प्राचीवरती सूर्य उगवला
अथांग सागर पुढे पसरला
पाण्यावरच्या लाटांसह हा
जीवनसागर भासे मजला
– नीलांबरी शिर्के
|| शुभ दीपावली ||
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
५ नोव्हेंबर – संपादकीय
आज ५ नोव्हेंबर-— चोखंदळपणे एका वेगळ्याच वाटेवरून जात, मराठी साहित्यात निसर्गसाहित्याची अनमोल भर घालणारे वन्यजीव अभ्यासक श्री. मारुती चितमपल्ली यांचा आज जन्मदिन.( सन १९३२ ) वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे केलेल्या नोकरीसह आयुष्यातली ६५ वर्षे जंगलांच्या सान्निध्यात राहून, तेथील प्राणीजीवन , आणि त्या जीवनातले बारकावे टिपून, ते आपल्या अतिशय ओघवत्या शैलीत, बारकाव्यांसहित रेखाटणारे त्यांचे लेखन वाचकांना आवडायलाच हवे असेच— याचे कारण असे की, याविषयीच्या तपशीलवार माहितीला त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनशैलीचे सुंदर कोंदण लाभलेले आहे.
“ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी —-” ही कविता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शाळेत शिकलेली आहे. पण त्यातले अतीव कारुण्य मनाला अतिशय भिडल्यामुळे जंगलातील पक्ष्यांबद्दल कमालीची आस्था आणि ओढ वाटून, त्या प्राणी-पक्षी यांच्या विश्वाची सखोल माहिती मिळवायची, आणि जनसामान्यांपर्यंत ती आपल्या लिखाणाच्या माध्यमातून पोहोचवायची, हाच आयुष्यभराचा ध्यास घेणारे श्री. चितमपल्ली हे एक विरळेच व्यक्तिमत्व. घरच्यांबरोबर रानवाटा तुडवता तुडवता त्यांना लहानपणापासूनच पक्ष्यांची आणि वन्य प्राण्यांची खूप माहिती मिळाली होती. आणि त्याच जोडीने त्याबाबतच्या त्यांच्या मामाच्या अंधश्रद्धाही समजल्या होत्या. पण चितमपल्ली यांचे वैशिष्ट्य हे की, स्वतः अशा कुठल्याही अंधश्रद्धेचा बळी न होता, त्या माहितीचा त्यांनी संशोधनासाठी उपयोग केला. वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, पक्ष्यांचे विशाल जग, याविषयी त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यासंदर्भात निबंध-वाचनही केले. नोकरीदरम्यान विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली यांच्यासोबत त्यांनी अनेक ठिकाणची जंगलं अक्षरशः पिंजून काढली होती. आणि पुढे वन्यजीवन संवर्धनासाठी जनजागृती व्हावी म्हणून चळवळही सुरु केली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालकपदही त्यांनी भूषवलेले आहे. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीचे ते सदस्य होते. सन २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांचे एक खूप मोलाचे काम म्हणजे, त्यांनी जंगल आणि त्याभोवतीचे विश्व यातील कितीतरी घटकांना नवी नावे दिली. या मूळ तेलगूभाषिक माणसाने मराठीच्या समृद्ध शब्दवैभवात आणखी सुमारे एक लाख शब्दांची मोलाची भर घातलेली आहे. पक्षीशास्त्रातल्या अनेक इंग्लिश संज्ञांचे त्यांनी मराठी नामकरण केलेले आहे. उदा. कावळ्यांची वसाहत- ज्याला इंग्लिशमध्ये rookery असे म्हणतात, त्याला त्यांनी ‘ काकागार ‘ असे समर्पक नाव दिले. तसेच ‘ सारंगागार ‘ हे बगळ्यांसारख्या पक्षांच्या विणीच्या जागेचे नाव. फुलांच्या बाबतीत घाणेरीला ( टणटणी )
‘ रायमुनिया ’, बहाव्याला ‘ अमलताश ‘ ही नावे त्यांच्यामुळेच लोकांना माहिती झाली आहेत.
“ आनंददायी बगळे “ ( संस्कृत साहित्यातील काही पक्षी ), “ घरट्यापलीकडे “, “ जंगलाचं देणं “,
“ निसर्गवाचन “, “ पक्षीकोश “, “ रानवाटा “, “ शब्दांचं धन “, अशी त्यांची कितीतरी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. यापैकी “ पक्षी जाय दिगंतरा “ ही त्यांची अतिशय प्रसिद्ध साहित्यकृती आहे.
त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही असे—भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार, सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, ‘ रानवाटा ‘ या पुस्तकासाठी उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, म. रा. मराठी विभागाकडून ‘ विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार “, “ १२ व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार “ इ .
पुण्याची ‘अडव्हेंचर’ ही गिर्यारोहण संस्था ‘ मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ‘ देत असते.
“ मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी “ हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले गेले आहे.
विशेष सांगायला हवे ते हे की, मराठी, तेलगू, गुजराती, उर्दू, जर्मन, आणि रशियन एवढ्या भाषा तर त्यांना अवगत होत्याच, पण परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचा अभ्यास केलेला असूनही, वयाच्या ८४ व्या वर्षी कालिदास संस्कृत विद्यापीठाचा “ प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण “ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला.
असं विविधांगी व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री. मारुती चितमपल्ली यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी अतिशय आदरपूर्वक वंदन.
☆☆☆☆☆
आज ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती शकुंतला गोगटे यांचा स्मृतिदिन.( १९३० – ५/११/१९९१ ) श्रीमती गोगटे यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा संग्रह असे विपुल लिखाण केलेले आहे. त्यांचे बरेचसे लिखाण सामाजिक विषय डोळ्यांसमोर ठेवून केल्याचे जाणवते. त्यातही, पांढरपेशा मध्यमवर्गाचे जीवन रंगवलेले दिसते. बूमरँग, मर्यादा, सारीपाट, अभिसारिका, समांतर रेषा, त्याला हे कसं सांगू?, सावलीचा चटका, माझं काय चुकलं, मी एक शून्य, दोघी, मना तुझा रंग कसा, झंकार, ही आणि त्यांनी लिहिलेली इतर पुस्तके वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेली आहेत. त्या “ सर्वोत्कृष्ट स्त्री लेखिका “ म्हणून ओळखल्या जात होत्या.
श्रीमती शकुंतला गोगटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈