर औरंगाबादच्या दैनिक मराठवाडामधून ‘ देशाचा विकास आणि समाजहित ‘ या विषयावर त्यांनी सातत्याने लेखन केले. १९७७ साली देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. आधी साप्ताहिक असणाऱ्या ‘ मराठवाडा ‘चे दैनिक झाले, आणि आधी सहसंपादक असणारे श्री. भालेराव संपादक म्हणून कार्यरत झाले. हैदराबादमधील पत्रकार-संघाचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते. पुरोगामी आणि विकासात्मक पत्रकारिता, आणि लोकहिताचे प्रश्न, यासाठी त्यांनी सातत्याने एक मंच उपलब्ध करून दिला होता. म्हणूनच, “ पत्रकार आणि साहित्यिक यांची एक पिढी घडवण्याच्या कामात त्यांचे मोलाचे योगदान होते “ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते.
याबरोबरच साहित्य चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. साहित्य-परिषदेतली वेगवेगळी पदे त्यांनी भूषवलेली होती. त्यांच्या दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी नव्या जाणिवांचे प्रवाह साहित्यात आणणाऱ्या साहित्यिकांना सतत प्रोत्साहन दिले. एकीकडे त्यांचे स्वतःचे लेखनही जोमाने सुरू होते. आलो याच कारणासी, कावड, हे त्यांचे लेखसंग्रह– पळस गेला कोकणा हे प्रवासवर्णन–मांदियाळी या शीर्षकाने व्यक्तिचित्रे — तसेच, स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी– पेटलेले दिवस, आणि, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा ,—- असे त्यांचे विपुल लिखाण प्रसिद्ध झालेले होते.
‘ अनंत भालेराव– काळ आणि कर्तृत्व, ‘ आणि ‘ समग्र अनंत भालेराव ‘ ( दोन खंड ) ही, त्यांचे एकूण सगळेच कार्यकर्तृत्व उलगडणारी पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत.
लेखक, कलावंत, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना दिल्या जाणाऱ्या “ अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने “ आजपर्यंत ग.प्र.प्रधान, संवादिनी-वादक आप्पा जळगावकर, नरेंद्र दाभोळकर, मंगेश पाडगावकर, ना.धों. महानोर, विजय तेंडुलकर, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, अनिल अवचट, चंद्रकांत कुलकर्णी, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला गेला आहे.
स्व. अनंत भालेराव यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी आदरपूर्वक वंदन.
☆☆☆☆☆
आज डॉ. श्री. जनार्दन वाघमारे यांचाही जन्मदिन.( जन्म : ११/११/१९३४ )
मराठीबरोबरच इंग्लिशमधूनही सकस लेखन करणारे, आणि नांदेड इथे स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू असणारे श्री. वाघमारे हे सुरुवातीला इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. नंतर कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही कार्यरत होते. निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ख्यातनाम असणाऱ्या श्री. वाघमारे यांची राज्यसभेचे खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती.
बखर एका खेड्याची, मंथन, मातीवरच्या ओळी, यमुनेचे पाणी, राज्यसभेतील सहा वर्षे, सहजीवन, असे त्यांचे ललित-लेख-संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. मूठभर माती, आणि चिंतन एका नगराध्यक्षाचे, या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, तसेच, महर्षी दयानंद सरस्वती– विचार, कार्य और कृतित्व, समाज परिवर्तनकी दिशाएं, यासारखे सात अनुवादित ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी खूप सारे वैचारिक लेखनसुद्धा केले आहे. जसे की— ‘ अमेरिकन निग्रो – साहित्य आणि संस्कृती ‘, ‘ आजचे शिक्षण– स्वप्न आणि वास्तव ‘, दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी, ‘ बदलते शिक्षण- स्वरूप आणि समस्या ‘, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातीअंताचा लढा ‘, महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण, हाक आणि आक्रोश, ‘ प्राथमिक शिक्षण– यशापयश आणि भवितव्य ‘, इत्यादी– असे त्यांचे लेख अभ्यासनीय म्हणून प्रशंसनीय ठरलेले आहेत.
डॉ. जनार्दन वाघमारे यांना आजच्या जन्मदिनी सादर प्रणाम आणि हार्दिक शुभेच्छा.
☆☆☆☆☆
“ ती पहा, ती पहा, बापूजींची प्राणज्योती, तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहताती “ ही शाळेत शिकलेली कविता आणि पुस्तकातला कवितेच्या अलीकडच्या पानावरचा गांधीजींचा काठी हातात घेऊन चालतांनाच आडवा फोटो, आणि त्या फोटोत दूरवर दिसणारी तेवत्या पणतीची ज्योत— हे सगळं माझ्याप्रमाणेच बऱ्याच वाचकांना नक्कीच आठवत असेल. या अजरामर कवितेचे कवी, म्हणजे — ‘ लोककवी मनमोहन ‘ म्हणून प्रसिद्ध असलेले गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा आज जन्मदिन. ( ११/११/१९११ – ७/५/१९९७ ) काव्यरसिकांच्या थेट मनापर्यंत पोहोचतील अशा कितीतरी कविता त्यांनी लिहिल्या. आणि त्या खूप गाजल्याही.—– “ शव कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता ।।” ही अतिशय हळुवार भावना व्यक्त करणारी कविता, “ मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला “ ही भावगीत म्हणून प्रसिद्ध झालेली कविता, “ मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी “ ही जराशी अबोध वाटणारी पण सुंदर कविता, “ आमुचे नाव आसू गं “ अशी मनाला भिडणारी कविता —-ही त्यांच्या कवितांची काही उदाहरणे. त्यांची आवर्जून सांगायला हवी अशी एक कविता म्हणजे —- “कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा “– सुरुवातीला या कवितेवर “अश्लील“ असा शिक्का मारून, ती लोकांसमोर सादर करायला विनाकारण आक्षेप घेतला गेला होता. पण त्यावेळचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गजानन वाटवे यांनी या कवितेला स्वतः चाल लावून स्वतःच्या भावगीत-गायनाच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये ती सादर करायला बेधडकपणे सुरुवात केली, आणि ही कविता अतिशय लोकप्रिय झाली.
मनमोहन नातू यांचे , ‘ अफूच्या गोळ्या ‘, ‘ उद्धार ‘, ‘ युगायुगांचे सहप्रवासी ‘, ‘ शिवशिल्पांजली ‘,
‘ सुनीतगंगा ‘, असे काव्यसंग्रह, आणि ‘ बॉम्ब ‘ सारख्या काही दीर्घकविताही प्रसिद्धीप्राप्त ठरलेल्या आहेत.
मनमोहन नातू हे फक्त कवी नव्हते, तर, लघुकथा, कादंबऱ्या , ललित लेख असे त्यांचे इतरही विपुल लेखन प्रसिद्ध झालेले होते. छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू, छत्रपती राजाराम, संभवामि युगे युगे, अशी चरित्रात्मक पुस्तके, तसेच तोरणा, प्रतापगड, आग्र्याहून सुटका, सूर्य असा मावळला, अशा त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
‘ मीनाक्षी दादरकर ‘ या टोपणनावानेही त्यांनी काही रचना केल्या होत्या, ५००० मंगलाष्टके रचली होती, लिखित रूपात भविष्ये लिहिली होती, ही त्यांची रसिकांना माहिती असावी अशी माहिती.
कविवर्य श्री. मनमोहन यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी मनःपूर्वक आदरांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈