श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३१ ऑक्टोबर –  संपादकीय  ?

श्रीकृष्ण अर्जुनवाडकर (31 ऑक्टोबर 1926 ते 30 जुलै 2013 )

*श्रीकृष्ण अर्जुनवाडकर हे व्यासंगी अध्यापक, अभ्यासक, संशोधक होते. संस्कृत आणि अर्धमागधी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि सस्कृतमधून लेखन केले.

संस्कृत योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धांत इ. विषयांवर त्यांनी लेखन केले तसेच व्याख्याने दिली. महाराष्ट्र सरकारने पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी स्वत:कडे घेतली, त्यापूर्वी त्यांनी, ८वी ,९वी आणि १०वी ची पाठ्यपुस्तके तयार केली. त्यांनी खालील पुस्तके लिहिली. १.मराठी घटना,रचना परंपरा, २. अर्धमागधी घटना आणि रचना ३. अर्धमागधी शालांत प्रदीपिका ४. प्रीत-गौरी-गिरीशम् ( सस्कृत संगीतिका) ५. शास्त्रीय मराठी व्याकरण

संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्याजवळ नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंग्रजी अभिवादनांना त्यांनी समर्पक सोपे शब्द सुचवले. उदा. गुड मॉर्निंग- सुप्रभातम् , गुड डे- सुदिनम्,  स्लीप वेल- सुषुप्त, गुड बाय -स्वस्ति इ॰

त्यांच्या जन्म  दिनानिमित्त त्यांचे संस्मरण.

*आनंदीबाई शिर्के

आनंदीबाई शिर्के या जुन्या काळातल्या, म्हणजे पहिल्या पिढीतल्या लेखिका आणि बालसाहित्यिका. ज्या काळात समाजात स्त्रियांचे शिकणेदेखील मान्य नव्हते, त्या काळात त्यांनी कथा लिहिल्या, आत्मचरित्र लिहिले आणि मुलांसाठीही  कथा लिहिल्या. आपल्या कथांमधून आणि ‘सांजवात’ या आत्मचरित्रातून,  जुन्या काळातील स्त्रीजीवनाचे वास्तव चित्रित केले आहे॰  एकत्र कुटुंब पद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधने, समाजातील रूढी.इ.  गोष्टींचा त्यांनी आपल्या लेखनातून वेध घेतला आहे.

निबंध, कथा, बालसाहित्य, स्त्री साहित्य, अनुवादीत साहित्य (गुजरातीतून), आत्मवृत्त  असे त्यांचे त्या काळाच्या मानाने विपुल लेखन आहे.  

त्यांची बहुविध साहित्य निर्मिती स्त्रियांशी निगडीत आशा सामाजिक समस्यांचे चित्रीकरण करणारी आहे. त्या स्वत: पुरोगामी विचारांच्या होत्या. मराठा समाजातील स्त्रियांची स्थिती, गुजरातमधील सामाजिक वातावरण, जुन्या मराठी भाषेतील शब्द, म्हणींचे वैपुल्य इ. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील.

कथाकुंज, कुंजविकास, जुईच्या काळ्या, तृणपुष्पे, गुलाबजांब इ. त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मुलांसाठी त्यांनी वाघाची मावशी, कुरूप राजकन्या व तेरावी कळ, आपली थोर माणसे इ. पुस्तके लिहिली. ‘रूपाळी’ ही त्यांची कादंबरी. त्यांच्या सर्व पुस्तकात ‘सांजवात’ हे पुस्तक विशेष गाजले. यातील निवेदन प्रांजल, हृदयस्पर्शी, वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. हे पुस्तक १९७२ साली  म्हणजे त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी प्रकाशित झाले.  समकालीन लेखकांमध्ये महत्वाच्या लेखिका म्हणून यांचे नाव घेतले जाते. मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी उत्तम कथासंग्रहाला दिला जाणारा पुरस्कार ‘आनंदीबाई शिर्के’ या नावाने दिला जातो.

आज त्यांच्या स्मृतीदिंनंनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली.  

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments