सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १७ डिसेंबर –  संपादकीय  ?

कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संपादक आणि संग्राहक अशी विशेष ओळख असणारे श्री. चिंतामण गणेश कर्वे यांचा आज स्मृतिदिन. ( ४/२/१८९४ –१७/१२/१९६० ) 

श्री. कर्वे यांनी रूढार्थाने साहित्यनिर्मिती केली नसली, तरी अशा निर्मितीसाठी अत्यावश्यक सहाय्य करणाऱ्या शब्दकोशांच्या निर्मितीचे फार महत्वाचे आणि मोठे काम त्यांनी करून ठेवलेले आहे. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ‘ ज्ञानकोश ‘ प्रकल्पात काम करताकरता त्यांनी ‘कोश संपादन ‘ म्हणजे नेमके काय , त्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन असणे, कुठचाही पूर्वग्रह न बाळगता काळाबरोबर विस्तारणाऱ्या ज्ञानाच्या कक्षांचा सतत वेध घेणे, यासारख्या महत्वाच्या आणि अशासारख्या, कुठल्याही कोशाच्या निर्मितीसाठी मर्मस्थानी  असणाऱ्या गोष्टी आत्मसात केल्या. आणि ज्ञानकोशाचे काम पूर्ण झाल्यावर काही सहकाऱ्यांच्या मदतीने “ महाराष्ट्र शब्दकोश, खंड १ ते ७ “ याची निर्मिती केली. मराठी भाषेत तयार केलेला हा व्यापक स्वरूपाचा पहिला सर्वसमावेशक कोश समजला जातो. त्यासाठी वऱ्हाडी, खानदेशी, कोंकणी, बागलाणी, अशासारख्या वेगवेगळ्या रूपातल्या पण मराठी म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या ज्या ज्या भाषा बोलल्या जातात, अशा बोलीभाषांमधले शब्दसंग्रहही त्यांनी प्रयत्नपूर्वक गोळा केले होते. या शब्दकोशाच्या रूपाने त्यांनी भाषेच्या अभिवृद्धीचे कायमस्वरूपाचे आणि संस्मरणीय असे मोठेच काम करून ठेवले आहे. याव्यतिरिक्त ‘ सुलभ विश्वकोश ‘–६ भाग, ‘ संयुक्त महाराष्ट्र ज्ञानकोश ‘- दोन खंड, ‘ महाराष्ट्र परिचय ‘, असे इतर कोशही त्यांनी स्वतंत्रपणे संपादित केलेले आहेत, ज्यातून वाचकांना बऱ्याच गोष्टींची विस्तृत माहिती उपलब्ध होईल. 

पाश्चात्य नीतिशास्त्र , सुबोधन आणि धर्मचिन्तन, मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी, असे वेगळ्याच विषयांवरचे ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत. 

‘ लोकसाहित्य ‘ या त्यांच्या आवडत्या विषयातल्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची नोंद घेत, महाराष्ट्र शासनाने १९५६ साली स्थापन केलेल्या ‘ लोकसाहित्य समिती ’चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. 

ज्ञानोपासक आणि  ज्ञानसंग्राहक अशी ख्याती प्राप्त केलेल्या ‘ कोशकार ’ कर्वे यांना विनम्र श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

संस्कृतचे प्रगाढ पंडित असणारे श्री. श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर यांचा आज स्मृतिदिन. 

( २/८/१८७७ – १७/१२/१९४२ ) 

मुंबई विद्यापीठाचे मराठी विषयात एम.ए. केलेले हे पहिले विद्यार्थी (सन १९०३ ). कवी आणि साहित्य-समीक्षक म्हणून ते सर्वांना परिचित झालेले होते. याच्या जोडीने त्यांना नाटकाची विशेष आवड असल्याने, “ उत्तम नाटक कसे असावे “ याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्यामुळे तेव्हाची ‘ नाटक मंडळी ‘ आणि अभिनेते नेहेमी त्यांचे मार्गदर्शन घेत असत. ते अभिनय-क्षेत्रातलेही जाणकार असल्याने, अनेक नटांनी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले होते. 

‘ एकावली ‘ हा एकश्लोकी कवितांचा संग्रह ( सन १९३३ ), ‘ गुणसुंदरी ‘ या नावाने, सरस्वतीचंद्र नावाच्या गुजराथी कादंबरीचा मराठी अनुवाद ( सन १९०३ ), आणि ‘ सुवर्णचंपक ‘ हा १९२८ सालातला काव्यसंग्रह, असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झालेले होते. 

पुण्यामध्ये १९२३ साली भरलेल्या १९ व्या, आणि १९२७ साली भरलेल्या २२ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते. 

काव्यसमीक्षेचा महत्वाचा भाग असणाऱ्या ‘ काव्यातील रसव्यवस्था ‘ या विषयावर महत्वपूर्ण लेखन करणारे श्री. श्री. नी  चापेकर यांना मनापासून अभिवादन. 

☆☆☆☆☆

साहित्यक्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज म्हणून सुपरिचित असणारे श्री. मधुसूदन कालेलकर यांचा आज स्मृतिदिन. ( २२/३/१९२४ – १७/१२/१९८५ )

गणेशोत्सवाच्या निमित्ताने लिहिलेले एक नाटक, ही त्यांच्या लिखाणाची सुरुवात. इथेच त्यांनी साहित्यक्षेत्रात आपले पाऊल ठामपणे रोवले, आणि पुढची कितीतरी वर्षे त्यांनी विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. नाटककार, कथाकार, कवी म्हणून प्रसिद्धी मिळवत असतांनाच, मराठी आणि हिंदी चित्रपट-विश्वात ते गीतकार आणि पटकथाकार म्हणून ख्यातनाम झाले. त्यांनी थोडीथोडकी नाही तर एकूण २९ नाटके, आणि मराठी व हिंदी मिळून तब्बल १११ चित्रपटकथा लिहिल्या होत्या. त्यामध्ये कौटुंबिक, सामाजिक, गंभीर, विनोदी, असे अनेक विषय हाताळले होते. त्यांची अनेक नाटके गुजराती भाषेत अनुवादित झाली आहेत, ज्याचे प्रयोग अजूनही होताहेत. काही नाटकांवर मराठी, तसेच हिंदी चित्रपटही झाले आहेत. त्यांनी स्वतः चार नाटकांची निर्मितीही केलेली होती. ‘ बात एक रातकी ‘, ‘ झुमरू ‘, ‘ ब्लफ मास्टर ‘, अखियोंके झरोकेसे ‘, गीत गाता  चल ‘,’ फ़रार ‘, हे त्यांचे काही नावाजलेले हिंदी चित्रपट. त्यांच्या ‘  दुल्हन वही जो पिया मन भाये ‘ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा  १९७८चा सर्वोत्तम पटकथालेखक हा पुरस्कार मिळाला होता. 

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात, सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद, यासाठी दिले जाणारे पुरस्कार त्यांना नऊ वेळा दिले गेले होते. ‘ आम्ही जातो आमुच्या गावा ‘, ‘ पाहू रे किती वाट ‘,

‘ अपराध ‘, ‘ जावई विकत घेणे आहे ‘, ‘ अनोळखी ‘, हे त्यातले काही चित्रपट. ‘ हा माझा मार्ग एकला ‘ या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना मिळालेले इतर पुरस्कार असे —-    

‘ निंबोणीच्या झाडाखाली –’ या त्यांच्या अंगाईगीताला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार.

रसरंग- फाळके गौरव पुरस्कार ( हा त्यांना तीन वेळा दिला गेला आहे. )

गदिमा प्रतिष्ठानकडून उत्कृष्ट लेखक म्हणून विशेष गौरव व पुरस्कार. 

‘ जन्मदाता ‘ या चित्रपट कथेला गुजरात शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार ( मरणोत्तर ). 

‘ मधुघट ‘ हा त्यांनी लिहिलेला व्यक्तिचित्र-संग्रह, ज्याला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. 

‘ तो राजहंस एक ‘ हे त्यांच्या या प्रदीर्घ साहित्यिक कारकिर्दीवर लिहिलेले पुस्तक, श्री रमेश उदारे यांनी संपादित केलेले आहे. 

श्री. कालेलकर यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments