श्री सुहास रघुनाथ पंडित

? १७ जानेवारी –  संपादकीय  ?

ज्योत्स्ना देवधर :

मागच्या पिढीतील ख्यातनाम लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचा आज स्मृतीदिन.

त्यांनी हिंदी विषयात पुणे येथे एम.ए. व नंतर, वर्धा येथे साहित्य विशारद ही पदवी  संपादन केली. त्यांचे लेखन हिंदी व मराठी या दोन्ही भाषेत झाले आहे. 1960 मध्ये त्या आकाशवाणी पुणे येथे कार्यरत होत्या. तेव्हा ‘गृहिणी’ या मालिकेत  त्यांनी  ‘माजघरातल्या गप्पा’ चे लेखन केले  होते व ते खूप लोकप्रिय झाले होते.

त्यांच्या लेखनाची सुरूवात ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहाने झाली. घरगंगेच्या काठी ही त्यांची पहिली मराठी कादंबरी. ती प्रचंड लोकप्रिय ठरली. नंतर या कथानकावर याच नावाने मराठी चित्रपटही निघाला होता. या व अन्य कादंब-या, कथा यांचा विचार करता असे दिसते की त्यांचे लेखन हे स्त्रीयांची  दुःखे, वेदना मांडणारे असे  वास्तववादी होते. त्यामुळे ते मनाला जाऊन भिडणारे होते.

त्यांच्या लेखनाचा यथोचित सन्मानही झाला आहे. घरगंगेच्या काठी या कादंबरीला ह. ना. आपटे पुरस्कार मिळाला आहे. रमाबाई हे चरित्र, कॅक्टस हा हिंदी कथासंग्रह व निर्णय हे पुरूष पात्र विरहीत नाटक यांनाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अ. भा. भाषा साहित्य संमेलनात त्यांना ‘भाषाभूषण’ म्हणून गौरविले आहे. कराड येथे झालेल्या प. महाराष्ट्र कथालेखिका संमेलनाचे अध्यक्षपद त्यानी भूषविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदचंद्र चटर्जी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.

कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, ललित असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.त्यापैकी काही:

कादंबरी:  अट, उणे एक, एक अध्याय, एक श्वास आणखी, कडेलोट, कल्याणी, पडझड, घरगंगेच्या काठी, चूकामूक इ.

कथासंग्रह:  अंतरा(हिंदी), आंधळी कोशिंबीर, उध्वस्त, गजगे, गा-या गा-या भिंगो-या, दवबिंदू, झरोका, निवांत, विंझणवारा इ.

ललित: आठवणीचे चतकोर, चेहरा आणि चेहरे, मावळती, मूठभर माणुसकी इ.

चरित्र:  उत्तरयोगी (योगी अरविंद), रमाबाई(रानडे), याशिवाय नाटक, ऐतिहासिक कादंबरी, बालवाड्मय, पटकथा, संवाद लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या अनेक कथांचे कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम, आसामी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

अशा विविधांगी लेखन करणा-या बहुभाषिक लेखिका ज्योत्स्ना देवधर यांना नम्र अभिवादन!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments