२० ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
आज २० ऑक्टोबर – ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख यांचा जन्मदिन. ( २०/१०/१९१६ — २९/८/१९६९)
यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल असे होते. गिरणी कामगार म्हणून काम करत असतांना त्यांच्या मिलसमोर होणारी आंदोलने, गेट-सभा, वेगवेगळे लढे, यामुळे प्रभावित होऊन, तेव्हा कामगारांना संगठीत करण्याचे काम ते करायला लागले. अखिल भारतीय किसान सभेच्या कामातही त्यांचा सहभाग असायचा. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. आपल्या काव्यरचनेच्या माध्यमातून त्यांनी या चळवळींचा यशस्वी प्रचार केला. लोककलेच्या माध्यमातून विचारांचा प्रसार करत समाजाला जागृत करण्याचे व्रतच त्यांनी स्वीकारले होते. त्यासाठी त्यांनी अनेक पोवाडे, लोकगीते, लोकनाट्ये लिहिली. एक मनस्वी कवी आणि लोकशाहीर म्हणून जनमानसात ते आदरणीय ठरले होते. त्यांची तडफदार लेखणी आणि विलक्षण पल्लेदार पहाडी आवाज या दोन्हीचा त्यांनी जनजागृतीसाठी पूर्णपणे उपयोग केला. स्वतः एक श्रमिक या भूमिकेतून त्यांनी सतत जन -उद्धाराचे स्वप्न पाहिले. त्यांच्याबद्दल आणखी विशेषत्वाने सांगायलाच हवी अशी गोष्ट म्हणजे भारतावर झालेल्या चिनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी, अनेक ठिकाणी आपली शाहिरी लोकांपुढे प्रभावीपणे सादर करून, त्यांनी देशासाठी लाखो रुपयांचा निधी गोळा करून दिला होता. काव्याला असणारी उपजत लय आणि यमकप्रचुर रचना ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये होती. ती काव्ये विचार आणि भावनांचे चैतन्य यांनी बहरलेली असायची.
त्यांच्या काही कवनांमध्ये रौद्र रसाचाही अनुभव येतो. श्री. प्र .के .अत्रे त्यांना गौरवाने “ महाराष्ट्राचा मायकोव्हस्की “ म्हणत असत. पण त्यांना स्वतःला “ लोकशाहीर “ ही उपाधी सर्वात जास्त आवडायची, कारण त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जनताजनार्दनाच्या चरणी वाहिले होते.
कलश, धरतीमाता हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत हा गीतसंग्रह , पहिला बळी हे नाटक आणि कितीतरी पोवाडे , असे त्यांचे सगळेच साहित्य रसिकांच्या पसंतीस उतरले होते. लोककलांचे जतन, संवर्धन आणि संशोधन व्हावे, आणि तो वारसा समृद्ध व्हावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने
“ शाहीर अमर शेख अध्यासन “ सुरु करून त्यांचा सन्मान केला आहे.
सामान्यातल्या सामान्य माणसाचे उत्थान करणे हे स्वतःचे ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःची वेगळीच वाट शोधणारे शाहीर अमर शेख यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी मनःपूर्वक आदरांजली.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “. २) गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈