श्रीमती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
गोपाल नीलकंठ दांडेकर (८ जुलै १९१६ – १ जून १९९८)
गोपाल नीलकंठ दांडेकर हे गोनीदा म्हणून सर्वपरिचित आहेत. ते एक अंनुभावसनपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे भटकण्याची आवड असलेले कलंदर कलावंत होते. ते दुर्गप्रेमी आणि कुशल छायाचित्रकारही होते.
गोनीदांचा जन्म परतवाडा इथे झाला. १२व्या वर्षी शिक्षण सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. पुढे ते गाडगे महाराजांच्या सहवासात आले. त्यांचा संदेश त्यांनी गावोगावी पोचवला. नंतर त्यांनी वेदांताचा अभ्यास केला. १९४७पासून त्यांनी लेखन कार्यावर उपजीविका करायचे ठरवले. त्यांनी पुढील आयुष्यात कुमार साहित्य, कादंबर्याी, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, धार्मिक, पौराणिक इ. विविध प्रकारचे लेखन केले.
कादंबरीचे अभिवाचन –
गोनीदांनी १९७५ साली कादंबरीच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग सुरू केला. ग्यानेश्वर यांच्या जीवनावरील मोगरा फुलाला या कादंबरीपासून ही सुरुवात झाली. पुढे शितू, पडघवली. मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी इ. अनेक कादंबर्यां अभिवाचन संस्कृतीतून वाचकांच्या भेटीला आल्या. त्यांचा हा उपक्रम त्यांच्या नंतरही त्यांच्या कुटुंबियांनी ( वीणा देव, विजय देव, रूचीर कुलकर्णी ) पुढे चालू ठेवला.
गोनीदांचे साहित्य –
बालवाङ्मय – आईची देणगी
कादंबरी – १.आम्ही भगीरथाचे पुत्र, २. शितू, ३.पडघवली, ४. पूर्णामायची लेकरं, मृण्मयी इये. १७ कादंबर्याो त्यांनी लिहिल्या. त्यापैकी ‘माचीवरला बुधा ‘ , जैत रे जैत, ‘देवकीनंदन गोपाला’ या कादंबर्यांनवर चित्रपट निघाले.
चरित्र- आत्मचरित्र –
दास डोंगरी रहातो. गाडगे महाराज, तुका आकाशाएवढा इ. ६ पुस्तके
ललित गद्य – छंद माझे वेगळे , त्रिपदी
ऐतिहासिक – कादंबरीमय शिवकाल – यात हे तो श्रींची इच्छा, झुंजर माची, दर्याभवानी, बाया दर उघड इ. छोट्या छोट्या कादंबर्यां चा समावेश आहे.
प्रवास आणि स्थल वर्णन – कुणा एकाची भ्रमण गाथा, दुर्ग दर्शन, महाराष्ट्र दर्शन इ. ११ पुस्तके
धार्मिक, पौराणिक, संत चरित्रे –श्रीगणेशपुराण, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इ. १४ पुस्तके
गौरव – अकोला येथे १९८१ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
पुरस्कार –
१. ‘स्मरणगाथा’ साथी साहित्य अॅरकॅडमीचा पुरस्कार – १९७६
२. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार
३. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांचा उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
४. महाराष्ट्र गौरव पुरस्कार – १९९०
५. जीजामाता पुरस्कार- १९९०
स्मृती पुरस्कार – गोनीदांनी वयाच्या पंचाहत्तरीत चांगल्या लेखकाला मृण्मयी पुरस्कार देण्याचे चालू केले. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी १९९९ पासून हा पुरस्कार गोनीदांच्या नावे देणे सुरू ठेवले. तसेच त्यांच्या पत्नी नीरा दांडेकर यांच्या स्मरणार्थही सामाजिक क्षेत्रात केलेल्या महत्वाच्या कामाबद्दल पुरस्कार दिला जातो.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ( २९ जून १८७१ – १ जून १९३४ )
श्री. कृ. कोल्हटकर यांनी मराठीत विनोदी लेखनाची परंपरा रुजवली. ते नाटककार, कवी आणि समीक्षकही होते. ‘बहू असोत सुंदर संपन्न की महा…’ हे सुप्रसिद्ध गीत त्यांच्याच लेखणीतून उतरले.
श्री. कृ. कोल्हटकर यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. त्यांनी त्या वयात अनेक नाटके पाहिली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये शिकताना शि.म.परांजपे, एस.एस.देव, वी.का.राजवाडे यासारखे शिक्षक त्यांना शिकवायला होते. त्यांचा खूप प्रभाव कोल्हटकरांवर पडला. १८९१ मध्ये ‘मृच्छ्कटिकम्’ या नाटकात त्यांनी प्रथमच काम केले. शिकत असतानाच त्यांनी ‘विक्रम शशिकला’ या नाटकावर लिहिलेली समीक्षा ‘विविधज्ञानविस्तार’ मध्ये प्रसिद्ध झाली. १८८७मध्ये ते एल.एल.बी. झाले व अकोला येथे व्यवसाय करू लागले.
श्री. कृ. कोल्हटकर यांची साहित्य संपदा –
नाटके – १. गुप्तमंजुषा , २. जन्मरहस्य, ३. परिवर्तन, ४. मातीविकार, ५. मूकनायक ६. वधूपरीक्षा इ. १२ नाटके त्यांनी लिहिली.
विनोदी लेखसंग्रह – १. सुदामयाचे पोहे, २. अठरा धान्याचे कडबोळे
कादंबरी – ज्योतीषगणीत, श्यामसुंदर
गौरव –
१. पुणे येथे झालेल्या दुसर्या् कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
२. १९२७ साली झालेल्या १३व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
३. ते ज्योतिषतज्ज्ञही होते. तिसर्याद ज्योतिष परिषदेचे ते अध्यक्ष होते.
श्री. कृ. कोल्हटकर यांच्यावरील साहित्य
१. गंगाधर देवराव खानोलकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.
२. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी ‘श्री. कृ. कोल्हटकर- व्यक्तिदर्शन’ हे समीक्षात्मक पुस्तक लिहीले आहे.
गो. नी. दांडेकर आणि श्री. कृ. कोल्हटकर या दोघा प्रतिभावंतांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈