सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी)
उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे, आणि परिवर्तनाला फक्त चालनाच नाही तर दिशाही देणारे साहित्यिक , लोककवी , आणि समाजसुधारक म्हणून सुपरिचित असणारे श्री. तुकाराम भाऊराव उर्फ अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन . ( १/८/१९२० – १८/७/१९६९ ) .
सुरुवातीला मार्क्सवादी आणि नंतर आंबेडकरवादी विचारसरणी अवलंबणारे श्री. अण्णा साठे यांच्या साहित्याचे योगदान महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि सामाजिक परिवर्तनात महत्वाचे ठरलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसात रुजवण्याचे आणि त्या चळवळीसाठी लोकांना प्रेरित करण्याचे महत्वाचे काम करण्यात अण्णांचा मोलाचा आणि मोठा वाटा होता. मुख्यतः याच हेतूने त्यावेळी त्यांच्या ‘ लालबावटा कलापथकाचे ‘ कार्यक्रम तेव्हाच्या मुंबई प्रांतातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये हजारो ठिकाणी त्यांनी सादर केले होते.
त्यांच्या लिखाणावरून ते उपजतच बुद्धिवान होते आणि बुद्धिवादीही होते असे नक्कीच म्हणायला हवे. त्यामुळे, केवळ आपल्या अतिशय प्रभावी लेखनाच्या माध्यमातून जनजागृतीचे एवढे काम करणारे अण्णा, स्वतः प्रत्यक्षात फक्त दीडच दिवस शाळेत गेले होते, यावर सहज विश्वास बसणार नाही. त्यांच्या याच पथकाच्या माध्यमातून त्यांनी तेव्हाच्या अनेक सरकारी निर्णयांना परिणामकारकपणे आव्हान दिले होते.
पुढे श्री.आंबेडकरांच्या शिकवणुकीला अनुसरून ते दलितांसाठी कार्यरत झाले , आणि दलितांच्या जीवनातले अनुभव आपल्या कथांमधून प्रभावी भाषेत व्यक्त करू लागले—आणि तिथेच ’ पहिला दलित लेखक’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. १९५८ साली मुंबईत झालेल्या पहिल्या दलित संमेलनात आपल्या उदघाटनाच्या भाषणातून त्यांनी दलित आणि कामगारवर्गाचे जागतिक स्तरावर असलेले महत्व ठासून अधोरेखित केले.
प्रतिभेचं लेणं लाभलेल्या अण्णांचे बहुतेक सर्व लेखन गंभीर स्वरूपाचे, पोटतिडिकीने लिहिल्याचे आवर्जून जाणवते. त्यांच्या एकूण ३५ कादंबऱ्या, आणि १५ लघुकथा संग्रह प्रकाशित झाले. आणि या संग्रहातल्या बऱ्याच लघुकथांचे इतर अनेक भारतीय भाषांमध्ये आणि २७ अभारतीय भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत. याव्यतिरिक्त ३ नाटके, १२ पटकथा , पोवाडा शैलीतील १० गाणी, आणि ‘ कविता आणि माझा रशियाचा प्रवास ‘ हे प्रवासवर्णनही अण्णांनी लिहिलेले आहे. लेखन मर्यादेमुळे त्यांच्या मोजक्याच साहित्याचा उल्लेख इथे करावा लागतो आहे याचा खेद वाटतो.
१. लोकनाट्य — अकलेची गोष्ट , कापऱ्या चोर , देशभक्त घोटाळे , पुढारी मिळाला , लोकमंत्र्यांचा दौरा ,
शेटजींचे इलेक्शन , मूक मिरवणूक , इत्यादी .
२. कथासंग्रह —कृष्णाकाठच्या कथा , गजाआड , जिवंत काडतूस , निखारा , पिसाळलेला माणूस , फरारी , इ.
३. कादंबऱ्या — आवडी , गुलाम , चिखलातील कमळ , पाझर , फकिरा , माकडीचा माळ , रानगंगा ,
वारणेचा वाघ , वैजयंता , रत्ना , इत्यादी.
४. नाटक —– इनामदार , पेंग्याचं लगीन , सुलतान .
त्यांच्या “ फकिरा “ या कादंबरीला सन १९६१ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या लोककथात्मक शैलीमुळे त्यांचे पोवाडे आणि लावण्या लक्षणीय प्रभावकारक ठरल्या होत्या. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित असणारे – वैजयंता , टिळा लावते मी रक्ताचा , डोंगरची मैना , वारणेचा वाघ , फकिरा , अशासारखे चित्रपटही खूप गाजले .
त्यांच्या व्यक्तित्वावर, कर्तृत्वावर आणि साहित्यावर आधारित असणारी जवळपास १२ पुस्तके वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहेत .
त्यांच्या नावाने “ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ “ स्थापन केले गेले आहे . तसेच त्यांच्या नावाने साहित्य संमेलनही भरवले जाते.
असे बहुरंगी व्यक्तिमत्व लाभलेले, आणि कायम जनजागृतीला वाहून घेतलेले समृद्ध साहित्यिक श्री. अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈