डॉ. ज्योती गोडबोले
इंद्रधनुष्य
☆ ‘गवळणींची प्रथा – –‘ भाग – १ – लेखक : श्री समीर गायकवाड ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
गवळणींची प्रथा – –
दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या ‘गवळणीं’ची प्रथा इतर अनेक प्रथांप्रमाणे हळूहळू लोप पावतेय. महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि गतकालीन ग्रामीण स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहासजमा होत आहेत. आता तर दारात गायीगुरंच नसल्याने शेणही मिळत नाही आणि नव्या पिढीची मंडळी शेणात हात घालायला तयार होत नाही. यांमुळे लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय, अर्थात काळाच्या प्रभावानुसार अशा गोष्टी घडत असतातच हेही मान्य केले पाहिजे!
दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण. गावांत शहरांत प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात. समृध्द लोकजीवनाचे दर्शन त्यातून घडतं. वेगवेगळ्या प्रांतात दिवाळी विविध पध्दतीने साजरी होते. त्यातून लोकजीवनाचं दर्शन प्रकर्षाने होते.
महाराष्ट्रात दिवाळीच्या आगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी. पूर्वी गावांमध्ये भरपूर गायीगुरं असायची. त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून धनत्रयोदशीच्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची. अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवत. बाळगोपाळांचा उत्साह त्यावेळी ओसंडून वाही. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठ्या कल्पकतेने या गवळणी बनवत. छोटे शेणगोळे बनवून आधी त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जाई. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापर करण्यात येई. कल्पनेतलं एक आटपाट नगरच या गवळणींच्या माध्यमातून उभे केलं जाई. पाच दिवस लोकजीवनातील वेगवगेळय़ा घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येत असत. पाचव्या दिवशी पांडव केले जात.
याकरिता अंगणाचा कोपरा राखून ठेवला जायचा. त्याला शेणाने सारवण्यात येई. त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखविला जायचा. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हात-पाय दाबताना दृष्टीस पडत. काही गवळणी स्वयंपाक करताना दाखविल्या जात. त्यासाठी सुंदर अशी चूलही मांडली जायची, त्यावर शेणाचेच तवे दाखवून भाकऱ्या करताना दाखवले जायचे. कुणी गवळणी दळणकांडण करताना दाखविल्या जायच्या. त्यासाठी शेणाचेच जाते केले जाई, जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य दळत असल्याचे दाखविले जाई. शेणात बरबटलेली काडीपेटीची काडी म्हणजे जात्याचा दांडा असे!
काही गवळणी विहीरीवर पाणी भरण्यासाठी निघालेल्या दाखवल्या जात. एक हात कमरेवरच्या घागरीवर आणि दुसरा हात डोक्यावरल्या घागरीवर धरलेल्या या गवळणी सुंदर दिसत. काही गवळणी डोक्यावरील पाटीत भाजी घेऊन विकायला जात तर काहीजणी घरात देवपूजा मांडत, त्यासाठी शेणाचे देवघर करून त्यात नानाविध देव दाखविले जायचे. काही गवळणी गुरं राखायला पाळीवर घेऊन गेलेल्या दाखवत. तर काही गुरांना पाणी पाजताना दाखविल्या जायच्या. अंगणात खेळणाऱ्या गवळणी असत. डोंगर चढणाऱ्या, जेवण वाढणाऱ्या, ताक घुसळणाऱ्या अशा नाना प्रकारच्या गवळणी दाखविल्या जाता. कुणी लेकुरवाळी गवळण कमेरवर बाळाला घेऊन त्याला खेळवत असल्याचे दाखविले जाई. काही जणांना शेणाच्या टोप्या केल्या जात. क्वचित एखादीच गवळण पुस्तक वाचताना दाखवली जाई, अर्थातच त्या घरात शिक्षणाचं वारं दाखल झालेलं असे!
गवळणींना सजविण्यासाठी पाना-फुलांचा वापर केला जाई. कापसाच्या फुलांच्या, पानांच्या माळा गवळणींच्या गळ्यात घालत. गवळणींचा हा सारा संसार उभा झाला की त्या एकंदर नंदराज्याच्या बाहेरील बाजूला दोन बुरूज केले जात. त्यामध्ये चिपाडाची काडी घालून वेस बनविण्यात येई. गावाच्या वेशीवर तुतारी वाजविणारा शिंगाडा दाखविण्यात येई. जणू येणाऱ्या जाणाऱ्याचे तो शिंग वाजवून स्वागतच करतोय असे वाटे. त्यासाठी काचेची अर्धी बांगडी शिंग म्हणून त्या शेणाच्या बाहुलीत खुपसली जाई. वेशीजवळच दीपपाळ केली जाई. दीपमाळेवर पणत्या ठेवल्या जात. गावाकडच्या स्त्रीजीवनातल्या साऱ्या दैनंदिन घडामोडींचं सुंदर, सुबक भावदर्शन या गवळणींमधून व्हायचं.
पाच दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारे गवळणी तयार करण्यात येतात. प्रत्येकजण आपापल्या कलाकौशल्याचं दर्शन शेणाच्या या गवळणी करताना घडवत असे. आपल्या गवळणी इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि देखण्या कशा होतील याची जणू स्पर्धांच असायची. गवळणींच्या माध्यमातून उभारलेल्या आटपाटनगरात सगळं काही शेणाचंच असे. हे आटपाटनगर जरी स्त्रिया बनवत असल्या तरी, त्यातून लोकसंस्कृतीचं आणि ग्रामजीवनाचं यथार्थ दर्शन घडत असे. आपलं ग्रामजीवन किती समृध्द आणि स्वावलंबी होतं, याचं प्रत्ययकारी दर्शन ‘गवळणी’ बनविण्याच्या या प्रथेमधून व्हायचं.
पाचव्या दिवशी शेणाचे पाच पांडव केले जात. शेणाची मूद घेऊन त्याची द्रौपदी केली जायची. बळीराजा दाखवला जायचा. शेणाचा सुरेख असा डोंगर तयार केला जाई. कुणी चिपाडाच्या काटक्या एकत्र करून सुरेख मंडप करत. त्यावर आंब्याच्या डहाळया ठेवून मंडपाची शोभा वाढविली जाई. सलग पाच दिवसांत शेणापासून निर्मिलेल्या गवळणी जपून ठेवून छपरावर वाळवत घालण्यात येत. कार्तिक पौर्णिमेला त्यांचे दहन केले जाई. यावेळी कित्येक बारकाली पोरं धाय मोकलून रडत असत, मग त्यांच्या आयाबाया त्यांचे गालगुच्चे घेत त्यांची समजूत काढत असत! घरातली जाणती माणसं गालातल्या गालात हसत हे दृश्य मनात साठवत असत!
आताशा हरेक घरापुढे गवळणी केल्या जात नाहीत. नव्या पिढीला त्यासाठीचं मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई, आजीबाईही आता लोप पावताहेत. तरीही काही अपवादात्मक ठिकाणी आपल्या आजी-आई, सासूकडून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न काहीजणी करताना दिसतात. ज्या गावांचे शहरीकरण खूप कमी प्रमाणात झाले आहे अशा गावांमध्ये मात्र जुन्या पिढीतल्या वयस्क सागवानी बायका मात्र आजही शेणाच्या गवळणींची सुंदर रचना करून छोटसं आटपाटनगर वसवतात. आजीकडून नातीकडे आणि सासूकडून सुनेकडे चालत आलेला हा वारसा प्रयत्नपूर्वक पुढच्या पिढीकडे देण्यासाठी त्या इच्छुक दिसतात.
आता गुरं सांभाळणं हेच दिव्य होऊन बसलंय. जित्राबाऐवजी यांत्रिकी मदतीने शेतीकामे करण्याकडे कल आहे. यात गैर काहीच नाही. गावाकडच्या घरातले दूधदुभतेही घटत चाललेय. सारं काही अजस्त्र वेगाने बदलत चाललेय जे कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे काळाच्या ओघात अशा प्रथा नष्ट होतीलही परंतु पुढच्या पिढीच्या माहितीसाठी यांचं ‘डॉक्युमेंटेशन’ व्हायला हवं अन्यथा कधी काळी गावाकडच्या मायभगिनी, पोरंठोरं दर दिवाळीत शेणापासून सुंदर गवळणी बनवत असत नि त्याचाही आनंद घेत असत हे नव्या पिढीला खरं वाटणार नाही. जसजशी दिवाळी बदलत चाललीय तसतसे तिचे रुपडे प्राकृतिकतेपासून दूर जात अधिकाधिक कृत्रिम होतेय हे वास्तव आहे!
क्रमशः…
लेखक : श्री समीर गायकवाड
छायाचित्रे सौजन्य – सुश्री विनू कुलकर्णी
संकलक व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈