सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (6 जानेवारी 1812 –   18 मे 1846) हे मराठीतील आद्य पत्रकार होते. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून ते मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ठरले.

सुरुवातीला घरीच वडिलांकडे त्यांनी मराठी व संस्कृतचा अभ्यास आरंभला.1825 मध्ये मुंबईत येऊन ते बापू छत्रे व बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. शिवाय गणित व शास्त्र यातही त्यांनी प्रावीण्य मिळवले.’बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात ज्ञान कमवून 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून ते नियुक्त झाले.त्यांच्यात पांडित्य व अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता.

बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते.

गणित व ज्योतिष यांत पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नेमणूक झाली.

बाळशास्त्रींना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास या विषयांचे उत्तम ज्ञान होते. म्हणून तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली. या काळात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्या काळात पाठ्यपुस्तके तयार करण्याचे कठीण कामही त्यांनी केले.

बाळशास्त्रींनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांवर शोधनिबंध लिहिले.ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते.

मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हातात दिली.

त्यांनी मराठी भाषेत ‘शून्यलब्धी’ हे पहिले पुस्तक लिहिले.

पारतंत्र्य, तसेच अज्ञान, अंधश्रद्धा वगैरेंनी ग्रासलेल्या समाजाचे प्रबोधन करण्यासाठी गोविंद विठ्ठल कुंटे व भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्रात मराठी व इंग्रजी भाषेत मजकूर असायचा. 6 जानेवारी 1832 ते जुलै 1840 अशी साडेआठ वर्षे हे वृत्तपत्र चालले.

यासोबतच त्यांनी 1840 साली ‘दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना यांत मदत करीत. लोकांची आकलनक्षमता वाढवणाऱ्या या मासिकात ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, निसर्गविज्ञान, व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास वगैरे विषयांवर नकाशे, आकृत्यांसह लेख प्रकाशित करीत. त्यांनी 5वर्षे या मासिकाचे संपादन केले.

जांभेकरांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ची  स्थापना केली.

विधवांचा पुनर्विवाह व वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी त्यांनी विपुल लेखन केले.विधवाविवाहाचा शास्त्रीय आधार शोधून गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा ग्रंथ लिहून घेतला.

आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वी अपेक्षित होता. ते द्रष्टे समाजसुधारक होते.

त्यांनी ‘नेटिव्ह इम्प्रूव्हमेन्ट सोसायटी’ची स्थापना केली. त्यातून ‘स्टुडन्टस लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड वगैरे दिग्गज कार्यरत झाले.

ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची त्यांनी व्यवस्था केली.

फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता.

1840 मध्ये त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’करण्यात आले.

6जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. याच तारखेला त्यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करायला सुरुवात केली. म्हणून महाराष्ट्रात 6जानेवारी हा ‘पत्रकार दिवस’म्हणून साजरा केला जातो.

बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments