सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २८ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
बाबुराव गोखले
बाबुराव गोखले (15 सप्टेंबर 1916 – 28 जुलै 1981) हे ज्येष्ठ नाटककार व गीतकार होते.
बाईंडिंग आणि वृत्तपत्र विक्री हा त्यांचा व्यवसाय.पण त्यांना खाण्याचा, चालण्याचा, पळण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटणाऱ्या गोष्टी करण्याचा छंद होता. ते रोज पहाटे साडेतीन ते नऊपर्यंत कात्रज – खेड -शिवापूर – सिंहगड -खडकवासला असे चालत. काही काळ ते पुणे – लोणावळा पायी जात. पुढे दर रविवारी सायकलवरून खोपोलीपर्यंत जात.
पुणे ते कराची सायकलवरून जाऊन त्यांनी जद्दनबाई, हुस्नबानू, बेगमपारोची गाणी मनमुराद ऐकली. ते स्वतः तबला वाजवत. नर्गिसची आई जद्दनबाई यांनी त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली.
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांच्या मदतीने ते 1936साली बर्लिन ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले. अनवाणी पायांनी ते 40 मैल पळू शकतात, हे पाहून हिटलरने त्यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी व हवे ते खाण्यासाठी पास दिला.
बडोद्याच्या महाराजांमुळे ते लंडनलाही गेले. तिथे त्यांच्या स्वागताला 3-4 गव्हर्नर्स गाड्यांसह हजर होते. कारण दर पावसाळ्यात पुण्याला येणाऱ्या गव्हर्नरला ते मराठी – हिंदी भाषा व क्रॉसकन्ट्री शिकवायला जात असत.
हातावर शीर्षासन करत ते पायऱ्या चढत. बायकोला पाठुंगळीस घेऊन त्यांनी 43 वेळा पर्वती सर केली. क्रॉसकंट्री स्पर्धेचे 257 बिल्ले जिंकणाऱ्या गोखलेंना काका हलवाई 1 शेर दूध व 1 शेर पेढ्याचा खुराक देत. पैजेच्या जेवणात ते 90 जिलब्यांचे ताट सहज फस्त करीत. वय झाल्यावरही ते रोज 15 पोळ्या खात.
आपल्या डझनभर नाटकांनी गोखलेंनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांची ‘करायला गेलो एक’, ‘रात्र थोडी सोंगे फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘संसार पाहावा मोडून’ वगैरे नाटके खूपच गाजली. थ्री स्टार्स ही कंपनी स्थापन करून त्यांनी अनेक उत्तम नाटकं दिली. दिग्दर्शक, निर्माता, प्रमुख भूमिका,पार्श्वसंगीत, म्युझिक सेट्स तयार करणे या सगळ्यांत ते अग्रेसर असत.
गोखलेंनी लिहिलेली ‘वारा फोफावला’, ‘ नाखवा वल्हव’ वगैरे गीतेही खूप गाजली.
‘सौभाग्यकांक्षिणी’, ‘साधी माणसं’, ‘राजा गोसावीची गोष्ट’, ‘गंगेत घोडं न्हालं’ इत्यादी चित्रपटांत त्यांचा अभिनेता/ गीतकार /दिग्दर्शक/कथालेखक/ पटकथालेखक वगैरे (यापैकी काही)भूमिकांत सहभाग होता.
बाबुराव गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈