श्रीमती उज्ज्वला केळकर
२२ डिसेंबर – संपादकीय
मराठी साहित्यातील शाहीरी वाङ्मयात मोलाची भर घाणारे पठ्ठे बापूराव म्हणजेच श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचा जन्म ११ नोहेंबर १८६६ ला रेठारे हरणाक्ष इथे ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढे ते औंघच्या महाराजांनी बोलवल्याने तिकडे गेले. महाराणींनी त्यांना बडोद्याला नेले. तिथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. आई-वडील लवकर गेल्याने ते पुन्हा गावी परतले.
शाळेत गेल्यावर त्यांना कविता करण्याचा छंद लागला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्या जात्यावरच्या ओव्या ऐकता ऐकता त्यांनी त्यात बादल केले. ‘श्रीधरची गाणी’ म्हणून तीही लोकप्रीय झाली.
गावी घरासमोर असलेल्या वाड्यात तमाशाचा फड चालायचा. त्यांचं मन तिकडे ओढ घ्यायचं. जातीने ब्राम्हण, आणि कुलकर्णी वृत्ती यांनी तिकडे जाताना लाज वाटायची. सुरूवातीला ते चोरून मारून तमाशाला जायचे पण पुढे पुढे तमाशाची ओढ अनिवार झाली आणि शेवटी
‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राम्हण असूनी सोवळे ठेवले करूनी घडी
मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी ‘
असं म्हणत ते राजरोस तमाशात शिरले. संसार आणि पूर्वापार चालत आलेला आपला व्यवसाय ( कुलकर्णी वृत्ती) सोडून दिला. त्यांनी इतर तमासागीरांना फडासाठी लावण्या लिहून दिल्या. पुढे स्वत:चा फड काढला. त्यांच्या फडाला विलक्षण लोकप्रियता मिळाली. त्यांच्या फडात पोवळा नावाची लावण्यावती नृत्यांगना होती. बापूरावांची काव्यप्रतिभा पोवळाच्या सहवासात बहरली. त्यांनी एके ठिकाणी म्हंटले,
‘दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी बात बडी’ अर्थात त्यांच्या सगळ्या लावण्या काही उपलब्ध नाहीत. १९५८ मध्ये त्यांच्या काही लावण्या तीन भागात प्रकाशित झाल्या. त्यांनी गण, गौळण, भेदीक, झगड्यांच्या, रंगाबाजीच्या, वागाच्या इ. विपुल रचना केल्या बापूरावांच्या फडाला अतिशय लोकप्रियता मिळाली. १९०८-१९०९ साली त्यांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांसमोर ‘मिठाराणीचा वग’ सादर केला. तोही अतिशय गाजला.
पुढे पोवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्यात बेबनाव झाला. त्यांचा फड विस्कटला. या प्रतिभावंताची अखेर अतिशय विपन्नावस्थेत झाली. २२ डिसेंबर १९४५ ला त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिंनानिमित्त त्यांच्या काव्यप्रतिभेला प्रणाम .
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈