सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
काका कालेलकर
दत्तात्रेय बाळकृष्ण ऊर्फ काका कालेलकर (1 डिसेंबर 1885 – 21ऑगस्ट 1981) हे पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ व स्वातंत्र्यसैनिक होते.
त्यांचा जन्म साताऱ्यात झाला. ते मूळ कारवारचे. त्यांची मातृभाषा कोंकणी व मराठी. बरीच वर्षे गुजरातमध्ये राहिल्यामुळे त्यांनी गुजराती भाषा शिकून त्यात प्रभुत्व मिळवले.ते गुजरातीतील नामवंत लेखक होते.
गांधीजींच्या प्रभावामुळे काका साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. सर्वोदय पत्रिकेचे ते संपादक होते. अहमदाबादमध्ये गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
काका राष्ट्रभाषा समितीचे सदस्य होते. हिंदीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले.
1952 ते 1964 या काळात ते राज्यसभा सदस्य होते.
साहित्य अकॅडमीत काका गुजराती भाषेचे प्रतिनिधी होते.
सोप्या पण ओजस्वी भाषेत विचारपूर्ण निबंध आणि विविध विषयांवरील तर्कशुद्ध भाष्य हे काकांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य होते.
काकांनी गुजराती, मराठी, हिंदी भाषांत अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी काही:
‘प्रोफाइल्स इन इन्स्पिरेशन’, ‘महात्मा गांधीज गॉस्पेल ऑफ स्वदेशी’ इत्यादी इंग्रजी पुस्तके , ‘स्मरणयात्रा’, ‘उत्तरेकडील भिंती’ व त्याचा इंग्रजी अनुवाद ‘इव्हन बिहाईंड द बार्स’, ‘लाटांचे तांडव’, ‘हिमालयातील प्रवास’ वगैरे मराठी पुस्तके, ‘जीवननो आनंद’, ‘मारा संस्मरणो’ इत्यादी गुजराती पुस्तके.
काकांना 1965 मध्ये त्यांच्या ‘जीवन व्यवस्था’ या गुजराती लेखसंग्रहासाठी साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले.
1971 मध्ये त्यांना साहित्य अकॅडमीची फेलोशिप मिळाली.
1964मध्ये सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’प्रदान केले.
1985 मध्ये काकांच्या गौरवार्थ स्टॅम्प काढण्यात आला.
☆☆☆☆
श्री. पु. भागवत
श्री. पु. भागवत (27 डिसेंबर 1923 – 21 ऑगस्ट 2007) हे साक्षेपी संपादक व प्रकाशक होते.
त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले होते.
‘मौज’ (साप्ताहिक व वार्षिक) व ‘सत्यकथा’ मासिकाच्या माध्यमातून 40-50 वर्षे त्यांनी संपादक व प्रकाशक म्हणून मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजवला.त्यातील साहित्याची निवड तावून सुलाखून केलेली असे.
प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
‘साहित्याची भूमी’, ‘मराठीतील समीक्षालेखांचा संग्रह’, ‘साहित्य :अध्यापन आणि प्रकार’ ही त्यांची गाजलेली पुस्तके.
महाबळेश्वर येथे 31 जानेवारी 1987 रोजी झालेल्या तिसऱ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार देते.
काका कालेलकर व श्री. पु. भागवत यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली.
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈