श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ३ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

माधव काटदरे:

माधव काटदरे हे निसर्गकवी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक ऐतिहासिक व व्यक्तीपर काव्यलेखन केले आहे. काही शिशुगीते व विनोदी कविताही त्यांनी रचल्या आहेत.

छ. शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी हे त्यांच्या काव्याचे विषय होते. पानपतचा सूड, तारापूरचा रणसंग्राम, जिवबादादा बक्षी या त्यांच्या काही ऐतिहासिक कविता. याशिवाय गोविंदाग्रज, ना. वा. टिळक, लकवी, कवी विनायक यांवरही त्यांनी कविता लिहिल्या होत्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कवितांचा अनुवादही त्यांनी केला होता.

गीतमाधव, धृवावरील फुले, फेकलेली फुले आणि माधवांची कविता हे त्यांचे काव्यसंग्रह.

‘हिरवे तळकोकण’ या दीर्घ, निसर्ग कवितेमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावनला त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

अनंत हरी गद्रे

पत्रकरिता, नाटिकालेखन, जाहिरातलेखन, समतेचा पुरस्कार व त्याप्रमाणे आचरण अशा विविध पैलूंनी नटलेले व्यक्तिमत्व म्हणजे अनंत हरी गद्रे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूखचा. पुणे येथे शिक्षण पूर्ण केले. रा. ग. गडकरी व श्री. म. माटे हे प्रसिद्ध साहित्यिक त्यांचे सहाध्यायी   होते. त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची ओढही होती. किर्तनाच्या माध्यमातून ते  महापुरूषांवर आख्याने देत.

ज्या काळात दीर्घ काळ चालणारी नाटके लिहिली जात व बघितली जात, त्या काळात त्यांनी दीड, दोन, तीन तासाच्या नाटिका लिहून नाटकाला सुटसुटीत स्वरूप प्राप्त करून दिले. प्रेमदेवता हे त्यांचे पहिले नाटक 1930 ला आले व लोकांनी उचलून धरले. आद्य नाटिका लेखक असा त्यांचा गौरव झाला.

त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते. वाक्प्रचारातंचे भांडारच त्यांच्या कडे होते. शब्दांवर हुकूमत होती. या सर्वाचा उपयोग करून घेऊन त्यांनी ग्राहकाला जिंकून घेतील अशा जाहिराती करण्यास सुरूवात केली. अनेक हिंदी व मराठी नाट्य व चित्रपट निर्मात्यानी त्याचा उपयोग करून घेतल्या. त्यांच्या जाहिरातीचे वेगळेपण व कौशल्य यामुळे लोक त्यांना जाहिरात जनार्दन म्हणू लागले.

लो. टिळक आणि अच्युतराव कोल्हटकर यांना आदर्श मानून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. कोल्हटकरांच्या ‘संदेश’ ची जबाबदारी त्यांनी उचलली. चार ओळींची बातमी न देता, प्रसंगाचे   वर्णन करून बातमी देण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या बातम्यातील वेगळेपण लोकांना जाणवू लागले. पुढे मौज साप्ताहिकातील त्यांची संपादकीयेही लोकप्रिय होऊ लागली. 1934मध्ये त्यांनी ‘निर्भिड’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यातून ते सामाजिक समतेचा पुरस्कार करू लागले. स्पृश्यास्पृश्य, केशवपन यासारख्या विषयांना विरोध करून लिहू लागले. समतेसाठी सत्यनारायण सुरू करून अनिष्ट प्रथांना कृतीतून विरोध केला. या चळवळीत त्यांना र. धों. कर्वे, सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य, डाॅ. कुर्तकोटी या सारख्यांचा पाठींबा मिळाला. प. सत्यनारायणाच्या प्रसादासाठी ते सर्वांना परवडणारी झुणकाभाकर प्रसाद म्हणून वाटू लागले. अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांच्या पायाचे तिर्थ प्राशन करू लागले. झुणकाभाकर चळवळींचे ते जनक ठरले.

साहित्य संपदा:

नाटिका: आई, कुमारी, पूर्ण स्वातंत्र्य, घटस्फ़ोट, पुणेरी जोडा, प्रेमदेवता इ.

नाटक: कर्दनकाळ, पाहुणा, मूर्तिमंत सैतान, स्वराज्यसुंदरी इ.

सन्मान:

मराठी नाट्यसंमेलन, मुंबई

चे 1930 साली अध्यक्षपद.

शंकराचार्यांनी ‘समतानंद’ ही उपाधी दिली.

पुरस्कार: मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे समतानंद अ. ह. गद्रे पुरस्कार दिला जातो. तो आतापर्यंत अनेक नामवंताना मिळाला आहे.

वयाच्या 77व्या वर्षी 1967 मध्ये त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन.

या चतुरस्त्र साहित्यिकास विनम्र अभिवादन!🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments