5 ऑक्टोबर – संपादकीय
५ ऑक्टोबर : प्रसिद्ध लेखक आणि संपादक श्री. यदुनाथ थत्ते यांचा जन्मदिन……
लोकप्रिय समाजवादी नेते, “ चले जाव “ चळवळीत तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी, आणि राष्ट्रसेवादलासाठी मोठेच योगदान ज्यांनी दिले, असे श्री. यदुनाथ थत्ते हे एक प्रसिद्ध लेखकही होते. त्यांनी लिहिलेली — डॉ. होमी भाभा, नील्स बोहर, सी. व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस, यांची चरित्रे खूप प्रसिद्ध झाली. याव्यतिरिक्त, साने गुरुजी, यशाची वाटचाल, आटपाट नगर होते, आपला वारसा, चिरंतन प्रकाश देणारी ज्योत – म. गांधी, समर्थ व्हा – संपन्न व्हा, विनोबा भावे, अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्वेट मार्डेन यांच्या “ पुशिंग टू दि फ्रंट “ या पुस्तकावर त्यांनी लिहिलेली “ पुढे व्हा “ ही तीन भागातली पुस्तकमालाही प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे श्री. थत्ते यांनी पत्रकारिता आणि संपादन या क्षेत्रांमध्येही मोठे काम केले होते. “ साधना “ या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. श्री यदुनाथ थत्ते यांना भावपूर्ण आदरांजली.
५ ऑक्टोबर : प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अनुराधा पोतदार यांचा स्मृतीदिन …..
(१५/१२/१९२७ – ०५/१०/२०१३)
‘आवर्त’, ‘कॅक्टस’, ‘मंझधार’ इ. काव्यसंग्रह लिहिलेल्या कवयित्री श्रीमती अनुराधा पोतदार यांनी, कुसुमावती देशपांडे , संजीवनी मराठे ,बालकवी, वि. म. कुलकर्णी यांचे कविता- संग्रह संपादित केले आहेत. तुकाराम- काथात्म साहित्य, तसेच ,” दत्तकवी आणि जीवन चरित्र “ ही पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी एकूण सहा पुस्तकांचे संपादन केले आहे. साहित्याचा वारसा त्यांना परंपरेनेच लाभला होता . कवी दत्त हे त्यांचे आजोबा, तर प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे हे त्यांचे वडील. भाषेवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. व्यवसायाने प्राध्यापक असणाऱ्या अनुराधा पोतदार यांना अनंत काणेकर, कुसुमाग्रज, शि. म. परांजपे यांच्या नावाने दिले जाणारे तसेच अन्यही काही पुरस्कार लाभले होते . अनुराधा पोतदार यांना त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी मनःपूर्वक श्रद्धांजली .
सौ मंजुषा सुनीत मुळे
(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈