श्री सुहास रघुनाथ पंडित
१५ नोव्हेंबर – संपादकीय
मंगेश तेंडुलकर:
विज्ञानशास्त्राचे पदवीधर असलेले श्री.मंगेश तेंडुलकर कलेच्या शास्त्राचेही उत्तम जाणकार होते.म्हणून तर आपल्या कुंचल्याच्या फटका-याने शब्दांविनाही बरच काही सांगून जाणारे तेंडुलकर एक लोकप्रिय व्यंगचित्रकार, साहित्यक्षेत्रातही आपला ठसा उमटवून गेले. केवळ व्यंगचित्रच नव्हे तर विनोदी लेखन,ललित लेखन ,नाट्य समीक्षा असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे.याहून वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते एक उत्तम वाचक होते.वाचनाला वय,वेळ काळाचे बंधन नसते अशी त्यांची धारणा होती.
त्यांनी पहिले व्यंगचित्र 1954मध्ये काढले.त्यांच्या साहित्य संपदेपैकी भुईचक्र,रंगरेषा व्यंगरेषा हे आत्मचरित्र,संडे मूड हा 53 लेख व व्यंगचित्रांचा संग्रह या काही प्रमुख कलाकृती.
त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं.वि.जोशी पुरस्कार,अ.भा.नाट्य परिषदेचा वि.स.खांडेकर पुरस्कार,व्यसनमुक्ती प्रसारासाठी राज्य शासनाचा पुरस्कार,मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले होते.
15/11/1936 हा त्यांचा जन्मदिवस .त्यांचे निधन 2017मध्ये झाले असले तरी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते अजरामर झाले आहेत.
शिरीष पै–
कथा,कादंबरी,नाट्य,ललित,अनुवाद असे विविध प्रकारचे लेखन केले असले तरी शिरीष पै प्रामुख्याने कवयित्री म्हणूनच लक्षात राहतात.याचे कारण म्हणजे 1975 साली त्यांनी ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार प्रथम मराठीत आणला व रूजवला.त्यांचे स्वतःचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.सुप्रसिद्ध साहित्यिक कै.आचार्य अत्रे यांच्या त्या कन्या.सुरूवातीला त्यांनी अत्रे यांच्या दैनिक मराठा मध्ये पत्रकार म्हणून काम केले.नंतर नवयुग साप्ताहिकाच्या साहित्य पुरवणीचे संपादनही त्यांनी केले.पुढे त्या मराठा च्या संपादिकाही झाल्या.सुमारे 25 वर्षे त्या वृत्तपत्र व्यवसायात कार्यरत होत्या.
त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहील्या.त्या अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवयुग या साप्ताहिकामध्ये भरपूर संधी दिली.कवितांचे नाट्यपूर्ण सादरीकरण हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.
14 कथासंग्रह , 20हून अधिक काव्य व हायकू संग्रह,कादंबरी,आत्ममकथन अशी विपुल साहित्य संपदा त्यांनी निर्माण केलेली आहे.त्यापैकी काही :
कविता संग्रह- अंतर्यामी,आईची गाणी,आव्हान,ऋतुचित्र,एकतारी,कस्तुरी,हायकू इ.
ललित– अनुभवांती,आजचा दिवस,आतला आवाज, खायच्या गोष्टी इ.
कादंबरी– आकाशगंगा,लालन बैरागीण..
कथासंग्रह– उद्गारचिन्हे,कांचनबहार,खडकचाफा, प्रणयगंध इ.
नाटक– कळी एकदा फुलली होती,झपाटलेली
आत्मकथन– वडिलांचे सेवेसी
प्राप्त पुरस्कार–
वडिलांचे सेवेसी ,मी माझे मला आणि ऋतुचित्र या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
एका पावसाळ्यात ला कवी केशवसुत राज्य पुरस्कार.
हायकू निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार.
प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ज्योत्स्ना देवधर,शरदचंद्र आणि अक्षरधन साहित्य सेवा पुरस्कार.
आज त्यांचा जन्मदिन.त्यांची एक काव्यरचना वाचूया ‘कवितेचा उत्सव’ मध्ये.
सुहास शिरवळकर —
‘ टिक टिक वाजते डोक्यात’
अजून कानात घुमतय ना ‘ दुनियादारी ‘ मधलं हे गीत.
प्रचंड गाजलेला हा चित्रपट ज्या दुनियादारी या कादंबरीवर आधारीत होता त्या कादंबरीचे लेखक श्री सुहास शिरवळकर यांचा आज जन्मदिन!त्यांच्या लेखनाची सुरूवात रहस्यकथा लेखनाने झाली.1974 ते 1979 या काळात त्यांनी सुमारे 250रहस्यकथा लिहिल्या.पण त्यानंतर ते सामाजिक विषयावरील कादंबरी लेखनाकडे वळले. रहस्यकथा, लघुकथा, बालकथा,कादंबरी, नभोनाट्य,एकांकिका असे विपुल लेखन त्यांनी केले.
त्यांच्या साहित्यापैकी अतर्क्य,अनुभव,असीम,ऑर्डर ऑर्डर,कणाकणाने,कल्पांत,कोवळीक,दुनियादारी, प्राणांतिक,मर्मबंध,कथापौर्णिमा,इथून तिथून शिवाय स्वर्गावर स्वारी, गर्वहरण, मुर्खांचा पाहुणचार हे बालसाहित्य प्रसिद्ध आहे.
विनोबा भावे —-
थोर स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी विचारवंत लेखक विनायक नरहरी भावे म्हणजेच सर्वांचे परिचित असे विनोबा भावे यांचा आज स्मृतीदिन! (1982).
त्यांचे शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यापीठात,बडोदा येथे झाले.पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त त्यांचे अफाट वाचन,चिंतनशिलता यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व घडत गेले.
त्यांच्या साहित्यापैकी काही प्रमुख कलाकृती म्हणजे अष्टादशी,मधुकर,ईशावास्यवृत्ति,गीताई,गीता प्रवचने,उपनिषदांचा अभ्यास ,निवडक मनुस्मृती ,लोकनीती,साम्यसूत्रे या आहेत.
त्यांना रेमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त झाला होता.तसेच त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
साभार: विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈