श्रीमती उज्ज्वला केळकर

? ६ जानेवारी –  संपादकीय  ? 

महामहोपाध्याय. विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव हे वैदिक साहित्याचे अभ्यासक होते. डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळात’ सहसंपदक म्हणून १९२१ मध्ये ते रुजू झाले. या कोशात वेदविद्या खंडाच्या संपादन कार्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.               

महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्यापनाचा त्यांनी पाया घातला. संपूर्ण ऋक्संहितेचे १९२८ मध्ये त्यांनी प्रथम भाषांतर केले. अथर्ववेदाचेही त्यांनी मराठीत भाषांतर केले. पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्य शब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायींचा व गणपाठाचा शब्दकोश हेही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. प्राचीन भारतीय स्थलकोशाचा प्रथम खंडही त्यांनी १९६९ मध्ये प्रकाशित केला. त्यांचे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे त्यांनी मराठीत चरित्र कोश संपादन केले. भारतीय चरित्रकोश मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्राचे ३ कोश संपादित करून प्रसिद्ध केले. (१९३२, १९३७ , १९४६) या चरित्रकोशाच्या सुधारलेल्या आवृत्तीस, १९३७ साली अहिंदी प्रांतात प्रकाशित झालेला  सर्वोत्कृष्ट हिन्दी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले.

पुरीच्या शंकराचार्यांनी  त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी दिली, तर चिदंबरंच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘विद्यानिधी’ ही उपाधी दिली. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना १९६५ मध्ये संस्कृत सन्मानपत्र दिले गेले. त्यांच्या विद्वत कार्याच्या गौरवार्थ  ‘रिव्हू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह  इयर्स हा इंग्रजी ग्रंथ १९६७ मधे तयार झाला. राष्ट्रपतींच्या हस्तेच तो, त्यांना अर्पण करण्यात आला. पुणे विद्यापीठाने १९६९ मधे डी. लिट. ही सन्मान पदवी त्यांना बहाल केली, तर भारत सरकारने १९७१ साली ‘पद्मश्री’ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म १फेब्रुवारी १८८४चा तर त्यांचे निधन ६ जानेवारी १९८४ साली झाले.

या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र आदरांजली.   

 ☆☆☆☆☆

प्रा.प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील सुल्लाळी येथे १९४३ साली झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या माथ्यावरचे आई-वडलांचे छत्र हरवले. बहिणीने त्यांचा सांभाळ केला.  गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा सुरू झाली.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद इथे मिलिंद महाविद्यालयात झाले. मराठवाडा विद्यापीठातून, इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून त्यांनी एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. १९६६ मधे आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले पुढे उपप्राचार्य व प्राचार्य झाले. १९८८ मध्ये ते निवृत्त झाले.

‘अस्मितादर्श’मधून त्यांनी आपले लेखन सुरू केले. ‘आठवणींचे पक्षी’ हे त्यांचे आत्मचरित्र. याला साहित्य अ‍ॅकॅडमीचा १९८३ सालचा पुरस्कार जाहीर झाला होता.  या आत्मचरित्राचे ११ भारतीय भाषात अनुवाद झाले आहेत. याशिवाय ‘असं हे सगळं’, ‘पोत आणि पदर’ ही त्यांची आणखी २ पुस्तके .त्यांचा साहित्यिक व सामाजिक संस्थांशी जवळचा संबंध होता. एक सहृदयी, प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

ते अनेक संमेलनांचे अध्यक्ष किंवा स्वागताध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या  आखाडा बाळापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७९ मधे औरंगाबाद येथे झालेल्या तिसर्‍या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.  १९८१ मधे औरंगाबाद येथे झालेल्या इंडिया बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्सचे ते स्वागताध्यक्ष होते.  १९८२ मधे झालेल्या पहिल्या दलित नाट्यमहोत्सवाचेही ते स्वागताध्यक्ष होते. 

 त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. साहित्य अ‍ॅकॅदमीच्या मानाच्या पुरस्काराबरोबरच त्यांना राज्यशासनाचाही पुरस्कार मिळाला आहे. लातूर नगर परिषदेने त्यांचा ‘भूमिपूत्र’ म्हणून त्यांचा विशेष गौरव केला आहे. आंबेजोगाई इथे यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार त्यांना दिला गेला आहे. रयत शिक्षण मंडळाचाही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने  आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

आज त्यांचा स्मृतिदिन (६जानेवारी २०१०). या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याला विनम्र अभिवादन.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments