सौ. उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – १ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का ! ‘ उज्ज्वला घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,
`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन. ‘
आण्णांनी `ठीक आहे. ‘ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय, तो बाप-लेकीतला, किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो, गुरु-शिष्यामध्ये.
कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने, इतकेच नव्हे, तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्या उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!
आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले. स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, अशा असहाय्य, परित्यक्ता, विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली, तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्या आणि वसतिगृहात राहणार्या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार, उमेद, उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.
आर्थिक कारणाने सरकारने सासवड येथे चालवलेली ही शाळा ७२ साली बंद केली. मग आण्णा-वहिनी पुण्याला त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या सासवडच्या किती तरी विद्यार्थिनी, कधी मुला-बाळांना घेऊन, कधी नवर्याला घेऊन आण्णांकडे यायच्या. उज्ज्वलाचे वडीलही पुण्यालाच राह्यचे. त्यामुळे एस. एस. सी. ची परीक्षा झाल्यावर, तीदेखील पुण्याला आली. उज्ज्वला काळे पुण्यातच होती. त्यामुळे तिचे येणे वारंवार घडू लागले. कधी मुलांना घेऊन, कधी वडलांना, कधी भावाला. असं होता होता, उज्ज्वला आणि तिचा परिवार आण्णांच्या गोतावळ्यात कधी मिसळून गेला, कुणालाच कळलं नाही.
आण्णा तिला एकदा म्हणाले, ‘नुसता एस. एस. सी. चा काय उपयोग? तू डी. एड. हो. ‘ नुसती सूचनाच नाही. तिच्या मागे लागून तिला डी. एड. ला प्रवेश घ्यायला लावला. तिचा अभ्यास करून घेतला. मग यथावकाश प्राथमिक शाळेत नोकरी, कायम होणं, हे सारं घडून गेलं. उज्ज्वलाचा संसार मार्गी लागला. हे सारं होईपर्यंत एखाद्या डोंगरासारखे आण्णा तिच्या मागे उभे राहिले. आण्णांचे हे ऋण उज्ज्वला नेहमीच मानते. ती म्हणते, `आण्णा नसते, तर लोकांच्या घरी धुणं-भांडी करून मला मुलांना वाढवावं लागलं असतं. ‘
उज्ज्वला मराठा समाजातली. वडील चांगले पदवीधर. पण समाजाची म्हणून एक रीत-भात असते. चाकोरी असते. तिचं लग्नं लवकरच, म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी झालं. दोन मुले झाली आणि पठोपाठ वैधव्याच्या दु:खाला सामोरे जायची वेळ आली. आपघर उध्वस्त झाल्यावर बापघर जवळ करणं आलं. तिथे आसरा, तात्पुरता आधारही मिळाला. पण कुटुंब मोठं. मिळवता एकटा. आसरा मिळाला तरी आपल्या पिलांच्या चारा-पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला बघायला हवी. त्यासाठी शिक्षण हवे. आईने मुलांना संभाळायचे मान्य केले आणि उज्ज्वला सासवडला राहिली. दोन वर्षात शालांत परीक्षा ती उत्तीर्ण झाली.
बुद्धिमान माणसे आपल्या कर्तृत्वावर पुढे जातात. सामान्य वकुब व कुवत असलेल्या व्यक्तींमध्ये चैतन्याची, जिद्दीची ज्योत पेटवावी लागते. `तू ही गोष्ट निश्चितपणे करू शकशील, असा आत्मविश्वास जागवावा लागतो. ‘ आण्णांनी उज्ज्वलाच्या बाबतीत नेमके हेच केले. उज्ज्वला सामान्य बुद्धीची मुलगी असली, तरी कष्टाळू होती. `परीक्षेत पास होणे मुळीच अवघड नाही’ असा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. तिचा अभ्यास घेतला. तिला मार्गदर्शन केले. म्हणूनच ती म्हणते, `आण्णांमुळेच मी आज शिक्षिका म्हणून उभी आहे. एरवी मला इतरांच्या घरची धुणं-भांडी करून मुलांना वाढवावं लागलं असतं.
१९७७मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहीशी झाली. `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈