सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
दत्तात्रय कोंडो घाटे
दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त (27 जून 1875 – 13 मार्च 1899). हे मूळचे श्रीगोंद्याचे. त्यांचे शालेय शिक्षण नगरमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई, इंदूर, कलकत्ता येथे झाले. नंतर ते पुण्याच्या नू. म. वि.मध्ये शिक्षक होते.
रेव्ह. ना. वा. टिळक, कविवर्य चंद्रशेखर वि कवी दत्त या तिघांचे सख्य होते.
‘बा नीज गडे ‘ ही कवी दत्तांची लोकप्रिय कविता. त्यांनी 1897-98 मध्ये बहुसंख्य कविता लिहिल्या. त्या वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी 48 कवितांचा ‘दत्तांची कविता ‘हा संग्रह त्यांचे पुत्र शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक वि. द. घाटे यांनी 1922 साली प्रसिद्ध केला. डॉ. मा. गो. देशमुखसंपादित संग्रहात त्यांच्या सर्व म्हणजे 51 कविता आहेत.
आकाशानंद
आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (1933-13 मार्च 2014). आकाशानंद हे पूर्वी नागपूर नभोवाणी केंद्रात कार्यक्रम निर्माते होते. नंतर 1972 पासून मुंबई दूरदर्शन केंद्रात आले.1992 साली ते तिथे उपसंचालक पदावरून निवृत्त झाले.
त्यांनी सादर केलेले ‘ऐसी अक्षरे ‘, ‘शालेय चित्रवाणी’ व ‘ज्ञानदीप ‘हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले.
1988मध्ये ‘ज्ञानदीप’ या कार्यक्रमावर बीबीसीच्या एलिझाबेथ स्मिथ यांनी 45 मिनिटांचा लघुपट केला. याच कार्यक्रमावर अमिता भिडे यांनी पीएचडी मिळवली.
‘ज्ञानदीप’वर आधारित असलेले ‘ज्योत एक सेवेची’ हे मासिक त्यांनी 25 वर्षे चालवले.
1992मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पहिल्या ‘ज्ञानदीप’ मंडळाची स्थापना केली. त्यांचा विस्तार होऊन राज्यात 1500 मंडळे स्थापन झाली.
त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ वगैरे पाच पुस्तके व बालसाहित्यात 300 गोष्टीची पुस्तके लिहिली.
त्यांच्या ‘माध्यम चित्रवाणी’ या दूरचित्रवाणी या विषयावरील पहिल्या मराठी पुस्तकाला राज्यसरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय त्यांना गोंदियाभूषण व सेवाश्री पुरस्कारही मिळाले.
मालतीबाई किर्लोस्कर
मालतीबाई किर्लोस्कर या विख्यात मराठी संपादक व लेखक शंकरराव किर्लोस्करांच्या कन्या.
त्या सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्या अतिशय सुंदर शिकवत असत.
पक्की वाङ्मयीन व वैचारिक बैठक, भारदस्त व्यक्तिमत्त्व व विपुल व्यासंग ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये. त्या परखड व स्पष्टवक्त्या होत्या.
त्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ मध्ये अधूनमधून लिहीत असत.
‘भावफुले’ व ‘फुलांची ओंजळ’ हे त्यांचे व्यक्तीचित्रसंग्रह प्रसिद्ध आहेत.
13 मार्च 2017 ला त्यांचे निधन झाले.
रमेश मुधोळकर
बालसाहित्यकार व चित्रकार रमेश मुधोळकर (19.07.1935 – 13.03.2016) यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे झाले.पुढे ते मुंबईला आले. तिथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले.
1972मध्ये त्यांचे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध झाले.1974 मध्ये त्यांनी ‘शालापत्रक’ हे मासिक सुरू केले. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे 300 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यात ‘इसाप’, ‘गलिव्हरच्या गोष्टी’, ‘बिरबल आणि बादशहाच्या 175 गोष्टी’ यांचा समावेश आहे.
जयको पॉकेट बुक्स व अमर चित्रकथा तसंच एको बुक्स या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा मोठाच वाटा आहे.
देशोदेशीच्या रसाळ कथा, तसंच खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीत असे बरेच लेखन त्यांनी मराठी व इंग्रजीतून केले. त्याचप्रमाणे शंकरमहाराज व दिगंबरदास महाराज यांच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.
‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ या संस्थेचे ते संस्थापक -सदस्य होते.
2009मध्ये त्यांच्या लेखनाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली.
13 मार्च 2016 मध्ये पुणे येथे त्यांचा देहांत झाला.
कवी दत्त, आकाशानंद, मालतीबाई किर्लोस्कर व रमेश मुधोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया, इंटरनेट. मराठीसृष्टी. कॉम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈