सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
पु. भा. भावे
पुरुषोत्तम भास्कर भावे (12 एप्रिल 1910 – 13 ऑगस्ट 1980)हे थोर लेखक व विचारवंत होते.
नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये व लॉ कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले.
भावेंनी ‘अकुलिना’, ‘अडीच अक्षरे’, ‘दोन भिंती’, ‘ व्याध’ इत्यादी 17 कादंबऱ्या लिहिल्या.
‘पद्मिनी’, ‘महाराणी’, ‘मुक्ती’, ‘विषकन्या’ व ‘स्वामिनी’ ही पाच नाटके त्यांनी लिहिली.
‘ठरीव ठशाची गोष्ट’, ‘फुलवा’, ‘पहिला पाऊस’, ‘प्रतारणा’ इत्यादी 11 कथासंग्रह त्यांनी लिहिले.
‘रक्त आणि अश्रू’, ‘विठ्ठला पांडुरंगा’ इत्यादी 14 लेखसंग्रह त्यांनी लिहिले.
त्यांचे ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
ते ‘आदेश’ व ‘सावधान’ या नागपूरच्या वृत्तपत्रात स्तंभलेखनही करत असत.
‘रायगडचा राजबंदी’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती.
‘अंमलदार’मध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली होती.
1977मध्ये पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
भाषाप्रभू पु. भा. भावे समिती दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना कै. पु. भा. भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करते. 🙏🏻
☆☆☆☆
शांताराम विष्णू आवळसकर
शांताराम विष्णू आवळसकर (9 नोव्हेंबर 1907- 13 ऑगस्ट 1963) हे ऐतिहासिक लेखन करत असत.
त्यांनी ‘रायगडची जीवनकथा’ हे पुस्तक लिहिले.
मराठेकालीन कोकणच्या इतिहासाच्या साधनांचा त्यांनी प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला.
गतेतिहासाचा शोध घेत असताना राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक संदर्भ परिश्रमपूर्वक ध्यानात घेत आवळसकरांनी आपली संशोधनदृष्टी सूक्ष्म, चौफेर, व्यापक व विश्लेषक बनवली होती.
‘शिवचरित्र साहित्य खंड 9’, ‘आंग्रेकालीन अष्टागर’, ‘शिवचरित्र साहित्य खंड 10’, ‘ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड 10’, ‘रायगडची जीवनकथा’ वगैरे अनेक ऐतिहासिक पुस्तके त्यांनी लिहिली.
पु. भा. भावे व शांताराम विष्णू आवळसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली. 🙏🏻
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈