श्रीमती उज्ज्वला केळकर
२५ ऑक्टोबर – संपादकीय
अरुण म्हात्रे ( २५ ऑक्टोबर १९५४ )
हे उत्तम कवी, गीतकार आणि निवेदक आहेत. ते प्रामुख्याने गेय कविता लिहितात. प्रेमातील आर्तता, विव्हलता, अगतिकता अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपल्या कवितातून मांडली आहे. ‘उंच माझा झोका’ या दूरचित्रवाणीवरील शीर्षक गीत त्यांचे आहे.
‘मानतो कागदाला, मानतो लेखणीला
कळे शब्दात अंतीम असे, नसतेच काही ‘
असे म्हणणारी त्यांची कविता उपजतच छान लय घेऊन येते. कविता लोकांपर्यंत पोचावी. त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, या हेतूने म्हात्रे यांनी आपल्या सहा कविमित्रांसह ‘कवितांच्या गावा जावे’ या मैफलीचे गावोगावी जाऊन सादरीकरण केले आणि श्रोत्यांना रसिक बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अशा मैफली अतिशय लोकप्रिय झाल्या.
अरुण म्हात्रे यांनी नाटके दिग्दर्शित केली. संगीताचे कार्यक्रम केले. उत्तम कवी होण्यासाठी नुसती पुस्तके वाचून चालत नाही. माणसं वाचावी लागतात, असं ते म्हणतात.
त्यांची १. ऋतु शहरातला, २. कोसो मैल दूर आहे चांदणी ३. ते दिवस आता कुठे इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना, बहिणाबाई, वसंती गाडगीळ, स्नेह चषक इ. पुरस्कार मिळाले.. वाचक त्यांच्या नवनवीन कवितांच्या प्रतीक्षेत आहेत, या अपेक्षेसह त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
केशव रंगनाथ शिरवाडकर (१९२६ – २०१८)
हे कुसुमाग्रजांचे चुलत भाऊ. ‘तो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज जीवन आणि साहित्य), मर्ढेकरांची कविता (समीक्षा), रंगविश्वातील रसायात्रा , सार गीतरहस्याचे, विचारधारा इ. पुस्तके त्यांनी लिहिली.’आपले विचारविश्व’ हे पुस्तक त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी लिहिले. भारतीय तत्वज्ञानाच्या विचारांच्या संदर्भात जगातील महत्वाच्या तत्वज्ञानाचे यात त्यांनी परिशीलन केले आहे.
रूस्तुम अचलखांब (१९२६ – २०१८)
हे आंबेडकर मराठा विद्यालयात नाट्यशास्त्राचे विभाग प्रमुख होते. लोकनाट्य, तमाशा आणि लोककला यात त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. त्यांनी शाहीरी परंपरा अभ्यासून विस्मृतीत गेलेल्या, साहित्याला मोलाचे योगदान देणार्या, व्यक्तींविषयी सशोधन केले. दुर्लक्षित कलाकार शोधून, ते म्हणत असलेले काव्य, त्यांच्या चाली यांच्या नोंदी केल्या. अनेक संगीत नाटके त्यांनी बसवली. ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ मधे गोंधळ, भारुड, इ. लोककलांच्या माध्यमातून, शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगितला. अभिनयशास्त्र, तनाशा लोकरंगभूमी, गावकी ( आत्मकथन) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या भारतीय दलित नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “. २) गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈