श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२)
दुःखसागराचा गूढप्रवासी
‘मी खरेच दूर निघालो
तू येऊ नकोस मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयात तुटती धागे’
असे तुम्ही म्हणालात आणि खरेच आमच्या हृदयाचे धागे तोडून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेलात.
‘जिथे असतील सुंदर मने
जिथे असेल समाधान
जिथे होतील स्वप्ने खरी
तिथे हे जीवना, मला घेऊन चल’
असं आवाहनही तुम्ही जीवनाला केलं होतं. पण तुम्ही परत न येण्याच्या टोकापर्यंत निघून गेलात. आज त्याला बारा वर्षं झाली. पण तुम्ही नाही असं वाटतच नाही.कारण गूढ गहन शब्दांनी बहरून आलेल्या तुमच्या कविता आमच्या मनात सतत रूंजी घालत असतात. आम्ही त्या कवितांत केव्हा हरवून जातो हे समजतही नाही आणि खर तर त्यातून बाहेर पडावसही वाटत नाही. खर सांगायचं तर
गूढ तुझ्या शब्दांची जादू
मनात माझ्या अशी उतरते
चांद्र नील किरणांच्या संगे
संध्येची जशी रजनी होते
इतक्या सहजपणे आम्ही त्यात रंगून जातो, गुंतून जातो. तुमचे शब्द, तुमच्या कल्पना, तुम्ही वापरलेली प्रतिके ही अगदी सहजासहजी समजावीत, पचनी पडावीत अशी नसतातच. पण
कळू न येतो अर्थ जरी, पण
दुःखकाजळी पसरे क्षणभर
खोल मनाच्या डोहावरती
कशी होतसे अस्फुट थरथर
पुढची कविता वाचावी का हा प्रश्न मनात येतच नाही. पहिल्या कवितेचे शेवटचे शब्द मनाला नकळतच दुस-या कवितेकडे घेऊन जातात.खर सांगू?
सोसत नाही असले काही
तरी वाचतो पुन्हा नव्याने
डोलत असते मन धुंदीने
हलते रान जसे वा-याने
मी दुःखाचा महाकवी असे तुम्ही अभिमानाने का म्हणत होता हे तुमच्या कविता समजून घेतल्याशिवाय नाही समजणार. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ‘मन कशात लागत नाही,अदमास कशाचा घ्यावा’ अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा आठवते ती तुमची कविता. ‘नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे,’ ही एकाकी पणाची भावना अशा नेमक्या शब्दात तुमच्याशिवाय कोण व्यक्त करणार? आता तुम्ही नसताना, ‘निळाईत माझी भिजे पापणी’ हे खरं असलं तरी ‘निळ्याशार मंदार पाऊलवाटा’ आमच्या आम्हालाच शोधाव्या लागणार आहेत. कित्येक कवींच्या कविता वाचल्या. कधी हसलो, कधी खुललो. कधी गंभीर झालो. पण
ग्रेस, तुझ्या काव्यप्रदेशी
माझे जेव्हा येणे झाले
जखम न होता कुठे कधीही
घायाळ कसे हे मन हे झाले
तुमच्या स्मृतीदिनी तुम्हाला स्मरायचं म्हणजे तरी काय करायचं ?जन्म मृत्यूची नोंद आणि मानसन्मानाची यादी तुमच्यासाठी महत्वाची नाहीच.तुमच्या शब्दांचा संग हाच तुमचा स्मृतीगंध. त्या आमच्या मनाच्या गाभा-यात नेहमीच गंधाळत राहतील. ‘गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी’ अशी अवस्था आजही असताना तुमच्या कविताच आधार असतील. म्हणून तर एवढंच म्हणावंसं वाटतं
संपत नाही जरी इथले भय
शब्दचांदणे उदंड आहे
त्या गीतांच्या स्मरणासंगे
दुःख सहज हे सरते आहे.’
दुःखे….न संपणारी
स्मृती…न संपणा-या. 🙏
☆☆☆☆☆
बाबूराव बागुल (17 जुलाई, 1930 – 26 मार्च, 2008)
दलित साहित्यात भरीव योगदान देणारे प्रतिभावंत लेखक श्री.बाबुराव बागूल यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहितगाव येथे झाला. बालपणा पासून विषमतेचे अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या साहित्यात त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. शालेय जीवनापासून त्यांच्यावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव पडला होता. कामगार चळवळ, अण्णाभाऊ साठे यांचेशी आलेला संपर्क, साम्यवादी विचारांचा प्रभाव, साम्यवादी साहित्याचा अभ्यास या सर्वांचा परिणाम त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात झाला.
जातीयवादामुळे भाड्याचे घर मिळणे मुश्किल झाल्याने त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. पण मनाला ते पटले नाही. त्यामुळे त्यांनी ते घर व परगावची नोकरीही सोडली. या अनुभवावरील त्यांनी लिहीलेली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा प्रचंड गाजली.
आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ व युगांतर’ या नियतकालिकांमधून त्यानी कथा लिहिल्या. त्यांचे लेखन हे दलित वर्गातील नव लेखकांना प्रेरणादायी ठरत होते.
श्री.बागूल यांचे साहित्य :
कादंबरी–
अघोरी, अपूर्वा, कोंडी, पावशा, सरदार, सूड इ.
कथासंग्रह–
जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत आहे
कवितासंग्रह–
वेदाआधी तू होता
वैचारिक–
आंबेडकर भारत
दलित साहित्य: आजचे क्रांतीविज्ञान
सन्मान व पुरस्कार–
अध्यक्ष, पहिले विद्रोही साहित्य संमेलन, मुंबई.
जनस्थान पुरस्कार–कुसुमाग्रज प्रतिष्ठान–2007
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार
26मार्च 2008 ला बागुलांचे नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस व साहित्यसेवेस अभिवादन!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈