सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मोरेश्वर रामचंद्र पराडकर ऊर्फ मोरोपंत किंवा मयूर पंडित (1729 – 15 एप्रिल 1794) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते.
सुमारे 45 वर्षे अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांनी 75 हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर 268 काव्यकृतींची नोंद आहे.त्यामध्ये ‘आर्याकेकावली’, ‘आर्याभारत’, ‘केकावली’ वगैरे असंख्य ग्रंथांचा समावेश आहे.
मोरोपंतांनी 60हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने वा महिलांसाठी ओवीबद्ध गीते रचली.
त्यांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत. हा प्रकार मराठीत पहिल्यांदा त्यांनीच हाताळला.
‘आर्याभारत’ हे त्यांनी आर्यावृत्तात रचलेले समग्र महाभारत आहे.
विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी त्यांनी 108 रामायणे लिहिली. प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते.
बारामतीतील त्यांच्या वाड्याच्या एका खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द त्यांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून ते आपली काव्ये सजवत असत.
‘झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु यासम हा ‘ व ‘बालिश बहू बायकांत बडबडला ‘ या त्यांच्या उक्ती आजही वापरल्या जातात.
त्यांचे चरित्र व त्यांच्या काव्याची चर्चा करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
☆☆☆☆☆
डॉ. विनायक रा.करंदीकर
डॉ. विनायक रा. करंदीकर (27 ऑगस्ट 1919 – 15 एप्रिल 2013) हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालय येथे प्राध्यापक होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सचिव होते.
त्यांचा संतसाहित्य, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता. रामकृष्ण मठाशी त्यांचा निकटचा संबंध होता
त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संलग्न विविध संस्थांमध्ये काम केले.
दैनिक ‘तरुण भारत’ प्रकाशित करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते.
त्यांनी मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही केले आहे.
ते पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचे आद्य प्राध्यापक होते.
‘कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद’ (आत्मचरित्र),
‘ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण, ‘गोपवेणू’ (कवितासंग्रह), ‘स्वामी विवेकानंद जीवनदर्शन'(स्वामी विवेकानंदांचे त्रिखंडात्मक चरित्र), ‘ज्ञानेश्वरीदर्शन’,’Three Architects of RSS'(इंग्रजी) वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
साहित्य अकॅडमीने प्रकाशित केलेल्या ‘इंडियन मास्टरपीस ‘ या संपादित ग्रंथात त्यांनी ज्ञानदेव- तुकारामांवर लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नड व अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.
कवी मोरोपंत व डॉ. विनायक रा. करंदीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, लोकसत्ता.कॉम – पंकज भोसले.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈