श्रीमती उज्ज्वला केळकर
१६ नोव्हेंबर – संपादकीय
बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे
कालची पहाट उगवली, ती अतिशय दु:खद बातमी घेऊन. आपल्या अमोघ वाणीने शिवशाहीचे साक्षात दर्शन घडवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या चाहत्यांना वाटत होते, बाबासाहेब नाबाद सेंच्युरी पूर्ण करून पूढील वाटचाल सुरू करणार, पण ईश्वरेच्छा बलीयसी हेच खरं!’शिवचरितराच्या रूपाने घराघरात पोचलेल्या बाबासाहेबांचा जन्म २९ जुलै १९२२चा. बाबासाहेबांना महाराष्ट्र सरकारने २०१५ मधे ‘महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केले. ‘जाणता राजा’ या महानाट्याने त्यांना जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. शंभरीठी त्यांच्या वाणीतला जोश आणि उत्साह कायम होता. ई- अभिव्यक्तीचे लेखक श्री. प्रमोद वर्तक यांनी सार्थपणे म्हंटले आहे,
रडू कसळले गड किल्ल्यांना, हरपला तारणहार तयांचा
आज सर्वां सोडून गेला, कर्ता धर्ता शिवचरित्राचा.
तो शिवशाहीर स्वर्गी गेला, राजांचरणी सेवेस रुजू झाला.
शिवशाहीरांच्या निधनाने, इतिहास पोरका झाला.
या शिवशाहीरांच्या स्मृतीस आज विनम्र अभिवादन.?
☆☆☆☆☆
१६ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे जन्मलेले डॉ. निर्मलकुमार फडकुले जसे संतसाहित्याचे आभासक होते, तसेच ते परिवर्तनवादी विचारसरणीचे अध्वर्यू होते. ते ललित लेखक होते आणि समीक्षकही होते. ते उत्तम वक्ते होते. त्यांच्या वक्तृत्वाला एक वेगळाच डौल होता. त्यांच्या व्याख्यानात चिंतनशीलता, वैचारिकता आणि सौंदर्य यांचा सुरेख मेळ होता. त्यांचे वडील पंडीत जीनशास्त्री, हे सस्कृत भाषेचे मोठे विद्वान होते.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा ‘लोकहितवादी : काल आणि कर्तृत्व’ हा संशोधनाचा प्रबंध होता. नांदेड आणि नंतर सोलापूरयेथील संगमेश्वर कोलेज येथे त्यांनी अध्यापन केले. त्यांनी ललित लेखन केले, त्याचप्रमाणे संतसाहित्यावरही विपुल लेखन केले.
अमृतकण कोवळे , अश्रूंची कहाणी,आनंदाची डहाळी, कल्लोळ अमृताचे, काही रंग काही रेषा, चिंतनावच्या वाटा , परिवर्तनाची चळवळ, मन पाखरू पाखरू, , संतकवी तुकाराम: एक चिंतन, संत साहित्य आणि समकालीन संतांच्या रचना, संत साहित्य: सौंदर्य आणि सामर्थ्य, साहित्यातील प्रकाशधारा, सुखाचा परिमळ,हिरव्या वाटा इ. त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. त्यांची स्वतंत्र अशी २८ पुस्तके आहेत व ११ पुस्तके त्यांनी संपादित केलीत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी आंबेडकर , कवी कुंजविहारी, ना.सी. फडके, प्र.के. अत्रे, म. फुले, सावरकर यांच्यावर दिलेली व्याख्यानेही लिखित स्वरुपात प्रकाशित आहेत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना साहित्य समेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही अनेक वेळा मिळाला आहे. राष्ट्रीय बंधुता समाज साहित्य संमेलन, जैन साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन इ. साहित्य संमेलनानचे ते अध्यक्ष होते.
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा, आचार्य कुंदकुंद, विद्यानंद साहित्य, प्रज्ञावंत, चरित्र चक्रवर्ती, भैरूरतन दामाणी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण जीवनगौरव इ. पुरस्कार मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फेही २००७ पासून दरवर्षी साहित्य व समाजासेवेतील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.
राज्य मराठी विकास संस्थेचे ते काही काळ संचालक होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्यावर साहित्य: सामाजिक अनुबंध हा गौरव ग्रंथ तयार करण्यात आला आहे. सोलापूरयेथील एका सभागृहाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
. . या महान लेखकाला आणि वक्त्याला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.?
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २.इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈