? १७ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ?
आज 17 ऑक्टोबर. मराठी साहित्यातील वेगवेगळ्या वाटेने जाणा-या तीन सारस्वतांचा आज स्मृतीदिन!
पाणिनी हे संस्कृत भाषेचे व्याकरणकार. पण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आज स्मृतीदिन. ते व्याकरणकार तर होतेच.पण त्याशिवाय त्यानी विपुल लेखन केले आहे. मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज या संस्थांचे ते संस्थापक सदस्य होते. मराठी बरोबरच त्याना फार्शी व संस्कृत भाषेचे ज्ञानही होते. इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली होती.
महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे व्याकरणाचे पहिले पुस्तक त्यांनी 1836 मध्ये प्रकाशित केले. त्याची सुधारित दुसरी आवृत्ती 1850 ला निघाली. 1865मध्ये मराठी लघुव्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या शिवाय त्यांनी आत्मचरित्र, वैचारिक, शैक्षणिक, नकाशा संग्रह असे विपुल लेखन केले आहे.
कोकणातील उफळे या गावी जन्मलेले श्री रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गेले. पुढे ते अर्थशास्त्राचे पदवीधर झाले.मराठी साहित्यात ललित गद्य लेखनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कथा, कादंबरी, प्रवासवर्णन,आत्मपरलेखन, ललित असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. सुमारे 32 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.त्यात प्रामुख्याने ललित लेख संग्रह आहेत.निवडक पिंगे या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या तीनशे पैकी 26 नामवंत व्यक्तींच्या व्यक्तिरेखा आहेत. पाश्चात्य साहित्याचा परिचय करून देणारी पश्चिमेचे पुत्र, हिरवी पाने या सारखी पुस्तकेही त्यानी लिहीली आहेत. हलकी फुलकी लेखनशैली, काव्यात्मक लेखन, मराठी आणि इंग्रजी साहित्याच्या व्यासंगाचे दर्शन, प्रचंड प्रवासातील सूक्ष्म निरीक्षणे ही त्यांच्या लेखना ची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री.के.ज.पुरोहित उर्फ शांताराम यांचा आज स्मृतीदिन. अंधारवाट, चंद्र माझा सखा, मनमोर, संध्याराग शांतारामकथा इ.पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. याशिवाय प्रातिनिधिक लघुनिबंधसंग्रह, मराठी कथा विसावे शतक, मराठी विश्वकोश यासारख्या ग्रंथांचे त्यांनी संपादन व सहसंपादन केले आहे. शांताराम या नावाने त्यांनी विपुल कथालेखन केले आहे.
मराठी साहित्यातील या तीन साहित्यिकांना सादर प्रणाम.
श्री सुहास रघुनाथ पंडित
(संपादक मंडळासाठी)
ई अभिव्यक्ती मराठी
संदर्भ: विकिपीडिआ, इंटरनेट.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈