image_print

डॉ. रवींद्र वेदपाठक

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी का मराठी के सुप्रसिद्ध साहित्यकार  स्व कृष्ण गंगाधर दीक्षित जो कि कवी संजीव उपनाम से  प्रसिद्ध हैं  के  व्यक्तित्व एवं कृतित्व पर सारगर्भित मराठी आलेख  कवी‌ संजीव यांची जयंती…..त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा……..। आदरणीय कवी संजीव जी का जन्म 12 अप्रैल को सोलापुर के वांगी गांव में हुआ था। मराठी साहित्य के इस महत्वपूर्ण दस्तावेज की लम्बाई को देखते हुए इसे दो भागों में प्रकाशित करने का निर्णय लिया है। आज प्रस्तुत है इस आलेख का प्रथम भाग। कृपया इसे गम्भीरतापूर्वक पढ़ें एवं आत्मसात करें। )

☆  कवी‌ संजीव यांची जयंती….. त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा…….. 

मराठी साहित्यातील काव्य क्षेत्रात अनेकांनी आपला ठसा उमटवला आहे. आद्य कवी केशवसुतांपासून ते अगदी आजपर्यंत अनेकांनी आपल्या दर्जेदार काव्याची निर्मिती करून वाचकांना जणू भुरळच घातली आहे. या काव्य क्षेत्रात आपल्या लीलया लेखणीने मुशाफिरी करून कवितेबरोबरच *लावणी, अभंग, शायरी इ. प्रकार निर्माण करून काव्यगगनात ध्रुवता-याप्रमाणे अढळ झालेले थोर गीतकार म्हणजे संजीव!*

*कृष्ण गंगाधर दीक्षित* यांचा जन्म दि. १२ एप्रिल १९१४ रोजी दक्षिण सोलापुरातील वांगी या गावात झाला. बालपणीचं त्यांचे पितृछत्र हरपल्यामुळे ते त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे *प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा क्र. १ येथे १९२१ ते १९२५ या काळात झाले.* पुढे मॅट्रिक झाल्यावर, मुंबई येथील पूर्वीचे बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे आताचे सर जे. जे. कलामहाविद्यालय, येथे कलाशिक्षणाकरिता त्यांनी प्रवेश घेतला.

१९३९ साली त्यांनी *जी. डी. आर्ट* ही पदवी संपादन केली. ते व्यवसायाने *छायाचित्रकार व मूर्तिकार होते.* त्यांची अनेक तैलचित्रे, व्यक्तिचित्रे, पुतळे प्रसिद्ध आहेत. सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांनी साकारलेले पुतळे बसवले आहेत. काही काळ त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत *कला शिक्षक* म्हणून नोकरी केली. पूर्वीच्या काळी *छायाचित्रकाराचा* व्यवसाय म्हणजे एकेकाळी रोजचेच हातावर पोट असे; पण संजीव काव्याच्या नादात असत.

*कै. तात्यासाहेब श्रोत्रीय* हे त्यांचे काव्य क्षेत्रातील गुरू. त्यांनी संजीवना काव्यशास्त्राचे पाठ दिले व वृत्तछंदाची गोडी निर्माण केली. संजीवांनी *प्रथम गणेशोत्सवातील मेळयासाठी गाणी लिहिली. तसेच गद्य-पद्य संवादही लिहिले.*

*॥ माझा राजबन्सी राणा॥*

*॥ कोणी धुंडून पहाना॥*

१९३० साली लिहिलेले त्यांचे हे पहिले गीत. त्या काळातील *सुप्रसिद्ध गायिका मेहबूबजान* यांनी या गीताला स्वरसाज चढवून हे गीत लोकप्रिय केले. या गीतच्या अनेक *ध्वनिमुद्रिका* निघून त्या घरोघरी पोहोचल्या.

त्यानंतर

*१९३५ साली ‘दिलरुबा’* हा त्यांचा *पहिला काव्यसंग्रह* त्यांनी स्वत:च प्रकाशित केला.

या काव्यसंग्रहाला *औंध संस्थानचे राजे भगवानराव पंतप्रतिनिधी यांची प्रस्तावना आहे.*

या काव्यसंग्रहात एकंदर *४४ कविता* आहेत. कवी संजीव शारदेला अभिवादन करताना म्हणतात,

*विश्वमोहिनी ! हंसवाहने!*

*सुकाव्य संजीवने ! शारदे ॥*

*संजीवाची असोत तुजला ! अनंत अभिवादने॥*

याचप्रमाणे त्यांचे *प्रियंवदा (१९६२), माणूस (१९७५), अत्तराचा फाया (१९७९), गझल गुलाब (१९८०), रंगबहार (१९८३), आघात (१९८६) देवाचिये द्वारी (१९८६) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.*

त्यांच्या *‘दिलरुबा’ या काव्यसंग्रहातील ‘गोफणीवाली’* ही सुंदर कविता –

*॥ ही नार सुंदर सदा हासरी लाजरी नजर॥*

*॥ होईल पाहता हिला कुणाची नजर॥*

कवितेतील गोफणीवाली ही *निर्दोष आणि आनंदायक* आहे. यातील *शब्द आणि कल्पना* यांचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे या कवितेवरून गोफणीवालीचे चित्र कोणत्याही चित्रकाराला सहज काढता येईल.

*१९३५ साली आलेल्या दिलरुबा* नंतर दुसरा कविता संग्रह रसिकांच्या हातात येण्यासाठी जवळ जवळ *२५-२६ वर्षे वाट पहावी लागली* व रसिकांना मिळाला *प्रियवंदा* हा संग्रह…. संजीवांची अप्रतिम विचारशक्ती व कल्पनाशक्ती या संग्रहात अवतरली आहे….

जाता जाता कवी सांगुन जातात

*हसण्यापेक्षा कधी कधी*

*रडणे मला प्यारे आहे*

*वसंताहुन ठिबकणारी*

*आषाढाला धार आहे…..*

वसंताचा निसर्ग, आषाढाचा पाऊस  या दोन्हीतील सुक्ष्म फरक कवीने खुप रितीने मांडला आहे….

त्याच जोडीला *प्रियवंदा मध्ये शृंगाराचे वर्णन* करताना संजीव सांगतात…

*वितळू ये चल आपण दोघे, पार्थिवतेचे होवो पाणी*

*या पाण्याला अलग कराया, जगात नाही समर्थ कोणी…….*

अशा प्रकारच्या रचना हा कवी *संजीवांचा प्रांत..* या कविता लिहीताना कवी संजीव एक वेगळेच व्यक्तीमत्त्व होवुन जातात

त्यांच्या ‘प्रियंवदा’ या काव्यसंग्रहात एकूण *१६५ कविता आहेत.*

*”माणुस १९७५ साली प्रकाशित केला…..”* त्याला अभिप्राय  आहे थोर विचारवंत *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,* तर *”माणुस ला प्रस्तावना दिली ती कवी संजीवांचे मित्र मा. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे”*  यांनी.

*१९७५ साली यामध्ये सुशिलकुमार शिंदे* लिहीतात कवी संजीव यांच्या कवितांचा मी शालेय जीवनापासुनच चाहता आहे, आणि त्यानंतर त्यांच्या सहवासात घालवलेल्या काही चागल्या क्षणांचा माझ्यावर परिणाम झाला आहे…. या *”माणुस संग्रहात”* कवी संजीवांनी मानवी जीवनाच्या लक्षवेधी जीवनाची विविध मनोहारी रुपे व त्यांच्या *आत्म्याच्या आक्रंदनाचे प्रखर अविष्कार*  मांडले आहेत. जो एक प्रकारचा चटका लावुन जातो…..

यामध्ये *ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी* बद्दल ते लिहीतात….

*’ की हा जो जयजयकार होतो आहे, तो  माझ्याहुन महान कविचा आहे…. पण त्याची आणी माझी जात एकच आहे….” कवीची.*

गणेशाला कवी संजीव लिहीतात….

*व्यासांचा तु लेखणिक झालास*

*मला तुला कारकुनु करायचे नाही*

*तु देव आहेस देवच रहा*

*आशिर्वाद देशील न देशील*

*किमान आमचे कौतुक तरी पहा….,*

तर *माया या मुक्तछंद कवितेत* थोडक्यात ते घराचे घरपण सांगुन जातात…

*अंगठा तुटतो चांभार म्हणतो*

*माया कमी आहे, शिवता येत नाही खिळाच ठोकतो*

*शिंपी म्हणतो, झंपरला कापड कमी पडते*

*कापडात माया कमी पडते, याचं सुरकचं शिवतो*

*लाकडात माया कमी पडते,*

*सुतार म्हणतो आकार लहान करतो*

*दगडात माया कमी पडते*

*तेव्हा गवंडी चुना सिमेंट भरतो*

*आणी अशी ही माया आतड्याची कातड्याची कमी पडते*

*तेव्हा घराचा चिरा चिरा निखळतो.*

*जानेवारी १९७९ साली तमाशा कला कलावंत विकास मंदिर मुंबई* या संस्थेने तमाशा कलावंतांसाठी नवे साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना *वग, लावण्या, गणगौळण, फार्स इ.* साठी साहित्य मिळावे या हेतूने काव्य लेखन स्पर्धा घेतली होती, त्या स्पर्धेतुन जास्त साहित्य मिळाले नाही परंतू  त्यातून *कवी संजीव यांनी तमाशा कलावंतांसाठी लेखन करायचे ठरवले आणी त्यातुन जन्म झाला अत्तराचा फाया या लावणी संग्रहाचा.*

जवळ जवळ *४५ लावण्यांचा हा अप्रतिम दर्जेदार लावणी संग्रह,* राम जोशी यांच्या सोलापुरातच लावणीने पुन्हा मुळ धरले…..

*अत्तराचा फाया* या संग्रहात..

*हिरव्या मिरचीला पांढरी लसणी गं*

*मी कुटायला बसले चटणी……!!*

*लवंगी मिरची घाटावरची*

*पहिली तोड ही आहे वरची*

*आहे तिखट नाही मी अळणी*

*हिरव्या मिरचीला पांढरी लसणी गं*

*मी कुटायला बसले चटणी…..!!*

*ठेचुन ठेचुन ठेचा केला*

*कुटून कुटून मऊ किती झाला*

*असा आणावा लागतो वटणी…..!!*

अशा लावण्यांनी तमाशा कलावंतांसाठी व तमाशा रसिकांसाठी साहित्याचे दालन उघडे केले..

संजीवांनी लिहिलेल्या विपुल *लावण्यात रसाळ ढंग, मार्मिक आणि नेमकी अचूक शब्दरचना, कुशल अशी वजनदार लेखणी, काव्याला आवश्यक असणारे ओजमाधुर्य, प्रासादिक रचना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभावी रसाविष्कार आणि गेय शब्दांची सुयोग्य गुंफण* हे गुण त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने आढळतात.

१९८० साली आलेला काव्यसंग्रह *गझलगुलाब,*

याच गझल गुलाब मधील एक शेर आपण सर्वजण पहात आहात…

*यात्रा तुझी नी माझी आनंद वर्धनाची*

*गोवर्धना धराया किमया करांगुलीची*

या गझल गुलाब मध्ये  *गुलाबी गझल* येणे हो ओघानेच येते…. यात कवी संजीव लिहीतात……

*आज सखी न्हाऊन आली उजळण्याची उजळणी*

*रम्य ऋतू रत्नांकितेची आजा आली पर्वणी*

*अलक पुलकी गंधविणा    स्वैरली वीणावती*

*साज विसकटला तरी ही    मुक्त कच ती वारूणी*

*वारुळातुन नाग आले स्वर्ण चंपक अंगणी*

*गंध दंशित अष्टअंगी भारली सौदामिनी*

*स्पर्श गंधे वायू पेटे  परिसरला मंत्रुनी*

*आणि या आमंत्रणाला संपलो स्विकारुनी….*

आणी त्याच *गुलाबी गझल बरोबर, माऊली, तांडव, शोध* अशा वेगळ्या गझलही वाचायला मिळतात,

*कृष्णार्पण या गझल* मध्ये कवी संजीवांचे शब्द थेट मनाला भिडतात…

*भोगलेले सोसलेले  सर्व तुजला अर्पिले*

*म्हणुनी कृष्णार्पण स्वहस्ते  उदक आता सोडीले*

*ना धरेची ना नभाची     क्षितीज रेषा राहीले*

*घेवुनी रेषाच साऱ्या     आकृती मी जाहले*

*आकृतीला प्रकृतीचे     सर्व काही लाभले*

*भोगलेले…….*

*कधी फुलावे कधी गळावे   पुष्पिता मी वंचीता*

*मी व्रतस्था म्हणुनी कोणा    फुल नाही वाहीले*

*उधळिलेल्या अक्षतांना      शुभ सुमंगल गायीले*

*भोगलेले…….*

*अक्षतेची अक्षता मी    तशीच तबकी राहीले*

*त्या रित्या तबकांत आता  काय शिल्लक राहीले *

*राहीले मी फक्त शिल्लक  आणी प्रभुची पाऊले….*

 

त्यांच्या कविता या *उच्च दर्जाच्या* आहेत. त्यांच्या कवितेत *ईश्वरविषयक, सामाजिक भान, जीवनाविषयक चिंतन प्रकट करणारे गुण आढळतात.*

तसेच त्यांनी

*स्त्री जीवनातील बारकाव्याचे सूक्ष्म निरीक्षण होते.* स्त्री जन्माची चित्रविचित्र कहाणी ही तिच्यातील संमिश्र भावभावनांनी भरलेली एक अमर कहाणीच आहे.

*॥ धार दुधाची डोळयात एका॥*

*॥ डोळयात एका पाणी॥*

या त्यांच्या शब्दातून जणू जगन्माताच बोलते आहे, असे वाटते.

……. क्रमशः भाग 2 —–

 

© ® डॉ. रवींद्र वेदपाठक

कवी, लेखक, प्रकाशक

सूर्यगंध प्रकाशन, पुणे

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments