श्री सुहास रघुनाथ पंडित
२४ डिसेम्बर – संपादकीय
प्रा. दत्तात्रय केशव बर्वे.
श्री. द. के. बर्वे यांनी मराठी विशेष विषयासह बी. ए. व एम् ए. पुणे येथे केले. नंतर बेळगाव येथे बी. एड्. केले. शिक्षक व मराठी भाषेचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांनी नाव कमावले. प्राध्यापक काळात त्यांनी ‘ निवडक नवनीत’ हा कविता संग्रह संपादित केला. तसेच वा. म. जोशी यांच्या आश्रमहरिणीच्या समीक्षेचे ‘आश्रमहरिणीचे अंतरंग ‘ हे पुस्तक लिहिले. परंतु त्यांचा खरा पिंड हा सर्जनशील लेखकाचा होता. त्यांनी बालसाहित्य व कथालेखन विपुल प्रमाणात केले. 1950 साली त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. पुट्टी, पोकळी, पंचवेडी, आंबट षोक, नन्नी, हे त्यांचे काही कथासंग्रह. बालसाहित्यात गुलछबू, फुलराणी, देशासाठी दर्यापार, बोलका मासा, चंद्रावर ससा, डाॅ. पोटफोडे या पुस्तकांचा उल्लेख करता येईल.
महाराष्ट्र शासनाने नवसाक्षर प्रौढांसाठी लेखन करण्यास त्यांना सांगितले. त्यांनी लिहीलेली ‘गणूचा गाव ‘ ही कादंबरी लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावरील लेखक शिबिरासाठी निवड झाली.
1971 साली त्यांनी ‘दिलीपराज प्रकाशन’ या संस्थेची स्थापना केली. या वर्षी त्याला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
अन्य लेखनाबरोबरच त्यांनी बेळगाव येथील उद्योगपती रावसाहेब गोगटे यांचे सागर मेघ हे चरित्र लिहिले. पण दुर्दैव असे की या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आधी दोन दिवस म्हणजे 24/12/1981 ला ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
वसंत सरवटे.
‘व्यंग चित्रित करते ते व्यंगचित्र’ अशी व्यंगचित्राची सोपी व्याख्या करणारे व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचा आज स्मृतीदिन आहे.
ते कोल्हापूरचे. त्या काळात ती कलानगरी होती. पण चित्रकलेकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी समाजाकडे नव्हती. त्यामुळे चित्रकलेची आवड असूनही त्यानी सिव्हिल इंजिनिअर चे शिक्षण पूर्ण केले व ए. सी. सी. या कंपनीत नोकरी धरली.
लहानपणापासून मनात चित्रकलेची आवड होती. दलालांची चित्रे आणि पाश्चात्य व्यंगचित्रकारांची चित्रे यांच्या प्रभावामुळे ते व्यंगचित्रांकडे वळले. चिंतनशील, मर्मग्राही व प्रयोगशील रेखाटनशैली ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे, कथाचित्रे, व्यंगचित्रमालिका सादर केल्या आहेत. राजकीय व्यंगचित्रांवर त्यांनी भर दिला नाही. त्यांच्या चित्रातून सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक बदल मांडलेले दिसतात. माझा संगीत व्यासंग, खुर्च्या आणि गमती गमतीत या व्यंगचित्रमालिका वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या . अर्कचित्र म्हणजे कॅरिकेचर हा प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. त्यांचे एकूण सहा व्यंगचित्र संग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांनी व्यंगचित्र-एक संवाद, व्यंगकला चित्रकला व सहप्रवासी ही व्यक्तीचित्रे लिहीली आहेत . त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच बंगळूरू च्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट ने जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
जगण्यातील व्यंगे स्विकारून हसत हसत त्यांच्यावर मात करणे हीच सरवटे यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया, महाराष्ट्रनायक, अक्षरनामा.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈