1 ऑक्टोबर – संपादकीय
आज नाट्यछटाकार ‘दिवाकर’ यांचा स्मृतीदिन (१जाने. १९३१) त्यांचे नाव शंकर काशीनाथ गर्गे. नाट्यछटा वङ्मय प्रकारचे ते जनक. एक प्रसंग, एकच पात्र, पण दुसर्या एका पत्राशी किंवा अनेकांशी बोलत आहे, असे नाट्यछटेचे स्वरूप असते. हा गद्य लघु वङ्मयाचा प्रकार आहे. त्यांनी ५१ नाट्यछटा लिहिल्या. त्यांच्या नंतर तुरळकपणे नाट्यछटा लिहिल्या गेल्या असल्या तरी या क्षेत्रात नंतर नाव घेण्याइतकं कुणी झालं नाही.त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९चा.
* * * * *
आज लोकप्रिय अनुवादक उमा कुलकर्णी यांचा जन्मदिन. त्यांनी कन्नडमधील श्रेष्ठ, साहित्यिकांच्या गाजलेया पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे. वस्तूत: त्यांचा पदवीचा विषय ड्रॉईंग आणि पेंटिंग असा आहे. १९८१- १९८३मध्ये त्यांनी एस.एन.डी.टी मधून आर्ट आणि पेंटिंगची एम.ए. ही पदवी घेतली.
१९८२ मध्ये त्यांचा ‘तनमानाच्या भोवर्यात’ हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला. ज्ञानपीठ परितोषिक विजेते शिवराम कारंथ यांची ही कानडीत गाजलेली कादंबरी. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांची अनुवादाची ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवराम कारंथ, भैरप्पा, गिरीश कार्नाड इ. कन्नडमधील श्रेष्ठ लेखकांच्या पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. आपल्या अनुवादाच्या अनुभवावर त्यांनी अनुवादु – संवादु हे पुस्तक लिहिले. याला साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पर्व’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, याशिवाय महाराष्ट्र फाऊंडेशनचा इ. तेरा-चौदा पुरस्कार त्यांच्या विविध पुस्तकांना मिळाले आहेत. त्यांची लेखणी अजूनही लिहिती आहे.
* * * * *
आज थोर साहित्यिक ग.दि माडगूळकर यांचा जन्मदिन (२१ सप्टेंबर). कविता, कथा, ललित लेख, पटकथा, इ. साहित्य प्रकारात लीलया त्यांची लेखणी फिरली. ते उत्तम अभिनेतेही होते. सुरुवातील ते वि. स. खांडेकरांचे लेखनिक होते. नंतर ते चित्रपट व्यवसायात शिरले. त्यांनी १५८ मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. त्यातील कथा, पटकथा, संवाद त्यांचेच होते. २५ हिन्दी चित्रपटांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. तूफान और दिया, दो ऑँखे बारह हात, नवरंग, गुंज उठी शहनाई या गाजलेल्या चित्रपटांच्या कथा त्यांच्याच होत्या.
अनेक गीतातून त्यांनी सोप्या शब्दात जगण्याचे तत्वज्ञान सांगितले. उदा. दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, उद्धवा अजब तुझे सरकार इ.
त्यांनी २००० च्या वर चित्रपट गीते लिहिली. त्यांनी ४० पुस्तके लिहिली. त्यापैकी चैत्रबन (चित्रपट गीते), जोगिया ( कविता संग्रह) आणि मंतरलेले दिवस ( आत्मवृत्त ) यांना महाराष्ट्र सरकारची पारितोषिके मिळाली होती.
त्यांचे गीतरामायण खूप गाजले. त्याचप्रमाणे त्यांनी गीत गोपाल ही श्रीकृष्णाच्या चरित्रावरील आणि गंगाकाठ ही पेशवाईवरची संगीतिका लिहिली.
१९७३ साली यवतमाळ इथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला होता.
आज वाचा सबकुछ ग.दी.मा.
प्रस्तुती उज्ज्वला केळकर
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈