श्रीमती उज्ज्वला केळकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
गेले द्यायचे राहुनी, नाही कशी म्हणू तुला, ये रे घना ये रे घना इ. लोकप्रिय गीतांचे गीतकार आरती प्रभू म्हणजेच चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० मध्ये तोंडोली – वेंगुर्ले इथे झाला. त्यांचे शिक्षण सावंतवाडी आणि मुंबई इथे झाले. त्यांनी गद्य लेखन चिं. त्र्यं. खानोलकर या नावाने केले आणि कविता-गीते आरती प्रभू या नावाने लिहिली.
शालेय वार्षिकापासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मार्च ५१ मध्ये त्यांची ‘जाणीव’ ही कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली. ‘वैनतेय’ साप्ताहिकात त्यांची ‘कुढत का राह्यचं’ ही कविता १९५३ ला प्रकाशित झाली आणि ते कवी म्हणून प्रकाशात आले. ५४ मध्ये त्यांची सत्यकथेत ‘शून्य शृंगारिते’ ही कविता प्रकाशित झाली. १ जानेवारी ५७ ला आकाशवाणी पुणे केंद्राने आयोजित केलेल्या कविसंमेलनात त्यांनी प्रथम कविता वाचली. ४ मे ५८ रोजी मालवण येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांचा ‘पल्लवी’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला.
२६ जानेवारी ५४ ला त्यांच्या ‘येईन एक दिवस’ या नाटकाचा प्रयोग झाला. ५९ मध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून त्यांनी काही दिवस नोकरी केली.
चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कविता, कथा, कादंबर्या् यात दु:खाची अनेक रुपे प्रगट झाली आहेत. नशीब आणि माणूस यांच्यात काय संबंध आहे, पाप-पुण्य या संकल्पना या गोष्टी त्यांच्या साहित्यातून दिसतात. दु:खाकडे तटस्थतेने पाहून दु:ख स्वीकारण्याची अपरिहार्यता त्यांच्या साहित्यात दिसते. ‘एक शून्य बाजीराव ‘ हे त्यांचे अतिशय गाजलेले नाटक
चिं. त्र्यं. खानोलकर यांचे निवडक प्रकाशित साहित्य-
कादंबर्या – १. अजगर, २. कोंडूरा, ३. गणुराया आणि चानी (चानीवर पुढे चित्रपटही निघाला होता. ) ४. पाषाण पालवी
नाटके – १. अजब न्याय वर्तुळाचा, २. आभोगी, ३. अवध्य ४. कालाय तस्मै नाम: , ५. हयवदन
त्यांची अनेक अप्रकाशित नाटकेही आहेत.
कविता – १. जोगवा २. नक्षत्रांचे देणे
खानोलकरांनी चित्रपटासाठी गीतेही लिहिली.
चिं. त्र्यं. खानोलकर यांना मिळालेले पुरस्कार
नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहाला १९७८ साली साहित्य अॅंकॅडमीचा पुरस्कार मिळाला.
त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणारे पुरस्कार खालील लेखक –कलावंतांना मिळालेले आहेत. विष्णू सूर्या वाघ, सतीश आळेकर, शफाअत खान, महेश एलकुंचवार, सई परांजपे, महेश केळुस्कर, सौमित्र, प्रेमानंद गज्वी॰
या अल्पायुषी प्रतिभावंताचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला शतश: प्रणाम
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈