१९ ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
आज १९ ऑक्टोबर. सुप्रसिद्ध मराठी गीतकार आणि कवी श्री. शांताराम नांदगावकर यांचा जन्मदिन. ( १९/१०/१९३६ –११/७/२००९ )
श्री. नांदगावकर यांनी अनेक भावगीते, आणि मराठी चित्रगीते लिहिली. अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमतजंमत, पैजेचा विडा , नवरी मिळे नवऱ्याला, यासारख्या कितीतरी गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते, त्या चित्रपटांइतकीच लोकप्रिय झालेली आहेत. हरीनाम मुखी रंगते, सूर सनईत नादावला, ससा तो ससा की कापूस जसा, सजल नयन नित धार बरसती, विसर प्रीत विसर गीत, रुपेरी वाळूत माडांच्या बनात, प्रीतीच्या चांदराती, अशी त्यांची कितीतरी भावगीते रसिक कधीच विसरणार नाहीत. ‘ हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला ‘ हे जगप्रसिद्ध क्रिकेटवीर सुनील गावसकर यांनी गायलेले गाणे श्री. नांदगावकर यांच्या लेखणीतूनच उतरलेले आहे. याव्यतिरिक्त, १९८७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काढलेल्या “ दलितांचा
राजा “ या अल्बमसाठी त्यांनी अतिशय सुरेख गीते लिहिलेली आहेत.
आणखी एक विशेष म्हणजे, १९८५ साली श्री. नांदगावकर शिवसेनेतर्फे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर निवडून गेले होते. आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांना मनःपूर्वक आदरांजली .
☆☆☆☆☆
आज प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचाही जन्मदिन. ( १९/१०/१९५४ — १९/०९/२००२ )
गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, यासारखे चित्रपट, कमला, सखाराम बाईंडर, कन्यादान अशासारखी नाटके, यात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला. “ रजनी “ या टी. व्ही. वरील मालिकेतून त्या अक्षरशः घराघरात पोहोचल्या. त्यांनी काही हिंदी सिनेमांमध्ये तसेच सीरियल्समध्येही भूमिका केल्या होत्या. सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची ही मुलगी स्वतःही एक चांगली लेखिका म्हणून सर्वांना परिचित होती. सामाजिक समस्या हा त्यांच्या लेखनाचा अनेकदा विषय असे. त्यांनी अनेक लघुकथाही लिहिलेल्या होत्या. आणि त्यापैकी काही पुरस्कारप्राप्तही ठरल्या होत्या. ‘पंचतारांकित’ हे त्यांचे अनुभवप्रधान लेखन, तसेच, ज्याचा त्याचा प्रश्न, असंही , अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. लेखिका आणि अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजवलेल्या प्रिया तेंडुलकर यांना भावांजली .
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “. २) गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈