श्रीमती उज्ज्वला केळकर
२५ नोव्हेंबर – संपादकीय
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ( २५ नोहेंबर १८७२ ते ऑगस्ट १९४८)
नाटक आणि पत्रकारिता या दोन्ही क्षत्रात मोठे कर्तृत्व दाखवलेल्या कृ. प्र. खाडिलकर यांचा आज जन्मदिन.
नाटककार खाडिलकर – आपल्या प्रखर राष्ट्रवादाच्या समर्थनार्थ त्यांनी नाटके लिहिली. कांचनगडची मोहना, सवाई माधवरावांचा मृत्यू , कीचकवध, संगीत बायकांचे बंड, भाऊबंदकी, संगीत मेनका, इ. १५ नाटके त्यांनी लिहिली. त्यात संगीत मानापमान, सगीत स्वयंवर, भाऊबंदकी, कीचक वध ही नाटके खूप गाजली. त्यांची नाट्यप्रतिभा पुराण काळ आणि ऐतिहासिक काळ यात रमली. पण नाटके लिहिताना जिथे शक्य असेल, तिथे त्यांनी वर्तमानाचा धागा पुराण काळाशी जोडला. कीचकवध या नाटकात कर्झनशाहीचे वर्णन आहे. कीचक हे पात्र कर्झनवरूनच रंगवले आहे. त्यामुळे १९१० साली या नाटकावर बंदी आली होती.
त्यांच्या लेखणीमुळे मराठी नाटकांना वैभवाचा काळ आला, असं म्हंटलं जातं. राघोबा, आनंदी, रामशास्त्री, द्रौपदी, कंकभट अशी अविस्मरणीय पात्रे त्यांनी निर्माण केली.
१९२१पत्रकार खाडिलकर – खाडिलकर यांनी १८९३ मध्ये लेखनाला प्रारंभ केला. १८९५ मध्ये विविधज्ञान विस्तारात त्यांनी लिहीलेल्या एका लेखामुळे लो. टिळकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि त्यांनी खाडिलकरांना केसरीकडे बोलावून घेतले. १८९७ मधे ते ‘केसरी’त दाखल झाले. लो. टिळकांच्या जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत लेखन केले. १९०८ ते १९१०मध्ये टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपदक झाले. पुढे त्यांनी केसरीचे संपादकपद सोडले. १९१८ मधे टिळक व केळकर विलायतेला गेल्यानंतर ते पुन्हा केसरीचे संपादक झाले. १९२०ला टिळकांच्या निधंनानंतर त्यांचा केसरीशी संबंध संपला.त्यानंतर टिळक संप्रदायापासून ते वेगळे झाले व गांधीजींच्या राजकारणाचे समर्थक बनले.
त्यांनी १९०१ मधे ‘गनिमी काव्याचे युद्ध, १९१३ मधे बाल्कन युद्ध, १९१४ मध्ये चित्रमय जगत मधे ‘पहिले महायुद्ध’ यावर लेखमाला लिहिल्या.
१९२५ मधे नवाकाळ साप्ताहिक सुरू केले. हे साप्ताहिक, दैनिकाच्या स्वरुपात अजूनही चालू आहे. १९२७ मधे ‘नवाकाळ’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘हिंदू-मुसलमान वादाबद्दल एक लेख लिहिला होता. त्याबाद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
१९३५, ते ४७ या काळात त्यांनी अध्यात्म ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.
१९०७ साली झालेल्या तिसर्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९२१ साली गंधर्व विद्यालयातर्फे आयोजित केलेल्या संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते.
१९३३ मधे नागपूर येथे झालेल्या १८व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
खाडिलकरांचा लेखसंग्रह – ( भाग१ व २) – यात त्यांच्या महत्वाच्या लेखनाचा व भाषणांचा संग्रह केलेला आहे.
नाट्य परिषदेतर्फे नाट्यक्षेत्रात विशेष लक्षणीय कामगिरी करणार्या रंगकर्मीस, दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो.
☆☆☆☆☆
यशवंतराव चव्हाण – ( १२ मार्च १३ त२ २५ नोहेंबर ८४ )
यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री हे सर्वपरिचित आहे. नंतर केंद्रात ते संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री झाले, हेही सर्वांना माहीत आहे. ते राजनीतिज्ञ होते, तसेच थोडे साहित्यिक आणि श्रेष्ठ रसिक होते, हेमात्र सर्वांना माहीत असेलच असे नाही.
त्यांचे प्रकाशित साहित्य – १. आपले नवे मुंबई राज्य (१९५७), २. ऋणानुबंध (ललित लेख ) – १९७१, ३. कृष्णाकाठ ( आत्मचरित्र) – १९८४ ४. भूमिका – १९७९ ५. विदेश दर्शन, ६. सह्याद्रीचे वारे ( भाषण संग्रह), ७. युगांतर –स्वातंत्र्यपूर्व व स्वतत्र्योत्तर हिंदुस्थानच्या प्रश्नांची चर्चा इ. त्यांची पुस्तके आहेत.
यशवंरावांवरही अनेक पुस्तके लिहिली आहेत. रामभाऊ जोशी, अनंत पाटील, गोविंद तळवलकर , कृस्मृतीदिन. भा. बाबर इ. नी त्यांच्यावर लिहिले आहे.
त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली
☆☆☆☆☆
लीलावती भागवत ( ५ सप्टेंबर १९२० २५ नोहेंबर २०१३ )
आज लीलावती भागवत यांचाही स्मृतीदिन. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९२०चा. मराठीत बाल-कुमारांसाठी त्यांनी विपुल लेखन केलं. आकाशवाणीवरील वनिता मंडळ हा स्त्रियांचा कार्यक्रम २० वर्षे चालवला. त्यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ ने १९४० मध्ये झाला. या दोघांनी मिळून ५१ मध्ये मुलांसाठी ‘बालमित्र’ हे मासिक सुरू केले. त्यात नामवंतांचे लेख व द.ग. गोडसे यांची चित्रे होती. मुलांचे ते आवडते मासिक होते. पण त्या काळात पुस्तके विकत घेऊन वाचायची मानसिकता नव्हती. त्यामुळे पुढे ते आर्थिक तोट्यात आले आणि बंद करावे लागले. उभय पती- पत्नींनी आपल्या घराभोवतालचा परिसर मुलांसाठी मोकळा ठेवला. तिथे मुलांनी येऊन कोणतेही पुस्तक त्यांच्याकडून घेऊन वाचावे, अशी सोय केली. त्यांनी भा.रा. भागवतांच्या पुस्तकाचे संकलन केले आणि त्यांच्या नावातली काही महत्वाची अक्षरे घेऊन
त्या संकलनाला ‘भाराभर गवत’ असे गमतीदार नाव दिले.
पुण्याच्या अखिल भारतीय बाल-कुमार सस्थेच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे.वयाच्या ९०व्या वर्षीही त्या उत्साही आणि क्रीयाशील होत्या.
त्यांनी मुलांसाठी बरीच पुस्तके लिहिली. त्यापैकी काही – १. अभयारण्याची चोरी, २.आला विदूषक आला, ३. इंजीन हे छोटे, ४.कुडकुड थंडी ५. कोण असे हे राव ६. कोणे एके काळी७. चिट्टू पिट्टूच पराक्रम ७.झुमझुम झोका नि चमचम चांदण्या,८. स्वर्गाची सहल इत्यादी पुस्तके आहेत.
त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २. माहिती स्त्रोत – इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈