श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १३ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)

इंदिरा संत

“अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे”

स्वतःच्या काव्य निर्मितीविषयी असे मत व्यक्त करणा-या आणि कवितेला आपल्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा मानणा-या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृतीदिन.

महाविद्यालयीन जीवनापासून कविता लेखन करणा-या इंदिरा संत यांच्या कविता ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा अशा मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. त्यांनी बी.ए., बी.टी., बी.एड्. शिक्षण पूर्ण करून अध्यापनाचे काम केले. कवी व निबंधकार ना. मा. संत यांच्याशी त्यांचा  विवाह झाला. 1 941 साली त्या उभयतांचा ‘सहवास’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 1946 मध्ये त्यांच्या पतींचे निधन झाले. पुढील सर्व आयुष्य सांसारिक जबाबदा-या व पतिविरहाच्या दुःखात व्यतीत झाल्यामुळे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात दिसून येते. त्यांची कविता त्यामुळेच आत्ममग्नतेतून सार्वत्रिक सुखदुःख व्यक्त करणारी वाटते. निसर्गाच्या माध्यमातून मानवी भावना व्यक्त करणारी त्यांची कविता निसर्गा इतकीच चिरतरूण वाटते. स्वानुभवातून साधलेला शब्दसंवाद एक वेगळाच सौंदर्यानुभव देऊन जातो. त्यांचे गद्य लेखनही नितळ काव्यात्मक अनुभूती देणारे आहे.

इंदिरा संत यांची साहित्यसंपदा:

कविता- शेला, वंशकुसुम, रंगबावरी, मेंदी, मृगजळ, मरवा, निराकार, गर्भरेशमी, बाहुल्या, चित्कळा

ललित लेख – मृद्गंध, फुलवेल, मालनगाथा

कादंबरी – घुंघुरवाळा

कथा – शामली, कदली, चैतू

बालसाहित्य – गवतफुला, अंगत पंगत, मामाचा बंगला.

पुरस्कार:

‘गर्भरेशमी’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार व अनंत काणेकर पुरस्कार.

घुंघुरवाळा’ ला साहित्य कला अकादमी पुरस्कार.

शेला, रंगबावरी व मृगजळ या काव्यसंग्रहाना महाराष्ट्र शासन पुरस्कार.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार.

“मातीतून मी आले वरती

मातीचे मम अधुरे जीवन”

असे म्हणणा-या या कवयित्रीचे वयाच्या 86व्या वर्षी 13 जुलै2000 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, कोलाज इन.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments