सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २४ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
रामकृष्ण गोपाळ भांडारकर (6जुलै 1837 – 24 ऑगस्ट 1925)
रामकृष्ण भांडारकर हे संस्कृत पंडीत, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाज सुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.
त्यांचा जन्म मालवण इथे झाला. शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई इथे झाले. नंतर त्यांनी मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज, पुण्यातील डेक्कन कॉलेज या ठिकाणी संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1893 ते 1895, ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ते प्राच्य विद्येचे अभ्यासक होते. प्रकृत भाषा, ब्राम्ही, खारोष्टी या लिप्यांचे ज्ञान मिळवून त्यांनी भारताच्या इतिहासाचे संशोधन केले. भारतातील लुप्तप्राय इतिहासाची पुनर्मांडणी करून त्यांनी तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन ते प्रकाशित केले. पुरातत्वशास्त्राचा इतिहास अभ्यासणारे संशोधक आजही त्यांचे ग्रंथ प्रमाण मानतात.
1883 मधे झालेल्या व्हिएन्नामधील प्राच्यविद्या परिषदेला ते हजर होते. त्यांचा अभ्यासाचा आवाका बघून त्यावेळी तेथील सरकार व जगभरचे विद्वान आचंबीत झाले होते.
पहिल्या प्राच्यविद्या परिषदेत भांडारकर यांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखाचा अर्थ उलगडून सांगितला. यामुळे प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली. त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. त्यांनी प्राच्यविद्याविषयक विपुल लेखन केले. त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने 1917 साली पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, ही संस्था स्थापन केली. भांडारकर इंस्टिट्यूट म्हणून ही संस्था आजही पुण्यात कार्यरत आहे.
भांडारकरांची ग्रंथसंपदा –
1.भारताचा पुरातत्व इतिहास – पाच खंड
२.मुंबई निर्देशिकेसाठी (गॅझेटियर) दक्षिण भारताचा इतिहास
३.भावाभूतीचा ‘मालती माधव’वर टीका
४. संस्कृत व्याकरण भाग 1 व 2
आज भांडारकर यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांच्या विद्वत्तेला शतश: प्रणाम.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈