सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २१ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
सदानंद शांताराम रेगे (२१जून १९२३ – २१ सप्टेंबर १९८२)
सदानंद रेगे हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म कोकणात राजापूर येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. शालांत परीक्षेनंतर ते मुंबईत आले. चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश घेतला. त्यानंतर १९४२मध्ये ते एका मिलमध्ये डिझायनर म्हणून कामाला लागले. काही वर्षे त्यांनी रेल्वेत नोकरीही केली. कीर्ती कॉलेजमधून एम. ए. केल्यानंतर माटुंगायेथील रुईया कॉलेजमध्ये ते रुजू झाले.
सदानंद रेगे यांची प्रकाशित पुस्तके –
कथा संग्रह – १.जीवनाची वस्त्रे,२. काळोखाची पिसे , ३. चांदणे, ४. चंद्र सावली कोरतो, ५. मासा आणि इतर विलक्षण कथा
कविता संग्रह – १.अक्षरवेल, २. गंधर्व, ३. वेड्या कविता, ४. देवापुढचा दिवा, ५. बांक्रुशीचा पक्षी
अनुवादीत – १. जयकेतू ( ओडीपसचे रूपांतर ), २. राजा इडिपस (अनुवाद), ३.बादशहा, ४. ज्याचे होते प्राक्तन शापित, ५. ब्रांद, ६ गोची
बालगीते – १. चांदोबा चांदोबा, २. झोपाळ्याची बाग
अनुवादीत कविता – ब्लादिमिर मायक्रोव्हस्कीच्या कवितांचा अतिशय सुंदर अनुवाद ‘पॅंटघातलेला ढग म्हणून त्यांनी केला आहे.
त्यांच्या कविता तरल, हळुवार, संवेदनाशील आहेत. ‘अक्षरवेल’मधील कविता निसर्गाची विविध लावण्ये प्रगट करतात. ‘श्रावण’ कवितेत ते लिहितात, ‘आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन ऊन पावसाचे पक्षी आणी ओंजळीमधून ‘जाणीवेच्या पलीकडे नेणार्या मृत्यूच्या व आत्महत्येच्या अव्याहत भयाचा प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसून येतं. ख्रिस्ताच्या बलिदानावर ज्या जगभर अनेक कविता लिहिल्या गेल्या, त्यात सदानंद रेगे यांच्या ‘सोहळा’ कवितेचा समावेश आहे. कौस्तुभ आजगावकर लिहितात, रेगे कलासहित्यावर निष्ठेने प्रेम करत राहिले. स्वत:ची जाणीव गढूळ होऊ न देता व्यक्त होत राहिले.
एके वर्षी मुंबईमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ते कविसंमेलनाचे अध्यक्ष होते.
सदानंद रेगे यांच्यावर प्र.श्री. नेरूरकर यांनी लिहिलेले ‘अक्षरगंधर्व’ हे पुस्तक १९८७ साली प्रकाशित झाले.
आज या प्रतिभावंत कवी, लेखकाचा स्मृतिदिनआहे. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला प्रणाम.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी , गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈