श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ७ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

एकाहून एक सरस आणि अर्थपूर्ण भावगीतांची देणगी मराठीला देऊन मराठी काव्य संपन्न करणारे कवी राजा नीळकंठ बढे यांचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरात झाले. पंजाब विद्यापिठातून मॅट्रीक झाल्यानंतर काही काळाने त्यांनी दै. सकाळ मध्ये उमेदवारी केली. पुन्हा नागपूरला  जाऊन दै. महाराष्ट्र मध्ये सहसंपादक म्हणून काम केले. तसेच बागेश्वरी मासिक व साप्ताहिक सावधान मध्ये संपादकीय कामकाज पाहिले. नंतर 1956 ते 1962 या काळात मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत निर्माता म्हणून काम केले.

राजा बढे यांची ग्रंथ संपदा:

अशी आहे गंमत, मंदिका, मखमल, माझिया माहेरा जा, योजनगंधा, रसलीना, लावण्यलळीत, वर्खाचा विडा, शृंगार श्रीरंग इ.

बढे यांची काही लोकप्रिय गीते :

चांदणे शिंपित जाशी, जय जय महाराष्ट्र माझा, घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला, माझिया माहेरा जा, सृजनहो परिसा रामकथा, हसतेस अशी का मनी, कळीदार कपूरी पान, तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग, त्या चित्तचोरट्याला का आपले म्हणू मी, मी जाया धर्ममया, हसले मनी चांदणे इ.

त्यांच्या लोकप्रियतेमुळेच मुंबई येथील एका चौकाला व महाल पेठ, नागपूर येथील एका चौकाला कवी राजा बढे चौक असे नाव देण्यात आले आहे.

रसिकांच्या मनावर आरूढ झालेले  राजा 07/04/1977 ला स्वर्गवासी झाले.

☆☆☆☆☆

डाॅ. सदाशिव शिवदे : 

डाॅ. सदाशिव सखाराम शिवदे हे व्यवसायाने पशूवैद्यक असले तरी इतिहासाच्या आवडीमुळे लेखनाकडे वळले. मराठी व इतिहास हे विषय घेऊन त्यांनी एम्. ए. केले. एकीकडे व्यवसाय व दुसरीकडे लेखन चालूच होते. त्यांनी इतिहास विषयक सुमारे सव्वीस पुस्तके लिहिली आहेत. त्यातील ज्वलज्वलनतेजस संभाजी राजा या पुस्तकास न. चि. केळकर ग्रंथालयाचा साहित्य साधना पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी सेनापती धनाजी जाधव, हंबीरराव मोहिते, कान्होजी आंग्रे, सईबाई, मोरोपंत पिंगळे इत्यादींची चरित्रे लिहीली आहेत. याशिवाय परमानंदकाव्यम् ‘ महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग 1 व 2 , मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था(अनुवादित), माझी गुरे, माझी माणसे  अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांना स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

07/04/2018 रोजी त्यांचे निधन झाले.

कवीराज राजा बढे आणि इतिहासप्रेमी डाॅ. शिवदे यांच्या स्मृतीस अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments