सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
वसंत दिगंबर कुलकर्णी
वसंत दिगंबर कुलकर्णी (23 ऑगस्ट 1923 – 25 ऑगस्ट 2001) हे नामांकित समीक्षक होते.
एस.पी. महाविद्यालयातून ते एम.ए.झाले.
त्यांनी ‘आलोचना’ मासिकातून ‘संगीत सौभद्र’ विषयी लिहिलेल्या लेखमालेचे पुस्तक झाले. त्यावर त्यांनी पीएच.डी. मिळवली.
सुरुवातीला ते माध्यमिक शाळांत अध्यापन करत.पुढे एस.पी.महाविद्यालयात ते मराठी-संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर पार्ले महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले. पुढे ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रथम प्रपाठक, नंतर प्राध्यापक व शेवटी विभागप्रमुख झाले.
महानुभाव वाङ्मय, संतसाहित्य, समीक्षा, संशोधन, नाटक व रंगभूमी, नियतकालिकांचा अभ्यास, पाश्चात्य साहित्य सिद्धांत या विविध विषयांत त्यांना रस होता.
त्यांची दृष्टी उदार व मोकळी होती. साहित्यकृतीचे रचनासौंदर्य व त्यातून होणारे जीवनसमस्यांचे सूक्ष्म भान त्यांना अपेक्षित असे. वाचनाने वाचकाच्या जाणिवा विस्तारल्या जाव्यात व त्यामुळे त्यांना मानवी जीवन समजायला मदत व्हावी, अशी त्यांची धारणा होती.
कुलकर्णी अभ्यासू वक्ते होते. विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रंथपुरस्कार समिती वगैरेंवरही त्यांची नेमणूक झाली होती.
मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय वगैरेंशीही त्यांचा निकटचा संबंध होता.
‘गॅलिलिओ’, ‘लीळाचरित्र :एक अभ्यास’, ‘संगीत सौभद्र: घटना आणि स्वरूप’, ‘ज्ञानेश्वर :काव्य आणि काव्यविचार’, ‘ संत सारस्वत: आकलन आणि आस्वाद’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
‘मराठी कविता :प्राचीन कालखंड’, ‘एकांकिका वाटचाल’, ‘अप्रकाशित तांबे’ वगैरे इतर लेखकाच्या सहकार्याने केलेली संपादनेही त्यांच्या नावावर आहेत.
त्यांनी ‘उत्तम’ या दिवाळी वार्षिकाचे 1969, ’70, ’71मध्ये वा. रा ढवळे यांच्याबरोबर संपादन केले होते.
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन साहित्यिकांना, कुलकर्णींच्या स्मरणार्थ दरवर्षी एक स्मृतिगौरव पुरस्कार देण्यात येतो.
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈