सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वि. वा. पत्की
विश्वनाथ वामन पत्की(12 नोव्हेंबर 1912 – 27 एप्रिल 1992) हे कादंबरीकार, कथालेखक, समीक्षक होते.
मुंबईत एम ए केल्यावर त्यांनी लंडन येथून पत्रकारितेतील पदविका घेतली.
ते सुरुवातीला शिक्षक होते. मग महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्धी अधिकारी व नंतर जनसंपर्क अधिकारी झाले. ते जनसंपर्क, वृत्तपत्रविद्या, जाहिरातकला या विषयांचे अध्यापनही करत असत.
पत्कींनी विविध प्रकारचे लेखन केले. ओघवते निवेदन, समर्पक शब्दकळा, ललित लेखनाच्या तंत्राची चांगली जाणकारी ही ना. सी. फडकेंची लेखनवैशिष्ट्ये पत्कींच्या लेखनातही जाणवतात.
‘आंधळा न्याय’, ‘साक्षात्कार’, ‘लक्ष्मणरेषा’, ‘शोभेची बाहुली’ या कादंबऱ्या, ‘आराधना’, ‘ तुझं सुख ते माझं सुख’ हे कथासंग्रह, ‘पश्चिमवारे’ हे प्रवासवर्णन, ‘खरं सांगू तुम्हाला?’ व ‘वेळी – अवेळी’ हे दोन लघुनिबंधसंग्रह वगैरे पुस्तके त्यांनी लिहिली. शिवाय ‘युगप्रवर्तक फडके’ हा समीक्षात्मक ग्रंथ फडकेंनी शि. न. केळकर यांच्या सहकार्याने लिहिला.
त्यांनी चरित्रलेखनही केले. ते उत्तम अनुवादक होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती न्यायमूर्ती एम. सी. छगला यांच्या ‘रोझेस इन डिसेंबर’चा ‘शिशिरातील गुलाब’, भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’चा ‘माझा जीवनप्रवाह’ आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आत्मचरित्राचा ‘स्वप्नसिद्धीची दहा वर्षे’… हे सर्व अनुवाद वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले.
‘दीपगृह’ हे वि. स. खांडेकरांच्या खासगी पत्रांचे संपादनही त्यांनी केले.
वि. वा. पत्की यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈