सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
शंकरराव रामचंद्र खरात
शंकरराव रामचंद्र खरात(11 जुलै 1921 -,9 एप्रिल 2001) हे मराठी लेखक व इतिहासकार होते.
खरात हे आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते.
‘मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे,’असं ते म्हणत.
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांत ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र, ‘बारा बलुतेदार’, ‘मसालेदार गेस्ट हाऊस’, ‘आज इथे तर उद्या तिथे’, ‘टिटवीचा फेरा’ अशा अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह व ललितलेखसंग्रहाचा समावेश आहे.
‘शंकरराव खरातांचं कथाविश्व’ हे संदीप सांगळे यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
ते काही वर्षे ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकाचे संपादक होते.
1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ते बँक ऑफ इंडियाचे संचालक व ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन होते.
☆☆☆☆
अशोकजी परांजपे
अशोक गणेश परांजपे (मृत्यू :9 एप्रिल 2009) हे मराठी गीतकार व मुंबईमधील महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते.
ते मूळ सांगली जिल्ह्यातील हरीपूरचे.
त्यांनी भक्तीगीत, भावगीत, लावणी, गण-गवळण, नाट्यगीत या विविध प्रकारची गीते लिहिली.
इंडियन नॅशनल थिएटर रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाऊन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्या संदर्भात त्यांनी 1986 मध्ये आनंदवन येथे महाराष्ट्र आदिवासी कलामहोत्सव व 1992मध्ये पंढरपूर भक्तीसंगीत महोत्सव आयोजित केले. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली व ऑस्ट्रियातल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडीओग्राफी या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने परांजपेंना सभासदत्व दिले. त्यानंतर परांजपेंनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लँड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.
त्यांनी ‘संत कान्होपात्रा’,’बुद्ध इथे हरला आहे’ वगैरे चार नाटके लिहिली.
त्यांनी लिहिलेली ‘अवघे गर्जे पंढरपूर ‘, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘एकदाच यावे सखया ‘, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘नाविका रे ‘ वगैरे अनेक गीते लोकप्रिय झाली.
‘नाविका रे ‘या गीताला 1975 सालचा ‘बेस्ट सॉंग’ हा पुरस्कार मिळाला.
शंकरराव रामचंद्र खरात व अशोक जी परांजपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मुक्त ज्ञानकोश.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈