श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २१ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
राजा राजवाडे
साहित्याच्या विविध प्रांतात लिलया वावर करून सुमारे ऐंशी पुस्तकांची निर्मिती करणा-या राजा राजवाडे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील. देवरूख येथे मॅट्रीकपर्यंत शिक्षण पूर्ण करून ते मुंबईला आले. तेथे खालसा महाविद्यालयात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत बी.ए. केले. मुंबई महानगरपालिकेत काही वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्त होईपर्यंत त्यांनी सिडको त नोकरी केली.
त्यांची साहित्यिक कारकिर्द ही विविधांगी आहे. 1962 साली ‘स्त्री’ या मासिकात त्यांची ‘उन्हातलं घर’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. 1980 साली ‘सायाची पाने’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. आपला नोकरीचा व्याप सांभाळून त्यानी कथा, कादंबरी, ललित, विनोदी कथा व कादंबरी, व्यक्तिचात्रण, चित्रपट कथा लेखन असे विपुल लेखन केले आहे. याशिवाय सलग 35 वर्षे ते विविध नियतकालिकांमधून व मासिकांतून लेखन करत होते. दैनिक ‘तरूण भारत’ मध्ये त्यांनी संपूर्ण वर्षभर ‘उतरती उन्हे’ हे सदर चालवले होते.ललित मधील ‘उदंड झाली अक्षरे’, सोबत मधील ‘सप्तरंग’, मार्मिक, धर्मभास्कर, नवशक्ती, रत्नागिरी टाईम्स, अशा दैनिक व मासिकातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. ‘मराठी बाणा’ या दिवाळी अंकाचे संपादन करून मराठी भाषेवरील प्रेम सिद्ध करून टिकाकारांना उत्तर दिले होते. साहित्य, भाषा, याविषयी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. कोकण म. सा. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषा, साहित्य यासंबंधी अनेक उपक्रम यशस्वी केले. परिषदेच्या ‘झपूर्झा’ या त्रैमासिकाचे संपादनही केले.
स्वाभिमान व परखडपणा बरोबरच मित्रांबद्द्ल अपार स्नेह व हळवेपणा हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. ‘दोस्ताना’ या त्यांच्या व्यक्तिचित्रण संग्रहात ते दिसून येते. अनेक नामवंत साहित्यिकांशी त्यांचा दोस्ताना होता.
30 कादंब-या, 14 विनोदी कादंब-या, 9 कथासंग्रह, 9 विनोदीकथासंग्रह, 4 कवितासंग्रह, 3 ललितलेख संग्रह, 1 व्यक्तिचित्रण संग्रह व 3 चित्रपट कथा लिहून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्व पुस्तकांची सविस्तर नावे देणे, शब्दमर्यादेमुळे शक्य नसले तरी ‘धुमसणारं शहर’, ‘कार्यकर्ता’, ‘अस्पृश्य सूर्य’, ‘दुबई-दुबई’ यासारख्या गाजलेल्या पुस्तकांचा उल्लेख करावाच लागेल.
एकवीस जुलै 1997 ला एका अपघातात त्यांचे निधन झाले.त्यांची जीवन यात्रा संपली पण साहित्य क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ प्रवास अनमोल ठेवा मागे सोडून गेला आहे.
त्यांच्या चतुरस्त्र लेखणीस सलाम!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, मराठीसृष्टी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈