7 ऑक्टोबर – संपादकीय
आजपासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आज ७ ऑक्टोबर—- ख्यातनाम कवी केशवसुत ( कृष्णाजी केशव दामले ) यांचा जन्मदिन.
(७/१०/१८६६ – ७/११/१९०५)
मराठीतली ‘ संतकाव्य ‘ आणि ‘ पंतकाव्य ‘ ही बऱ्याच वर्षांपासून रूढ झालेली परंपरा मोडून, अन्य अनेक विषयांवर वेगळ्या धाटणीची कविता करणारे “ आद्य मराठी कवी “ म्हणजे केशवसुत असे म्हटले जाते. वर्ड्सवर्थ, शेली , किट्स , अशा परदेशी कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता, आणि त्यामुळे त्यांनी मराठीत कवितेचा एक नवा दृष्टिकोन रुजवला. १९ व्या शतकाची जन -मानसिकता त्यांनी त्यांच्या कवितेतून सादर केली असे म्हटले तर वावगे होणार नाही, कारण त्यांच्या अनेक कविता स्वतंत्रता, समानता, आणि क्रांती, या संकल्पनांभोवती गुंफलेल्या दिसतात. याबरोबरच त्यांच्या निसर्गकविता, प्रेमकविता, आणि विशेष म्हणाव्यात अशा ‘झपुर्झा‘ , ‘म्हातारी ‘, यासारख्या गूढ कविताही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. “ तुतारी “ ही त्यांची कविता तर इतकी जास्त लोकप्रिय झाली की, त्या कवितेची शंभरी साजरी करतांना , म्हणजे २०१७ साली, दादर-सावंतवाडी एक्सप्रेसला “ तुतारी एक्सप्रेस “ हे नाव देण्यात आले. विद्यार्थीदशेत असतांनाच केशवसुतांनी एक नाटक आणि एक कादंबरीही लिहिली होती हे फारसे कुणाला कळलेही नव्हते. अशा “ आधुनिक मराठी काव्याचे जनक “ म्हणूनच नावाजल्या गेलेल्या कवी केशवसुत यांना भावपूर्ण आदरांजली.
——————–
७ ऑक्टोबर —- कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव म्हणजे वि.म. कुलकर्णी यांचा जन्मदिन.
(७/१०/१९१७ – १३/०५/२०१०)
‘नाटककार खाडिलकर ‘ यांच्यावर प्रबंध लिहून वि. म. कुलकर्णी यांनी पीएच.डी. मिळवली आणि दीर्घकाळ ‘ मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ‘ म्हणून त्यांनी काम केले. त्याजोडीनेच त्यांनी काव्यलेखन, ग्रंथसंपादन, बालकविता, अनुवाद, कथा, असे विविध प्रकारचे लेखन केले. ‘ अंगतपंगत ‘, ‘ चंद्राची गाडी ’, ‘ छान छान – गाणी ‘, यासारखे कितीतरी बालकवितासंग्रह, ‘ कमळवेल ‘, ‘ पहाटवारा ‘, प्रसाद रामायण ‘, अशासारखे काव्यसंग्रह, ‘ न्याहारी ‘ हा कथासंग्रह, ‘ नौकाडुबी ‘ ही अनुवादित कादंबरी, ‘ गरिबांचे राज्य ‘ ही चित्रपटकथा, आणि ‘ झपुर्झा ‘, ‘ पेशवे बखर ‘ अशासारख्या ग्रंथांचे संपादन— असे त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या काही कवितांची गाणीही लोकप्रिय झालेली आहेत. असे चौफेर लेखन करणाऱ्या श्री. वि. म. कुलकर्णी यांना विनम्र अभिवादन.
————————
७ ऑक्टोबर– मराठी साहित्यविश्वात “ बालकवी “ म्हणून ख्यातनाम झालेले कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन.
(१८९० – १९१८)
बालकवी यांचा “ मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी “ असा यथार्थ गौरव केला जातो. १९०७ साली झालेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनात अध्यक्ष डॉ. कीर्तिकर यांनी त्यांना “बालकवी“ ही उपाधी दिली. त्यांची काव्य-क्षेत्रातली मुशाफिरी फक्त १० वर्षांची होती. त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती होता, पण रूढार्थाने निसर्गवर्णन करणे हा त्यांचा हेतू नव्हता. तर निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार असायचे, असे जाणकार म्हणतात. त्यांच्या कवितांमध्ये जसा आनंद व्यक्त व्हायचा, तशीच काही कवितांमध्ये उदासीनताही व्यक्त झालेली दिसते. “ औदुंबर “, “फुलराणी“, “श्रावणमास “, “ आनंदी आनंद गडे “, अशासारख्या त्यांच्या कविता माहिती नसलेला काव्यरसिक सापडणार नाही. त्यांच्या कवितांचे संग्रहही प्रसिद्ध आहेत, आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. असे विशेषत्वाने म्हटले जाते की, नंतरचे ख्यातनाम कवी मर्ढेकर, ग्रेस, महानोर अशा भिन्न प्रकृतीच्या कवीच्या जडणघडणीवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. श्रावण महिन्याची चाहूल लागताच ज्यांच्या “श्रावणमासी हर्ष मानसी“ या कवितेची हटकून आठवण आल्याशिवाय राहत नाही, अशा कविश्रेष्ठ बालकवी यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
——————–
७ ऑक्टोबर — प्रसिद्ध मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक श्री प्रभाकर पेंढारकर यांचा स्मृतीदिन.
(१९३२ – ७/१०/२०१०)
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र असणारे श्री प्रभाकर पेंढारकर नेहेमीच प्रसिद्धीपासून लांब राहिले. “ प्रतीक्षा “, “ आणि चिनार लाल झाला “, “ चक्रीवादळ “ या त्यांच्या कादंबऱ्या अतिशय गाजल्या. भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे अतिशय अवघड काम करणाऱ्या सैन्याच्या ‘ बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन ‘ वर डॉक्युमेंटरी बनवतांना त्यांना “ रारंगढांग “ या कादंबरीची कल्पना सुचली, आणि एखादा सुंदर सिनेमाच पाहत आहोत असं वाटायला लावणारी ही कादंबरी वाचकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. “ एका स्टुडिओचे आत्मवृत्त “ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता. फिल्म्स डिव्हिजन मधली त्यांची यशस्वी कारकीर्दही खूप गाजली होती. उत्कृष्ट लघुपट- निर्मितीसाठी त्यांनी आयुष्यातली बरीच वर्षे काम केले, अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जीवनपट उलगडणारा “ प्रभाकर पेंढारकर — एक परीसस्पर्श “ हा लघुपट तयार केला गेला आहे. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈