सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी)
लेखक, पत्रकार, आणि मराठी विश्वकोशकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री गणेश रंगो भिडे यांचा आज स्मृतीदिन.
(६/६/१९०७ – ८/६/८१).
एम.ए. बी. टी. असूनही श्री. भिडे यांनी शिक्षकी पेशा मात्र स्वीकारला नाही. ते प्रभात फिल्म कंपनीत नोकरी करत असतांना “ Household Encyclopedia “ आणि विणकाम, पाकशास्त्र , यावरील पुस्तके पाहून, अशा प्रकारची पुस्तके मराठीत असणे आवश्यक आहे या प्रबळ विचाराने त्यांनी त्यासाठीच काम करण्याचे ठरवले. दोनच दिवसात त्यांनी जवळपास ३५ विषयांची यादी तयार केली. २०/४/३१ रोजी “ व्यावहारिक ज्ञानकोश मंडळा “ची स्थापना झाली, आणि १९३५ साली “ व्यावहारिक ज्ञानकोशा” चा पहिला भाग प्रकाशित झाला. विशेष म्हणजे श्री. भिडे यांनी स्वतः सगळीकडे फिरून त्याची विक्री केली. त्यातले व्यासंगी लेखकांचे उत्तम दर्जाचे लेखन, चित्रे – फोटो यांचा समावेश, सुबक बांधणी, आणि त्यामानाने कमी किंमत, ही या कोशाची वैशिष्ट्ये होती. या कोशाचे एकूण पाच खंड प्रसिद्ध झाले. याचबरोबर “ अभिनव मराठी ज्ञानकोश “ हा स्वातंत्र्योत्तर कालानुरूप नवे ज्ञान देणारा पाच खंडातील कोशही त्यांनी निर्मिला होता. याव्यतिरिक्त त्यांनी “ बालकोश “ ही लिहिला होता. अशा कोशांच्या संपादनाचे मोठेच काम श्री. भिडे यांनी केले होते. त्यांची “ शैक्षणिक कोश “ निर्मितीची योजना मात्र पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
श्री. भिडे हे १९३२ साली सुरू झालेल्या “ सिनेमासृष्टी “ या मराठीतील पहिल्यावहिल्या सिने-नाट्य विषयक नियतकालिकाचे कर्ता करविता होते. सेवक , पुढारी , उषःकाल, या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले होते. तसेच केसरी आणि त्रिकाल या वृत्तपत्रांचे ते वार्ताहरही होते.
“कलामहर्षी बाबुराव पेंटर“ हे अतिशय गाजलेले चरित्रात्मक पुस्तक, आणि “फोटो कसे घ्यावेत“, “सावरकर सूत्रे“ इत्यादि त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध झाली होती . श्री. पु.ल.देशपांडे यांच्या सहकार्याने त्यांनी “ कोल्हापूर दर्शन “ हे पुस्तकही लिहिले होते.
८ जून १९८१ रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
श्री. गणेश रंगो भिडे यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈