श्रीमती उज्ज्वला केळकर
३ जानेवारी – संपादकीय
मराठीतील नावाजलेल्या लेखिका म्हणजे सरिता पदकी. पूर्वाश्रमीच्या त्या शांता कुलकर्णी. १३ डिसेंबर १९२८ मधे ठाणे शहाराजवळ आगाशी येथे त्यांचा जन्म झाला. त्या संस्कृत विषय घेऊन पुणे विद्यापीठात एम.ए. ला पहिल्या आल्या. ‘सत्यकथे’त लेखन करणारे, अर्थशास्त्रज्ञ मंगेश पदकी, हे त्यांचे पती. तेही उत्कृष्ट लेखक होते.
वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनास प्रारंभ केला. पुढे हयातभर त्यांची लेखनाशी जवळीक राहिली. महाविद्यालयात असताना त्यांचे सहाध्यायी पुरुषोत्तम पाटील स्वहस्ते त्यांचे लेखन उतरवून घेत. साहित्य,अभिरुची, सत्यकथा इ. दर्जेदार नियतकालिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. त्यामुळे साहित्यिक वर्तुळात त्यांचे मानाचे स्थान निर्माण झाले. त्यांचे कवितावाचनही अतिशय प्रभावी असे.
सरिता पदकी यांचे लेखन चौफेर होते. कविता, कथा, नाटके या त्रिविध प्रकारात त्यांनी लेखन केलेच पण इंग्रजीतील उत्तम साहित्याचाही त्यांनी मराठीत अनुवाद केला. मराठीत, मुलांसाठी निघत असलेल्या ‘रानवारा’ या मासिकाच्या सल्लागार मंडळावर त्या होत्या. पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. ‘किशोर’ मासिकात ७०च्या दशकात त्यांनी जे लेखन केले, ते अतिशय लोकप्रीय झाले.
सरिता पदकी यांची काही पुस्तके –
कविता संग्रह – चैत्रपुष्प, अंगणात माझ्या लगनगंधार
कथा संग्रह – घुम्मट, बारा रामाचे देऊळ
नाटक –सीता, बाधा
अनुवादीत – खून पहावा करून- मूळ इंग्रजी लेखक – नाटककार ऑर्थर वॅटकिन यांच्या ‘नॉट इन द बुक’ या नाटकाचा अनुवाद
पांथस्थ – यूजीन ओनील यांच्या नाटकाचा अनुवाद
काळोखाची लेक – ब्राझिलच्या झोपडपट्टीत रहाणार्या करोलिना मारीया डी जीझस यांच्या ‘चाइल्ड ऑफ डार्कनेस या आत्मनिवेदनाचा अनुवाद
संशोधक जादूगार – वेस्टिंग हाऊसच्या चरित्राचा अनुवाद सात रंगाची कमान माझ्या पापणीवर – जपानी कवितांचा अनुवाद
बालसाहित्य – करंगळ्या, गुटर्र गूं, नाच पोरी नाच ( कविता) अक्कल घ्या अक्कल, जंमत टंपू टिल्लूची, छोटू हत्तीची गोष्ट, हसवणारे अत्तर ( कथा) सरिता पदकी यांचं बालसाहित्याही मुलांना खूप आवडतं या प्रतिभावंत लेखिकेचं निधन वृद्धापकाळाने ३जानेवारी २०१५ मधे अमेरिकेत झालं.
☆☆☆☆☆
अमरेन्द्र गाडगीळ हे मराठी लेखक, विशेषत: बालसाहित्याचे लेखक आणि प्रकाशक, बाल-कुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक होते. त्यांनी दैवत कोश तयार केला, ही त्यांची महत्वाची कामगिरी. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अमरेन्द्र गाडगीळ जन्म २५ जून १९१९ साली झाला.
अमरेन्द्र गाडगीळ यांचे साहित्य – अज्ञाताची वचने, ईशावस्य केनोपनिषद (६ भाग) , उक्ति विशेष, जीवन संग्राम, महाभारत सर्वांगीण दर्शन, लोकसेवक चरित्र मालेतील ठक्करबाप्पा यांचे चरित्र, त्याचप्रमाणे रविशंकर महाराज चरित्र, महर्षी आईनस्टाईन, वंदे मातरम, वीर आणि परमवीर रामबंधू त्याग सिंधू (कथा), शतकुमार कथा (५ भाग), देवदिकांच्या गोष्टी, किशोर मित्रांनो, श्री गणेश कोश ( ६ खंड– १९६८ पाने) , श्री राम कोश ( वाल्मिकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित, ६ खंड– १९८१ पाने), श्री हनुमान कोश, साहित्य सरिता इ. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. दैवत कोशांची निर्मिती हे त्यांनी साहित्याला दिलेले विशेष योगदान मानले जाते.
☆☆☆☆☆
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी – हे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि थोर लेखक दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र. ते स्वातंत्र्य सैनिक होते. वकील होते. न्यायाधीश होते आणि लेखकही होते. मुंबईत उच्च न्यायालयाचे ते माजी मुख्य न्यायाधीश होते.
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म २०नोहेंबर १९२७ला झाला.
प्रकाशित साहित्य – अंतर्यात्रा, काळाची पाऊले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझील दूर राहिली, माणूसनामा, शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहू या.
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारीयांना २००४ला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
३ जानेवारी २०१९ल त्यांना देवाज्ञा झाली.
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अमरेन्द्र गाडगीळ, सरिता पदकी या तिघांच्या स्मृतिदिनी त्यांना हार्दिक श्रद्धांजली. .
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈