? इंद्रधनुष्य ?

चंबा रुमाल – चंबा, हिमाचल प्रदेश – लेखिका – सुश्री स्वप्ना कुलकर्णी☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

चंबा रुमालाबद्दल माहिती मिळवताना एक सुरेख वर्णन वाचलं, Paintings In Embroidery– हातांनी भरलेले चंबा रुमाल इतके अप्रतिम रंगसंगतीचे आणि नाजूक कलाकुसरीचे असतात की ते कापडावरील रंगवलेलं एखादं चित्रच वाटावं.

सतराव्या शतकातील चंबा राजघराण्यातील राण्या आणि मानाच्या स्त्रिया रेशमी किंवा मलमली कापडावर वैशिष्टय़पूर्ण भरतकाम करत असत. हे मऊसूत कापडाचे रुमाल हात, नाक किंवा तोंड पुसायला नसून राजघराण्याकडून दिल्या जाणार्‍या नजराण्यावर झाकायला, लग्नाला उभ्या असलेल्या मुलीला कलाकुसर जमते हे समजायला (आपल्याकडील रुखवत), किंवा दुसर्‍या राजघराण्याला भेट देताना अशा अगदी खास प्रसंगीच उपयोगात येत असत. सामान्य लोकांपर्यंत ही कला तेव्हा पोहोचली नव्हती.

रेशमी किंवा अत्यंत तलम कापडावर आधी चित्राची काळ्या रंगात आकृती काढायची आणि मग विशिष्ट टाके(Double Satin Stich) वापरून दोन्ही बाजूंना भरायचे. या रुमालांवर कृष्णलीला, पौराणिक, याशिवाय रोजच्या जीवनातील प्रसंग, तसेच निसर्गसौंदर्य भरलेले असत. लाल, निळा, हिरवा, पिवळा, जांभळा, केशरी आणि गडद गुलाबी मुख्य रंग. यातील कृष्ण कायम निळा !!

बौद्ध धर्मातील जातक कथांमध्ये (इसवीसन पूर्व चौथे शतक) या रुमालांचा उल्लेख आहे. पठाणकोट आणि चंबा येथे या पद्धतीचे भरतकाम करत असत असा त्याचा सरधोपट अर्थ. राजा उमेद सिंगने (1748-1768) या भरतकामाला खूप प्रोत्साहन दिले. पुढे राजा भुरी सिंग (1911) यांनी नाजूक भरतकाम केलेले कापड ब्रिटिशांना भेट दिले आणि तेव्हापासून ते ‘ चंबा रुमाल ‘ म्हणून प्रसिद्ध झाले. 

पुढे राजघराणी कमी झाली आणि ही कला हळूहळू सामान्य लोकांपर्यंत पोचली. मध्यंतरी लुप्त होऊ घातलेले हे विशिष्ट भरतकाम आता हिमाचली किंवा पहाडी शाली, स्टोल, जाकिट आणि टोप्यांवर दिसू लागले आहे.

गुरदासपुर येथील गुरुद्वारात एक सुंदर, तलम व रेशमी रुमाल जतन करण्यात आला आहे. हा रुमाल पंधराव्या शतकातील असून बीबी नानकी यांनी आपल्या भावाला, सिख गुरु नानक देव यांना स्वतः भरलेला हा रुमाल लग्नात भेट दिलेला आहे.

कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग भरलेला एक रुमाल, द व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम येथे पहावयास मिळतो.

(आपल्या राष्ट्रातील तिथे असलेल्या अशा ढिगभर वस्तू आपण परत मागितल्या तर ते म्युझियम ओस पडेल)

लेखिका — सुश्री स्वप्ना कुलकर्णी 

संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments