सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सुप्रसिद्ध  मराठी लेखक, नाटककार, पत्रकार श्री. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचा आज स्मृतीदिन. ( १४ ऑगस्ट १९२५—१६ सप्टेंबर १९९४)

जयवंत दळवी यांचा जन्म गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले. बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. श्रमदान मोहिमेतही ते उत्साहाने भाग घेत.  मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय.मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी ते आले होते. पण डिप्लोमा पूर्ण होण्याआधीच ते मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात रुजू झाले. तेथून ते ‘लोकमान्य’ मध्ये गेले. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात (युसिस) त्यांनी नोकरी स्वीकारली. पण लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून वयाच्या पन्नासाव्या वर्षीच  स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

दळवींचे बालपण तीस-चाळीस माणसांच्या, जुन्या परंपरा प्राणपणाने जपणाऱ्या एकत्र कुटुंबात गेले. कुटुंबात विकेशा विधवा होत्या, वेडगळ व्यक्ती होत्या, वेगवेगळ्या वृत्तींची-विकारांची माणसे होती. संस्कारक्षम वयात दळवींचा संपर्क अशा माणसांशी आला. त्यावेळी पाहिलेल्या, मनावर ओरखडे उठवणाऱ्या,आयुष्यातील वेगवेगळ्या भोगांचे,अतृप्त वासनांचे, सुख-दुःखांचे दशावतार, विकार-वासनांच्या आवर्तात हेलपाटणारी, गोंधळली माणसे, या सगळ्याचे वास्तव चित्रण त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यात पदोपदी दिसून येते . 

त्यांची पहिली कथा ‘दातार मास्तर’ १९४८मध्ये ‘नवा काळ’ दैनिकात प्रसिद्ध झाली. आणि त्यानंतर त्यांची  लेखणी थांबलीच नाही. विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. ‘गहिवर’ (१९५६), ‘एदीन’ (१९५८), ‘रुक्मिणी’ (१९६५), ‘स्पर्श’ (१९७४) आदी १५ कथासंग्रह; ‘चक्र’ (१९६३), ‘स्वगत’ (१९६८), ‘महानंदा’ (१९७०), ‘अथांग’ (१९७७), ‘अल्बम’ (१९८३) आदी २१ कादंबर्‍या; ‘संध्याछाया’ (१९७४), ‘बॅरिस्टर’ (१९७७), ‘सूर्यास्त’ (१९७८), ‘महासागर’ (१९८०), ‘पुरुष’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९१) आदी १९ नाटके दळवींनी लिहिली आणि त्यातील बहुतेक पुस्तके गाजली. ‘ लोक आणि लौकिक ’ हे त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन आणि ‘ सारे प्रवासी घडीचे ’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे, चित्रण करणारे, विनोदी ढंगाने लिहिलेले पुस्तक खूप वाचकप्रिय ठरले.

दळवींची ‘चक्र’ ही पहिलीच अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी. एकूणच मराठी कादंबरीच्या अनुभवक्षेत्राची कक्षा वाढविणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी कादंबरी म्हणून ती वाखाणली गेली. मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तिथे रहाणार्‍यांचे उघडे-नागडे आयुष्य चितारताना, बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध त्यांनी घेतला आहे. त्यांना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव यासाठी फार उपयोगी ठरले होते हे सहज लक्षात येते. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्रविचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी या कादंबरीत केले आहे. विशेष म्हणजे, या कादंबरीतील व्यक्तिचित्रे, जी त्यातील कथेपेक्षाही महत्त्वाची आहेत, ती दळवींनी फार प्रभावीपणे उभी केली आहेत. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून ‘चक्र’चा उल्लेख केला जातो. 

याव्यतिरिक्त, आणखी कितीतरी कादंबऱ्या, कथा, व्यक्तिचित्रणे, आत्मचरित्र,  स्तंभलेखन, यांचा समावेश असणारी त्यांची विपुल साहित्यसंपदा प्रसिद्ध झालेली आहे. लेखन मर्यादेमुळे त्या सर्व लेखनाचा तपशील इथे देता येत नाही याची खरंच खंत वाटते. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या या सर्वच लेखनात सहजपणा आहे, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. ‘. ‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करून ‘ललित’ मासिकात त्यांनी ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. त्यातून अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठच त्यांनी जाणत्या वाचकांसमोर ठेवला. एकंदरीतच मराठी वाङ्मयव्यवहारातील अनिष्ट, अर्थशून्य आणि वाङ्मयविकासाला मारक ठरणार्‍या अनेकविध प्रवृत्ती त्यांच्या लेखनातून त्यांनी सहजपणे लोकांसमोर आणल्या. गंभीर कथालेखनाबरोबर दळवींनी विनोदी लेख व कथाही लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्‍या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र ‘विनोदी लेखक’ म्हणून आपल्यावर शिक्का पडावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे पथ्य त्यांनी नेहमीच पाळले. प्रत्यक्षात मात्र ते सदैव प्रसन्न, विनोदी, मिश्किल बोलणारे, चेष्टा करणारे, दुसर्‍यांच्या विनोदाला खळखळून हसून दाद देणारे असे होते. पण ते माणसांत रमणारे असले, तरी वृत्तीने एकाकी होते. 

 ‘ठणठणपाळ’ विषयी ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे की, “ ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला व कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक विभागाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता.”  

दळवी चतुरस्र प्रतिभेचे लेखक होते. ‘इमोशन अ‍ॅन्ड इमॅजिनेशन अ‍ॅन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून त्यांनी एम.ए.साठी प्रबंधही सादर केला होता. ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस’ (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाल्यानंतर, इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खूप प्रयत्‍न केले. मराठी साहित्याला त्यांनी दिलेले योगदान खरोखरच फार महत्त्वाचे आहे. 

महाराष्ट्र शासनाचे, नाट्य परिषदेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण गर्दीपासून ते कायम दूर राहिले. सार्वजनिक सभांमध्ये त्यांनी कधीही सक्रिय भाग घेतला नाही. सभा संमेलने टाळली. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही  त्यांनी नाकारले. 

त्यांच्या लिखाणावरून काही चित्रपट कथा / पटकथा, आणि एकांकिकाही लिहिल्या गेल्या आहेत. तसेच त्यांच्या साहित्यावर भाष्य करणारी “ दु:खाची स्वगते “ ( त्यांच्या १७ कादंबऱ्यांच्या अभ्यासावर आधारित ), “ पत्ररूप दळवी,” “बेस्ट ऑफ जयवंत दळवी “, अशासारखी काही पुस्तकेही लिहिली गेली आहेत. 

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी  “जयवंत दळवी स्मृती पुरस्कार“ दिला जातो. 

असे चतुरस्त्र साहित्यिक श्री. जयवंत दळवी यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments