सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
जयंत बेंद्रे
जयंत बेंद्रे (23 डिसेंबर 1951 -22 मार्च 2015) हे मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक व लेखक होते.
अहमदनगर येथे त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर, तसेच किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना मोहन जोशी यांच्याबरोबर कामं करण्याची संधी त्यांना मिळाली.
बेंद्रेनी ‘मोरूची मावशी ‘मध्ये काम केले होते. ते विविध नाट्यसंस्थांशी जोडलेले होते. प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं, तसेच मराठी चित्रपट व चित्रवाणी मालिकांतून त्यांनी भूमिका केल्या.
‘नटखट नट -खट’ या मोहन जोशींच्या 500 पानी आत्मचरित्राचे शब्दांकन बेंद्रे यांनी केले. वेगळ्या आकृतिबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले.
याशिवाय त्यांनी सात एकांकिका, इंग्रजी एकांकिका व तीन कथासंग्रह लिहिले.
त्यांच्या ‘अभिनय सम्राट’ या लघुकथेस जी. ए. कुलकर्णी पुरस्कार, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ‘ या लघुकथेला ‘कथा दिल्ली’चा राष्ट्रीय पुरस्कार, ‘शेवटी काय वर घेऊन जायचंय?’ या कथेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथा पुरस्कार तर ‘माणसं आणि माणसं’ या कथासंग्रहाला जयवंत दळवी स्मृती पुरस्कार मिळाला.
‘मैत्री’ या संस्थेद्वारे ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते.
प्रभाकर आत्माराम पाध्ये
प्रभाकर आत्माराम पाध्ये(4 जानेवारी 1909-22 मार्च 1984) यांनी पन्नास वर्षे वृत्तपत्रीय लेखनाबरोबर कथात्म साहित्य, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, ललित गद्य, समीक्षा व सौंदर्यमीमांसा अशी निर्मिती अखंडपणे केली.
त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. शालेय शिक्षण रत्नागिरी, पुणे, मुंबई येथे झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. केलं.
सुरुवातीला ते ‘प्रतिभा’ पाक्षिकात लेखन करत असत. नंतर त्यांनी श्री. रा. टिकेकर यांच्या सहकार्याने ‘आजकालचा महाराष्ट्र -वैचारिक प्रगती’ हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाच्या अखेरीस 1799 ते 1934 या प्रदीर्घ कालखंडातील प्रमुख घटनांचा कालपट दिला आहे. मराठी ग्रंथांमध्ये कालपट देण्याची सुरुवात या ग्रंथापासून झाली.
नंतर पाध्ये ‘चित्रा’,’धनुर्धारी’मध्ये पत्रकार होते.पुढे ‘नवशक्ती’चे संपादक झाल्यावर त्यांनी त्याचा खप प्रचंड वाढवला.
मार्च 1953मध्ये ‘नवशक्ती’ हे वृत्तपत्र सोडून ते ‘द इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे चिटणीस झाले. जून 1955मध्ये ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आशिया खंडाचे सेक्रेटरी जनरल म्हणून ते दिल्लीला गेले.त्यायोगे एक तप ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक घटना व मोठमोठ्या व्यक्ती यांच्याशी निगडित होते. यामुळे पाध्येंच्या व्यक्तिमत्त्वाला नवेनवे पैलू पडले.
पाध्ये यांनी पाच कथासंग्रह,एक कादंबरिका, पाच प्रवासवर्णनपर पुस्तके, चार व्यक्तिचित्रसंग्रह, स्फूट लेखांचे तीन संग्रह, राजकारणावरील चार पुस्तके, सौंदर्यशास्त्रविषयक तीन पुस्तके व सहा समीक्षा पुस्तके असे त्यांचे अफाट लेखन आहे.
त्यांच्या ‘सौंदर्यानुभव’ला साहित्य अकॅडमीचे पारितोषिक मिळाले.
जयंत बेंद्रे व प्रभाकर आत्माराम पाध्ये यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया,
प्रभाकर पाध्ये, प्रा. डॉ. विलास खोले, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈