सौ. गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ सगळीकडे फक्त आणि फक्त ‘टाटा‘ ? – श्री चारुचंद्र उपासनी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, कुणी एक अमेरिकन इंजिनिअर, त्याच्या तेथील उद्योगाशी निगडित असलेल्या मुंबईतील उद्योगाच्या कामासाठी जेमतेम एका दिवसासाठी मुंबईत येणार होता. त्या निमित्तानं त्याचं भारतात प्रथमच येणं होणार होतं. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला आशियातील गरीब देश आहे, या व्यतिरिक्त त्याला भारताची फारशी माहिती नव्हती.
या एकदिवसीय वास्तव्यात भारताविषयी प्रत्यक्ष जी माहिती मिळेल ती घ्यावी या उद्देशानं त्यानं, भारतीय विमान कंपनीनं, Air India नं भारतात येण्याचं ठरवलं. एका गरीब देशाची ही विमान सेवा त्याला अपेक्षेपेक्षा उत्तम वाटली. Air India विषयी थोडी चौकशी केली असता त्याला कळलं की कुणी ‘ टाटा ‘ नावाच्या उद्योजकानं – ही कंपनी स्थापन करून ती नावारूपाला आणली. त्याला मोठं कौतुक वाटलं, त्यानं ठरवलं की त्याला आता पुढे भारतात ज्या ज्या उत्तम गोष्टी आढळतील त्या त्या गोष्टींसंबंधी असलेल्या श्रेष्ठ भारतीयांची नावं लक्षात ठेवायची. ‘ टाटा ‘ हे नाव प्रथमच समोर आल्यामुळे ते त्याच्या मनात पक्क ठसलं होतं.
ऐन रात्री तो जेव्हा मुंबई विमानतळावर उतरला तेव्हा त्याच्या नावाचा फलक मोठ्या तत्परतेनं हातात घेऊन एक सेवक गणवेशात बाहेर उभा होता, त्या सेवकानं मोठ्या नम्रतेनं त्या इंजिनिरचं स्वागत केलं. हॉटेल मध्ये नेण्यासाठी आणलेल्या कारकडे पहाताच गाडीवरील ‘ टाटा मोटर्स ‘ ह्या नावानं तो अचंबित झाला. तो मनात म्हणाला,
‘अच्छा, अच्छा हा टाटा गाड्या पण बनवतो वाटतं ‘ एकच माणूस विमान आणि गाड्या अश्या दोन्ही उद्योगांत आहे ह्या योगायोगाचं त्याला आश्चर्य वाटलं. आता त्याला भारतातील इतर उद्योग आणि उद्योगपति यांच्या विषयी उत्सुकता वाटत होती. बोलता बोलता त्याचं नियोजित हॉटेल आलं. ते भव्यसुंदर हॉटेल समोर असलेल्या समुद्राच्या सान्निध्यात अधिकच सुंदर दिसत होतं, त्यावर केलेली मोजकी रोषणाई रात्री डोळ्यांना सुखवीत होती, वास्तुशिल्पाच्या सौंदर्यानं विनटलेल्या त्या हॉटेलनं त्याचं चित्त चांगलच आकर्षून घेतलं. आत शिरल्यावर तेथील टोकाची स्वच्छता टापटीप शिस्त अन् अगत्य पाहून तो भारावून गेला. त्यानं कुतूहलमिश्रित आश्वर्यानं विचारलं, ‘ कुणाचं हॉटेल आहे हे? ‘
‘टाटांचं, टाटा समूहाचं ताज हॉटेल आहे हे ‘ या उत्तरानं त्याला वाटणारं आश्चर्य आणखीनच वाढलं.
ताजातवाना होण्यासाठी तो तेथील न्हाणीघरात गेला, तिथल्या अत्यंत स्वच्छ वातावरणात त्याचं लक्ष समोरच्या पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत टॉवेलनं वेधून घेतलं. अंग पुसण्यासाठी त्यानं तो सुंदर टॉवेल हातात घेतला अन् आश्चर्याचा आणखी एक सुखद आघात त्याच्यावर झाला, त्या टॉवेलवर मुद्रा होती ‘ टाटा टेक्स्टाईल ‘ ची. मनातल्या मनात तो म्हणाला ‘आश्चर्यच आहे या टाटाचं ! या एवढ्याश्या वेळात अप्रत्यक्षपणे किती वेळा सामोरा येतो आहे हा ‘ टाटा ‘.
तेवढ्यात एका चिनी भांडयांच्या संचात चहा आला, त्या चहाच्या घमघमाटानं तो प्रसन्न झाला, त्या चिनी मातीच्या छानश्या कपबश्या, किटली त्यानं निरखल्या, त्यावर लिहिलेलं ‘ टाटा सिरॅमिक्स ‘ हे उत्पादकाचं नाव वाचल्यावर मात्र त्यानं आश्चर्य वाटून घ्यायचं नाही असं ठरवलं. आता एखादं दुसरं नाव वाचायला ऐकायला मिळालं तर त्याला आश्चर्य वाटणार होतं. चहाचा स्वाद त्याला इतका आवडला की, तसा चहा बरोबर घेऊन जावा म्हणून त्यानं त्या चहाची चौकशी केली आणि त्याला आता अपेक्षितच उत्तर मिळालं कारण तो होता ‘ टाटा टी ‘
रात्रीची उशिराची वेळ होती, तो आता लगेच झोपणार होता. तेथील सर्व सेवक आणि सेविका यांची हसतमुख आणि नम्र वागणूक त्याला आवडली होती. त्यांच्यापैकी संबंधित व्यक्तींचे आभार मानून तो झोपायला निघाला. स्वागतकक्षात ओळख झालेली मुलगी समोर होती. तिनं त्याला शुभेच्छा दिल्या पण तिच्याकडे पहाताच त्याच्या लक्षात आलं की त्या सर्व हसतमुख सेवकांमध्ये ती एकटीच काहीशी उदास दिसत होती. झोपण्यापूर्वी क्षणभरासाठी त्यानं टी व्ही लावला, तिथे त्याला एक जाहिरात पहायला मिळाली, ती होती टाटा सॉल्ट्ची.
सकाळी वेळेवर तो मुंबईतील त्याच्या अमेरिकेतील सहयोगी कंपनीत पोहोचला. तिथे त्यांना अडचणीत आणणाऱ्या काही यांत्रिक अन् अभियांत्रिक समस्यांवर चर्चा होणार होती. त्यासाठी एका तरुण शास्त्रज्ञालाही बोलवण्यात आलं होतं. चर्चा खूप उत्साहजनक आणि प्रश्न मार्गी लागतील अशा दिशेनं झाली, आणि अपेक्षेपेक्षा ते बरेच लवकर निष्कर्षापर्यन्त पोहोचले. त्या शास्त्रज्ञाशी त्याची तेवढ्या वेळातच छान गट्टी जमली आणि त्याच्या विनंतीवरून तो अमेरिकन इंजिनिअर त्याच्या बरोबर एक फेरफटका मारायला निघाला. तो म्हणाला, ‘ मी ज्या जागतिक कीर्तिच्या संस्थेत उपयोजित भौतिक शास्त्र आणि उपयोजित गणितशास्त्र यांचा अभ्यास केला तिला आपण प्रथम धावती भेट देऊ. ‘.. तिथे पोहोचताच त्याला संस्थेचं नाव दिसलं, ‘ टाटा इन्स्टिट्यूट् ऑफ् फंडामेंटल् रीसर्च् ‘ बाहेर पडताच त्या शास्त्रज्ञानं त्याला सांगितलं की इथे मानवशास्त्रांच्या अभ्यासाला वाहिलेली ‘ टाटा इन्स्टिट्यूट् ऑफ् सोशल् सायन्सेस् ‘ ही पण एक संस्था आहे. त्या फोर्ट् भागातून फिरतांना मध्येच एका भव्य वास्तुकडे बोट दाखवीत तो शास्त्रज्ञ म्हणाला, ‘ ह्या भागातील जागांचे भाव तुमच्या न्यूयॉर्कपेक्षाही अधिक आहेत तरी एका दानशूर घराण्याच्या उदारतेमुळे नाट्य, संगीत आदि क्षेत्रातल्या नवोदित व्यक्तींना आपली कला विनासायास सादर करता यावी म्हणून हे ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् ‘ इथे उघडलं आहे.
‘हे दानशूर घराणं टाटांचं ना? ‘ त्या अमेरिकेन इंजिनिअरनं विचारलं,
‘तुम्हाला कसं माहिती? ‘ त्या शास्त्रज्ञानं चकित होऊन विचारलं. ‘ हा माझा तर्क आहे ‘ अमेरिकेन म्हणाला.
‘तुमचा तर्क अगदी बरोबर आहे ‘ शास्त्रज्ञानं उत्तर दिलं. याच टाटा समूहानं TCS या त्यांच्या कंपनीद्वारे लाख्खो तरुणांना रोजगार दिला आहे.
फेरफटका झाला आणि तो हॉटेलमध्ये पोहोचला. जेवण करून रात्रीच्या विमानानं जाण्यासाठी तो आता हॉटेल सोडत होता. आदल्या दिवशी रात्री त्याला भेटलेल्या स्वागतकक्षातील मुलीनं त्याचा अगदी हसत निरोप घेत त्याला प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. तिचे आभार मानतांना तो म्हणाला, ‘ तुम्हाला असं प्रसन्न पाहून मला बरं वाटलं, काल फारच तणावग्रस्त दिसत होता तुम्ही ! ‘
ती म्हणाली, “ माझ्या आईच्या मानेत एक छोटी गाठ होती ती शस्त्रक्रिया करून काढली, ती कॅन्सरची आहे की नाही हे तपासण्यासाठी इथल्या ‘ टाटा कॅन्सर हॉस्पिटल ‘ मध्ये पाठवली होती. काल मी त्या चिंतेत होते, आज सकाळी तो रिपोर्ट आला, गाठ साधीच निघाली त्यामुळे मी चिंतामुक्त झाले “. यावर तिचं अभिनंदन करून तो निघाला.
मुंबईच्या आकाशात विमान झेपावलं आणि त्या लखलखत्या महानगरीकडे पहात असतांना त्याच्या मनात विचार आला, ‘ एवढा प्रचंड लोकसंख्येचा देश पण इथे एकच माणूस खरं काम करतो आहे ! ‘
ज्या टाटा समूहानं हा देश अशा उंचीवर आणून ठेवला त्या टाटा समूहाचे शेवटचे कुलतंतु रतन टाटा यांना कृतज्ञतापूर्ण आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक : चारुचंद्र उपासनी
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈