सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रसिद्ध मराठी लेखिका श्रीमती कमला फडके यांचा आज स्मृतिदिन. ( ४/८/१९१६ – ६/७/१९८० ) 

त्या काळचे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. ना. सी. फडके यांच्या सुविद्य पत्नी , आणि सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची धाकटी बहीण , अशी ठळक ओळख असणाऱ्या कमला फडके यांनी स्वतःच्या समृद्ध लेखनामुळे साहित्यविश्वाला स्वतःची “ उत्तम लेखिका “ अशी पूर्णपणे स्वतंत्र आणि तितकीच ठळक ओळख करून दिली होती. 

ना. सी. फडके यांच्या “ झंकार “ या साप्ताहिकात कमलाताईंचे लेख , कथा , मुलाखती हळूहळू प्रसिद्ध होऊ लागल्या, आणि त्यांच्यातली लेखिका वाचकांसमोर आली. पुढे याच साप्ताहिकात इंग्रजी साहित्याचा परिचय करून देणारे त्यांचे एक वेगळे सदर प्रसिद्ध होऊ लागले , आणि लेखिका म्हणून त्यांची खरी ओळख निर्माण झाली. अनंत अंतरकर यांच्या ` हंस ` आणि ` मोहिनी ` या सुप्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या. तसेच इतर कथा ` किर्लोस्कर ` आणि ` स्त्री ` मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या. 

लेखनासोबतच त्यांनी नागभूषण नावाच्या प्रख्यात गुरूंकडून कथक नृत्याचेही शिक्षण घेतले होते. तसेच ना. सी. फडके यांच्या “ जानकी “ या नाटकातली मुख्य भूमिकाही त्यांनी समर्थपणे साकारली होती, ज्याचे चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या मान्यवरांनी कौतुक केले होते. आणि या दोन्ही गोष्टी विशेषत्वाने सांगण्यासारख्या आहेत.

त्यांचे वैविध्यपूर्ण असे प्रकाशित साहित्य :— 

 १. आसावरी – ही संगीत-विश्वावर आधारित कादंबरी 

 २. ` उटकमंडची यात्रा ` आणि ` त्रिवेंद्रमची सफर ` – ही दोन प्रवासवर्णने 

 ३. एडमार पो यांच्या भयकथा — हा अनुवादित कथासंग्रह 

 ४. जेव्हा रानवारा शीळ घालतो —  कादंबरी 

 ५. थोरांच्या सहचारिणी – लेखसंग्रह 

 ६. धुक्यात हरवली वाट – कादंबरी 

 ७. निष्कलंक – अनुवादित कादंबरी – मूळ लेखक हिल्टन 

 ८. पाचवे पाऊल – एका अणुशास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

 ९. प्रा. फडके यांची गाजलेली भाषणे – संकलन व संपादन 

१०. बंधन – मिरजेच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

११. भूल – हातून चुकून झालेल्या खुनाची किंमत चुकवणाऱ्या एका पुरुषाची कथा सांगणारी कादंबरी 

१२. मकरंद – कथासंग्रह 

१३. हृदयाची हाक — १९७१ साली जगातली पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या 

     “ One Life “ या इंग्रजीतील आत्मकथनाचा मराठी अनुवाद 

१४. ओशो, म्हणजेच आचार्य रजनीश यांच्या अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत केलेले अनुवाद 

–यापैकी “ निष्कलंक “ या त्यांच्या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात खास पारितोषिक देऊन 

गौरविण्यात आले होते. 

असे विविधांगी लेखन करणाऱ्या श्रीमती कमला फडके यांना त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली . 🙏

☆☆☆☆☆

इतिहास-संशोधक म्हणून अधिकतर प्रसिद्ध झालेले श्री. पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांचाही आज स्मृतिदिन. 

( ५/१/१८८६ – ६/७/१९२१ ) 

पुण्याच्या ` भारत इतिहास संशोधक मंडळात ` सदस्य म्हणून कार्यरत असतांना श्री. पटवर्धन यांचे त्या मंडळाच्या वृत्तांमध्ये आणि त्रैमासिकांमधून इतिहासविषयक अनेक लेख सातत्याने प्रकाशित होत असत. 

याच्याच जोडीने “ राष्ट्रहितैषी “ नावाचे साप्ताहिकही त्यांनी बराच काळ चालवले होते. 

“ राष्ट्रकुटांचा पुणे ताम्रपट “ हाही त्यांनीच प्रकाशित केला होता. 

त्यांचे विशेषत्वाने सांगायला हवे असे पुस्तक म्हणजे “ बुंदेल्यांची बखर “ हे त्यांनी अनुवादित केलेले पुस्तक —

“ तारिखे दिलकुशा “ हे भीमसेन सक्सेना लिखित एक फारसी हस्तलिखित होते. कॅप्टन जोनाथन स्कॉट यांनी १८७४ मध्ये त्याचा इंग्रजी अनुवाद केला होता. आणि १९२० साली श्री. पटवर्धन यांनी त्याचा मराठीत केलेला अनुवाद म्हणजे हे पुस्तक . 

इतिहास संशोधनासाठी केले जाणारे काम लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने उत्तम लेखन करणाऱ्या श्री. पटवर्धन यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments