सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

शिवाजी सावंत

शिवाजी गोविंदराव सावंत (31 ऑगस्ट 1940 – 18 सप्टेंबर 2002) हे लेखक व मुख्यत्वे कादंबरीकार होते. त्यांची ‘मृत्युंजय’ ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते.

शिवाजी सावंतांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात, एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण तिथेच झाले. नंतर कोल्हापुरात बी. ए. चे प्रथम वर्ष पूर्ण करून त्यांनी G. C.D. ही वाणिज्य शाखेतील पदविका घेतली.

टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून काही काळ त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली. नंतर 1962 ते 1974 या काळात ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत शिक्षक होते.

पुढे 1974ते 1980 या काळात त्यांनी पुण्यात महाराष्ट्र सरकारच्या शिक्षणविभागाच्या ‘लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक व नंतर संपादक म्हणून काम केले.1983मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी  फक्त लेखनावरच लक्ष केंद्रित केले.

प्रदीर्घ संशोधन, चिंतन, मनन यातून त्यांची रससंपन्न अशी ‘मृत्युंजय’ ही वास्तववादी कादंबरी जन्माला आली.

यानंतर त्यांनी ‘छावा’ व ‘युगंधर’ या कादंबऱ्या, ‘कवडसे’, ‘कांचनकण’ हे ललित निबंधसंग्रह, ‘अशी मने,असे नमुने’, ‘मोरावळा’ इत्यादी व्यक्तिचित्रे, ‘ लढत’  व  ‘संघर्ष’ ही चरित्रे लिहिली. त्यांनी ‘छावा’ व ‘मृत्युंजय’चं नाट्यरूपांतरही केलं.

त्यांची काही पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत.

‘मृत्युंजय’ या कादंबरीवर आधारलेली काही मराठी, हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली आहेत.

1995 पासून काही वर्षे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते.

1983 मध्ये बडोदा येथे भरलेल्या बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

‘मृत्युंजय’साठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार, ललित मासिकाचा पुरस्कार, भारतीय ज्ञानपिठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’, ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ व इतरही अनेक पुरस्कार मिळाले.

प्रतिमा दवे यांनी केलेल्या ‘मृत्युंजय’च्या गुजराती भाषांतराला गुजरात सरकारचा व केंद्रीय असे दोन साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाले.

‘छावा’साठीही शिवाजी सावंतांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

सावंतांना पुणे विद्यापीठाचा व महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार, तसेच ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्कार मिळाला.

भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

पुणे येथील ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’तर्फे दर वर्षी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य आणि स्मृती समाजकार्य या नावाचे दोन पुरस्कार देण्यात येतात.

त्यांच्या जन्मगावातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने दर वर्षी मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार देण्यात येतो.

भालचंद्र फडके

भालचंद्र दिनकर फडके (13 मे 1925 ते 18 सप्टेंबर 2004) हे मान्यवर समीक्षक होते.

त्यांचा जन्म धारवाड येथे झाला. सोलापूरला शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झालं. पुणे विद्यापीठातून मराठी घेऊन एम. ए. केल्यानंतर त्यांनी मराठी कथा या विषयावर विद्यावाचस्पती (पी एच. डी.) ही पदवी मिळवली.

सुरुवातीला फडकेंनी भारतीय युद्ध खात्यात नोकरी केली. नंतर निवृत्तीपर्यंत ते अध्यापन करत होते. प्रथम माध्यमिक शिक्षक, नंतर महाविद्यालयात 14 वर्षे अध्यापन केल्यानंतर ते पुणे विद्यापीठात अधिव्याख्याता, मग प्रपाठक व शेवटी निरंतर प्रौढ शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाले.

त्यांची समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी, साक्षेपी व प्रेरणा देणारी होती.

‘सहा कथाकार’ हे संकलन, ‘कथाकार खानोलकर’, तसेच ‘मराठी लेखिका : चिंता आणि चिंतन’, ‘दलित साहित्य -वेदना आणि विद्रोह’ या समीक्षा आणि ‘समुद्रकाठची रात्र’ ही त्यांची काही पुस्तके. डॉ. आंबेडकरांवर त्यांनी चरित्रपर लेखन केले.

1973 ते 1976 या काळात ‘मराठी साहित्य पत्रिका’चे (पुणे)ते संपादक होते. त्यांची संपादकीय व समीक्षकीय दृष्टी चिकित्सक होती.

आज शिवाजी सावंत व भालचंद्र फडके यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली.🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, विवेक महाराष्ट्र नायक.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments