सवत्सधेनू पुजनाने
दिवाळी सुरू जाहली आज
ज्योत ज्योतीने चला लाऊया
आसमंत उजळे प्रकाशात
– नीलांबरी शिर्के
? || शुभ दीपावली || ?
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
१ नोव्हेंबर – संपादकीय
आज १ नोव्हेंबर — बुद्धिवादी, विज्ञानवादी समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिन. ( ०१/११/१९४५ – २०/०८/२०१३ )
अघोरी सामाजिक प्रथांच्या आणि अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी श्री. श्याम मानव यांनी १९८२ साली स्थापन केलेल्या “ अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती “ या संघटनेसोबत शेवटपर्यंत काम केलेल्या श्री. नरेंद्र दाभोळकर यांनी, १९८९ साली “ महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समिती “ची स्थापना केली, आणि ‘ संस्थापक-अध्यक्ष ‘ म्हणून अखेरपर्यंत या समितीची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली. याच संदर्भातल्या त्यांच्या विचारांना आणि त्याला अनुसरून केलेल्या कार्याला अधोरेखित करणारी बरीच पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत, जी नावाजलेल्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेली आहेत.—- ‘ अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम ‘, अंधश्रद्धा विनाशाय ‘, ‘ ऐसे कैसे झाले भोंदू ‘, ‘ ठरलं– डोळस व्हायचंय ‘, ‘ तिमिरातुनी तेजाकडे ‘, ‘ विचार तर कराल ?’, ‘ भ्रम आणि निरास ‘, ‘ मती-भानामती ‘, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. “ प्रश्न तुमचे -उत्तर दाभोळकरांचे “ या शीर्षकाने त्यांच्या सविस्तर मुलाखतीची, म्याग्नम ओपस कं. ने काढलेली डी. व्ही .डी. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच आविष्कार म्हणावा लागेल. ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या त्यांच्या निर्घृण हत्येचा निषेध, महाराष्ट्र अं.नि.स. च्या लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी ‘ रिंगणनाट्य ‘ या माध्यमातून सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला, जो अतिशय प्रभावी ठरला.
श्री. दाभोळकर यांना रोटरी क्लबचा “ समाज गौरव “ पुरस्कार, दादासाहेब साखवळकर पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा “ साधना जीवनगौरव पुरस्कार “( मरणोत्तर ) अशासारख्या पुरस्कारांच्या जोडीने, भारत सरकारतर्फे “ पद्मश्री “ ( मरणोत्तर ) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच, अमेरिकेतल्या ‘ महाराष्ट्र फौंडेशन ‘ने, त्यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेला समाज गौरव पुरस्कार सर्वप्रथम ‘ अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘ला दिला होता. याबरोबरच विशेषत्वाने सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फौंडेशनने २०१३ सालापासून, एखाद्या समाजहितार्थ कार्याला वाहून घेणाऱ्या व्यक्तीला “ डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार “ देण्यास सुरुवात केली आहे.
एका वेगळ्याच पण महत्वाच्या वाटेवर आयुष्यभर निकराने चालत राहिलेल्या श्री. दाभोळकर यांना कृतज्ञतापूर्वक सलाम… ?
☆☆☆☆☆
आज कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचाही जन्मदिन. ( १०/११/१९३२ – २५/०९/२००४ )
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये कविता करण्याची हातोटी असणारे कवी अशी श्री. कोलटकर यांची ख्याती होती. १९६० च्या दशकात त्यांनी केलेल्या कविता, खास मुंबईतल्या विशिष्ट अशा मराठी बोलीभाषेतल्या होत्या, ज्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या आणि गुन्हेगारीच्या विश्वात अडकलेल्या गुन्हेगारांच्या आयुष्याचे प्रकर्षाने दर्शन घडते— मै भाभीको बोला / क्या भाईसाहबके ड्युटीपे मै आ जाऊ ?/ रेहमान बोला गोली चलाऊंगा /– अशासारख्या त्यांच्या कविता इथे उदाहरणादाखल सांगता येतील. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतल्या त्यांच्या कवितांचे संग्रह प्रकाशित झालेले आहेत, ते असे — मराठी कवितासंग्रह — अरुण कोलटकरच्या कविता, चिरीमिरी, द्रोण, भिजकी वही, अरुण कोलटकरच्या चार कविता. —इंग्रजी कवितासंग्रह –जेजुरी, काळा घोडा पोएम्स, सर्पसत्र, द बोटराइड अँड अदर पोएम्स, कलेक्टेड पोएम्स इन इंग्लिश.— यापैकी “ जेजुरी “ ही त्यांची अतिशय प्रसिद्ध साहित्यकृती ठरली होती.
श्री. कोलटकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, १९७६ सालचा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. “ शब्द “ या लघुनियतकालिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता.
या जोडीनेच श्री. कोलटकर हे एक उत्तम ग्राफिक डिझायनर आणि जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कला-दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध होते हे आवर्जून सांगायला हवे.
श्री. अरुण कोलटकर यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी मनापासून आदरांजली. ?
☆☆☆☆☆
आज श्रीमती योगिनी जोगळेकर यांचा स्मृतिदिन. ( ६/८/१९२५ — १/११/२००५ )
या एक नावाजलेल्या मराठी लेखिका, कवयित्री आणि शास्त्रीय गायिका होत्या. त्यांनी काही वर्षे शिक्षिका म्हणूनही काम केले होते. याव्यतिरिक्त, राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय असे पुष्कळ समाजकार्यही केले होते.
त्यांची एकूण ११६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, ज्यामध्ये ५० कादंबऱ्या, ४० कथासंग्रह, कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, अशा विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्याचा समावेश आहे. “ या सम हा “ ही गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्यावर लिहिलेली कादंबरी, आणि, “ रामप्रहर “ ही प्रसिद्ध गायक श्री. राम मराठे यांच्यावर लिहिलेली कादंबरी, अशा त्यांच्या दोन कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय ठरल्या, आणि प्रचंड प्रसिद्ध झाल्या. त्यांची – असंग, उमाळा, मौन, घरोघरी, ऋणानुबंध, कुणासाठी कुणीतरी, नादब्रह्म, अश्वत्थ,अशी किती प्रसिद्ध पुस्तके सांगावीत ? ‘ मधुर स्वरलहरी या ‘, सखे बाई सांगते मी ‘, ‘ हरीची ऐकताच मुरली’, हे सागरा नीलांबरा ‘, अशी त्यांनी लिहिलेली गीतेही खूप गाजली.
“पहिली मंगळागौर “ या त्या काळी गाजलेल्या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते.
‘शास्त्रीय गायिका ‘ म्हणूनही नावाजलेल्या योगिनीताईंनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. शंकरबुवा अष्टेकर, राम मराठे, संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर असे मातब्बर गुरू त्यांना लाभले होते. डॉ. भालेराव स्मृती पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या होत्या. त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगायला हव्यात अशा दोन गोष्टी म्हणजे— रायगडाच्या पायथ्याशी त्यांच्या कवितेच्या ओळी संगमरवरात कोरून लिहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी “ अक्षरयोगिनी “ हा देवनागरी युनिकोड फॉन्ट उपलब्ध करून दिलेला आहे.
अशाप्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून गेलेल्या श्रीमती योगिनी जोगळेकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली. ?
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈