१६ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर
*सोपानदेव चौधरी – (१९०७-१९८२)
‘आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगची धून’ हे गाणे ऐकले की आठवतात सोपानदेव चौधरी. अलौकिक प्रतिभेच्या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे, सोपानदेव सुपुत्र. ते रवीकिरण मंडळाचे सभासद होते. यातील सारे सभासद कवी आपल्या कविता गाऊन सादर करत. सोपानदेव चौधरीही आपल्या कविता गाऊनच सादर करायचे. काव्यकेतकी, अनुपमा, छंद , लीलावती इ. त्यांचे कवितासंग्रह आहेत. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून ते गद्य लेखनाकडेही वळले.
एकदा नागपूर येथे कविसंमेलनासाठी त्यांना निमंत्रण होते. त्या प्रमाणे ते गेले. त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखवल्या. श्रोत्यांनाही त्या खूप आवडल्या. पण रिपोर्टमध्ये त्यांचे नाव नव्हते. ते उदास झाले. घरी गेल्यावर बहिणाबाईंनी त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी संगितले. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, ‘कुणी प्राणी मारत होता. ते पाहून तिथून जाणार्या एका माणसाने त्याचा जीव वाचवला. ‘छापून येणार नाही, म्हणून त्याने तसे केले नसते तर ?’ पुढे त्यांचे उत्स्फूर्त उद्गार आहेत,
‘अरे, छापीसनी आलं ते मानसाले समजलं
छापीसनी राहिलं ते देवाला उमजलं’ किती हृद्य आहे त्यांचं हे समजावणं॰ त्या म्हणाल्या, ‘अरे, तुझी सेवा रुजू झाली ना? मग झालं तर!’
शब्दांवर कोटी करण्याचा त्यांचा छंद होता. ‘मी कोट्याधीश’ आहे असे ते म्हणायचे.पुढे पुढे यांना कॅन्सर झाला. त्या काळात हॉस्पिटलमध्ये पडून पडूनही त्यांनी १०-१५ कविता लिहिल्या. एकदा शंकर वैद्य त्यांना भेटायला गेले आणि त्यांच्या अस्थिपंजर देहाकडे पाहून म्हणाले, हे काय हे आप्पा!’ त्यावर ते म्हणाले, ‘आता मी हाडाचा कवी झालो.’अशा त्यांच्या काही आठवणी डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या लेखात सांगितल्या आहेत.
*ना. सं इनामदार (१९२३ ते २००२) नागनाथ संताराम ईनामदार हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी १६ ऐतिहासिक कादंबर्या लिहिल्या. इतिहासातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची ओळख आहे. संशोधन, इतिहासाचे सर्जनशील आकलन, प्रसंगातील नाट्यमयता, चित्रदर्शी शैली त्यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या सगळ्या कादंबर्यांमध्ये राऊ, झेप, शाहेंशाह, मंत्रावेगळा इ. कादंबर्या लोकप्रीय ठरल्या भारतीय ज्ञानपीठाने त्यांच्या राऊ कादंबरीचा राऊ स्वामी या नावाने हिंदीतील अनुवाद प्रकाशित केलाय.
*गो. पु. देशपांडे (१९३८ – २०१३) गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांनी मराठीत नाटके, कविता आणि निबंधही लिहिले. दिल्लीच्या जवाहर विद्यापीठातून चीन हा विषय घेऊन त्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली व याच विषयावर हॉँगकॉँगयेथून पदविका मिळवली. पुढे दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.
त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधून लेखन केले. त्यांनी वैचारिक, राजकीय, रंगभूमीविषयक, साहित्यविषयक, लेखन केले. प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात विचारनाट्याची धारा त्यांनी पहिल्यांदा निर्माण केली. राजकीय जाणीवा ही त्यांच्या लेखनामागची प्रेरणा होती. अंधारयात्रा, उध्वस्त धर्मशाळा, चाणक्य विष्णुगुप्त, रस्ते, शेवटचा दिवस. सत्यशोधक इ. नाटके त्यांनी लिहिली. सत्यशोधक नाटकाचे हिंदीत रूपांतर झाले. याशिवात इत्यादी इत्यादी (कवितासंग्रह) ‘ चर्चक हे निबंधाचे पुस्तक २ भागात, राहिमतपूरकरांची निबंधमाला २ भागात, नाटकी निबंध हा लेखसंग्रह इ. लेखन त्यांनी केलेले आहे.
त्यांच्या साहित्याचे, इंग्रजी, कानडी, हिन्दी, तमीळ, अशाविविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्यावर ‘बहुआयामी गो.पु.’या लघुपटाची निर्मिती झालेली आहे. त्यांनी, शिवाजी, महात्मा फुले, चाणाक्य इ. दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी लेखन केले आहे. चित्रपटांसाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे.
गो. पु. देशपांडे यांना जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कार, संगीत नाटक अॅकॅडमीचा पुरस्कार व मरणोत्तर रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर पुरस्कार लाभले आहेत. (हा पुरस्कार श्रीराम लागूंनी आपल्या मुलाच्या तन्वीरच्या स्मरणार्थ ठेवला आहे.)
श्रीमती उज्ज्वला केळकर
(संपादक मंडळासाठी)
ई अभिव्यक्ती मराठी
संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षणमंडळ, “ साहित्य- साधना दैनंदिनी “ . २) गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈